– केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांच्या ‘मादणी’सह ८ खेड्यांत पुढील महिन्यात होणार 4-G सेवा सुरू!
बुलढाणा (बाळू वानखेडे) – भारत संचार निगम लिमिटेड अर्थात बीएसएनएल या शासकीय दूरसंचार कंपनीची सेवा समाधानकारक मिळत नाही, असा आरोप व तक्रारी वाढल्यानंतर खाजगी कंपन्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला. परंतु, या कंपनीने विशेषतः दुर्गम भागातील लहान खेड्यांकडे ढुंकूनही पाहिले नाही. हेच हेरून बीएसएनएल कंपनीने अशा दुर्लक्षित खेड्यातील जनतेला जगाशी कनेक्ट करण्याचे निश्चित केल्याचे दिसत आहे. याचाच एक भाग म्हणून भारत सरकारच्या फोर-जी संपृक्कता (4G Saturation) प्रोजेक्ट अंतर्गत बीएसएनएल कंपनी जिल्ह्यातील ४४ लहान लहान खेड्यात मोबाईल टॉवर उभारत आहे. यातील विद्यमान केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांच्या ‘मादणी’सह ८ खेड्यातील टॉवरचे काम पूर्ण झाले असून, पुढील ऑगस्ट महिन्यात सदर गावात फोर-जी सेवासुद्धा सुरू होणार आहे. यासाठी ना. जाधव यांनी पाठपुरावा केलेला आहे.
बीएसएनएल या सरकारी कंपनीवर सेवा सुरळीत मिळत नाही, असा आरोप व तक्रारीचा खच वाढत गेला. हीच संधी हेरून आयडिया, एअरटेल, जिओ यांसह विविध खाजगी कंपन्यांनी आपले जाळे विणले. सुरुवातीला विविध ऑफरच्या मायाजाळात अडकवत आता मात्र आपली सेवा महाग केल्याच्या तक्रारी वाढत असून, रोषदेखील व्यक्त केला जात आहेत. असे करताना या कंपन्यांनी मात्र लहान खेड्यांकडे ढुंकूनही पाहिले नसल्याचे दिसत आहे. हीच गंभीर व अत्यावश्यक बाब हेरून भारत सरकारच्या फोर-जी संपृक्कता प्रकल्प अंतर्गत बीएसएनएल शासकीय कंपनीने आता गावखेड्यात सेवा देण्याचा निश्चित केल्याचे दिसत आहे.
—
ज्या गावात बीएसएनएलचे टॉवर किंवा रेंजही मिळत नाही, अशा ठिकाणी २ हजार स्क्वेअर फुट जागा दान दिल्यास टॉवर उभारण्यात येईल, यासाठी संबंधितांनी संपर्क साधावा.
– एन. आर. ठोंबरे, सहाय्यक महाप्रबंधक, बीएसएनएल खामगाव
—
जिल्ह्यातील अशाच दुर्गम व दुर्लक्षित ४४ गावांत बीएसएनएलने आपले टॉवर उभारणे सुरू केले आहे. यामध्ये बुलढाणा तालुक्यातील अटकळ, बोरखेड, मातला, चिखली तालुक्यातील भोरसाभोरसी, दहीगाव, धुमा, मेडसिंग, बोरखेड, पिंपरखेड, जळगाव जामोद तालुक्यातील काजेगाव, दादुलगाव, मांडवा, सोनबर्डी, गारपेठ, खामगाव तालुक्यातील कदमापूर, धदम, श्रीधरनगर, नागझरी खुर्द, नांद्री वडजी, पिंपरी कोरडे, लोणार तालुक्यातील कासारी, संग्रामपूर तालुक्यातील आस्वंत, करमोडा, आवार, वडगाव, रोहीन खिडकी न्यू, मलकापूर तालुक्यातील अनुराबाद, हरसोडा, मेहकर तालुक्यातील वागदेव, मादणी, मेळजानोरी, मुंदेफळ, मोताळा तालुक्यातील चिंचपूर, हनवत खेड, खंडवा, खडकी, नळकुंड, नांदुरा तालुक्यातील वळती, काटी, गोसींग, शेगाव तालुक्यातील घुई हिंगणा व सिंदखेडराजा तालुक्यातील गुंज व आडगाव राजा या गावांचा समावेश आहे. विशेष म्हणजे आणखी मंजूर अटकळ, दहिगाव, आवार, मादणी, बोरखेड, खंडवा काजेगाव, मांडवा, गोसींग या गावांत आता ऑगस्टमध्ये फोर-जी सेवा सुरू होणार आहे. खासगी कंपन्या आता फाईव्ह-जी सेवा देत असताना बीएसएनलनेदेखील फाईव्ह-जी सेवा देण्यासाठी तांत्रिक बाबी पूर्ण कराव्यात, अशी मागणीही मोबाईलधारक करत आहेत. इतर सर्वच ठिकाणची सेवा येत्या डिसेंबरपर्यंत सुरू होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे बीएसएनएल खामगावचे सहाय्यक महाप्रबंधक एन. आर. ठोंबरे यांनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलताना सांगितले. विशेष म्हणजे, यासाठी तत्कालीन खासदार तथा विद्यमान केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनीच केंद्रस्तरावर जोरदार पाठपुरावा केला होता.
————–