उत्क्रांती, या संकल्पनेतून क्रांती हा शब्द आला असावा. माकडापासून माणसाची उत्क्रांती झाली, हल्ली माकडाला लाजवेल अशा उड्या राजकारणातील माणसं मारत आहे.. हा भाग वेगळा! कुणाची ‘हनुमान उडी’ असते, तर कोणाची ‘बेडूक उडी’.. या उड्या महाराष्ट्राच्या राजकारणात सरावाच्या झाल्या त्या, आघाडी अन् युतीच्या राजकारणाने. यामागे नंतर ‘महा’ लागले, हे राजकारणातील ‘लघु’पणाचे अवलक्षण!
तर कधी आघाडीत तर कधी युतीत उडी मारणार्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा हा विषय. शेतकरी संघटनेच्या मागे ‘स्वाभिमानी’ लावून २००६च्या सुमारास राजू शेट्टींनी शेतकरी चळवळीची वेगळी चूल मांडली. पुर्वी शेट्टी म्हणा की सदाभाऊ खोत, हे शरद जोशींच्या शेतकरी संघटनेतले. साधारणत: २००१-०२ च्या सुमारास याच जोशींच्या संघटनेत रविकांत तुपकर सामील झाले, ते विद्यार्थी चळवळीतून. खासगी शिकवणुकीविरोधात त्यांनी बुलढाण्यात राडा केल्यानंतर त्यांना शेतकरी संघटना विद्यार्थी आघाडीचे विदर्भ प्रदेशाध्यक्ष पद देण्यात आले. आक्रमकता हेच तुपकरांच्या आंदोलनाचे सूत्र, मात्र तेंव्हा शरद जोशींची शेतकरी संघटना प्रौढावस्थेत पोहचल्याने डंकेल, गॅट करार, जागतिकीकरण, वायदा बाजार.. अशा बौध्दीक पातळीवर ही संघटना स्थिरावल्याने आकाशातल्या स्थिर घारीला जशी खालच्या पाखरांची फडफड सहन होत नाही, तशी तुपकरांची आंदोलने जुन्या पदाधिकार्यांना खटकू लागली. सळसळतं रक्त अन् रक्ताच्या झालेल्या गाठी, यात शेतकरी संघटनेच्या रक्तप्रवाह नेमका वाहतोय की थबकतोय? हे चळवळीतल्या शेतकर्यांनाच कळत नव्हते.
अशा दोलायमनान काळात पश्चिम महाराष्ट्रातील ऊस आंदोलनाची धगधग धगधगती ठेवण्यासाठी राजू शेट्टी मूळ शेतकरी संघटनेशी फारकत घेवून, त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटना स्थापन केली. पण शरद जोशींना सोडतांना त्यांनी जोशींवर कधीही टिका केली नाही. जोशींच्या डंकेलवादी नेत्यांना वैतागून रविकांत तुपकर राजू शेट्टींसोबतच स्वाभिमानी शेतकरी संघटनेत डेरेदाखल झाले. आंदोलन हा तुपकरांचा आत्मा, तर चळवळ ही प्राण. म्हणून प्राण ओतून आंदोलनं तुपकरांनी केली. दरम्यानच्या काळात ३ वर्षानंतर सदाभाऊ खोत यांनीही शरद जोशींना सोडचिठ्ठी देत, राजू शेट्टींची साथ धरली. सदाभाऊंनीही सोडतांना शरद जोशींवर टिका नाही केली. पुढे स्वाभिमानी शेतकरी संघटनेत रविकांत तुपकर सिनीअर असूनही, ते तिसर्या नंबरवर गेले व सदाभाऊ दुसर्या.
शेट्टी-खोत-तुपकर या त्रयींनी ऊसाचे अन् दुधाचे आंदोलन पेटवले, पुन्हा एकदा शरद जोशींच्या संघटनेतील ‘अंगार’ शेट्टींच्या संघटनेत दिसला. पण शेतकर्यांच्या मनात जो ‘अंगारमळा’ शरद जोशी तयार करु शकले, तो या तिघांनाही राजकीय महत्वाकांक्षेपोटी तयार करता आला नाही. अर्थात शरद जोशींना राजकीय महत्वाकांक्षा नव्हती, अशातला भाग नाही.. पण त्यांचं राजकारण हे चळवळीशी बांधील होतं, अर्थात तेही शेतकर्यांना पटत नव्हतं.. हा भाग वेगळा!
अंगार मनात घेवून रविकांत तुपकर चळवळीत उतरले, पश्चिम महाराष्ट्रातील ऊस आंदोलनांसारखे कापूस व सोयाबीन आंदोलन विदर्भात उभे करण्याची धुरा तुपकरांनी हाती घेतली. पहिली कापूस-सोयाबीन परिषद ही ऊस परिषदच्या धर्तीवर बुलढाण्यात झाली, त्यासाठी पहिल्यांदा राजू शेट्टी व सदाभाऊ खोत बुलढाण्यात आले. याच विषयाला घेवून नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर केवळ रविकांत तुपकर यांच्या प्रयत्नानेच मोर्चा निघाला. पश्चिम महाराष्ट्रातील शेट्टींची शिट्टी विदर्भात वाजवली ती तुपकरांनीच. ऊस परिषदेच्या आधी वातावरण निर्मितीकरीता रविकांत तुपकर पश्चिम महाराष्ट्र पिंजून काढायचे, तसाच विदर्भ व मराठवाडा त्यांनी कापूस व सोयाबीन आंदोलनासाठी पिंजून काढला. स्वाभिमानी बाजू मांडण्यासाठी वक्तृत्व अन् हजरजवाबीपणा असल्यामुळे तुपकरांना विविध टि.व्ही.वाहिन्यांवरील चर्चेसाठी पुढे करण्यात आले. तुपकरांकडे मिडीया मॅनेजमेंट स्कील ताकदीचे, त्यातूनही स्वाभिमानी शेतकरी संघटना ताकदीने माध्यमांच्या पटलावर आली. राजू शेट्टींचे नेतृत्व अन् सदाभाऊ व तुपकरांचे वक्तृत्व, यात महाराष्ट्रभर वातावरण तयार झाले. ऊस, दूध, कांदा, कापूस, सोयाबीन असे शेतीविषयक प्रश्न ज्वलंत बनून त्यांनी राजकारण पेटवले. म्हणूनच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जाणार, हे निश्चित झाल्यावर राजू शेट्टींनी आंदोलन थांबविण्यासाठी उध्दव ठाकरेंना बोलावे लागले, हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पीक पीरियड होता !
दरम्यानच्या काळात जे अन्य संघटनेत अपरिहार्यपणे होतं, ते स्वाभिमानी शेतकरी संघटनेतही होत गेलं. राजू शेट्टींना बायपास करण्यासाठी सदाभाऊ खोत व रविकांत तुपकर यांची गट्टी जमली. यातून काही आंदोलनं व एक यात्राही निघाली, पण हा ‘बळीचा आक्रोश’ फार काळ टिकू शकला नाही.. तो २०१४ ला मुख्यमंत्री झाल्यावर देवेंद्र फडणवीसांनी शमवला. पहिले जाळ्यात ओढल्या गेले ते सदाभाऊ खोत, त्यांना विधान परिषदेची आमदारकी मिळाली.. अर्थात हा भाग राजू शेट्टींच्या पचनी न पडणारा, पण बोलताही येत नाही अन् सहनही होत नाही.. अशी त्यांची अवस्था झाली. यात तुपकरांनी सदाभाऊंचं बोट सोडून शेट्टींचा हात धरुन ठेवण्यात धन्यता मानली. सदाभाऊंची हकालपट्टी करण्यासाठी जी समिती नेमली, त्यात तुपकरांना नेमण्यात आले. अर्थात सदाभाऊंना बाहेरचा रस्ता दाखविल्यावर तुपकर स्वाभिमानी शेतकरी संघटनेत क्रमांक २ चे नेते बनणार होते, झालेही तसेच!
दरम्यान तुपकरांनी २०१४ला चिखली विधानसभेची तयारी सुरु केली, पण महायुतीत ही जागा भाजपाकडे असल्याने तुपकरांना “वेट अॅण्ड वॉच”वर ठेवण्यात आले. फडणवीस मुख्यमंत्री झाले, अन् एक महामंडळ महायुतीतल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देण्याचे ठरले. अर्थात तेंव्हापर्यंत सदाभाऊ संघटनेतून बाहेर पडलेले नव्हते अन् त्यांना हाकललेही गेले नव्हते. तो समिती नेमून त्यांची हकालपट्टी करण्याचा घटनाक्रम ते राज्यमंत्री बनल्यानंतरचा. त्यामुळे तुपकरांना लाल दिवा मिळण्यासाठी तेंव्हा सदाभाऊही प्रयत्नशील होते, तो तुपकरांना मिळाला.. आधीचे महामंडळ बदलून जरा व्यवस्थीत असे वस्त्रोद्योग महामंडळ देण्यात आले, अगदी मलबार हिलला शासकीय बंगलाही!
चळवळीतला एक पोरगा राज्यमंत्री पदाचा दर्जा असणारा नेता बनला, प्रस्थापितांना मागे टाकत एक विस्थापित पुढे आला. त्याआधी तुपकरांनी बुलढाणा जिल्हा बँकेविरोधातील आंदोलनांनीही रान पेटविले होते. पुढे शेट्टीनंतरचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा चेहरा म्हणून तुपकर प्रखरतेने पुढे आले, पण या चळवळीमध्ये होतं काय.. सोबतचा सहकारी सत्तेच्या पदावर गेला की, चळवळीत अंतर्गत वळवळ सुरु होते. त्यामुळे तुपकरांचा दिवा हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दिव्याखाली अंधार करत गेला, कार्यकर्ते तुपकरांविरोधात बोलते गेले अन् तेच राजू शेट्टींनाही हवं होतं. पण काय होत होतं, सोडून गेलेल्या सदाभाऊ विरोधात वातावरण तयार करुन शेट्टींना अनुकूल भूमिका तुपकर घेत होते. सदाभाऊंना स्वाभिमानी शेतकरी संघटनेत जे खलनायक ठरवल्या गेले, त्या प्रक्रियेत आता सदाभाऊंचा पुळका येणारे तुपकरांसह अनेकजण होते.. हे वास्तवही नाकारता येत नाही. पुढे पंतप्रधान नरेंद्र मोदींनींच सार्यांचेच लाल दिवे हटविण्याचा फतवा काढला, महामंडळात असूनही शेतकर्यांच्या प्रश्नावर आवाज उठवता येत नाही.. म्हणून तुपकरांनी लाल दिव्याला लाथ मारली म्हणण्यापेक्षा महामंडळ अध्यक्षपदाला लाथ मारुन बाहेर पडले.. हे म्हणणे जास्त संयुक्तीक होईल!
२०१४च्या माढा लोकसभा निवडणुकीची धुरा रविकांत तुपकरांच्या हाती होती. सदाभाऊंसाठी त्यांनी मोहिते पाटील प्रतिस्पर्धी असतांनाही या निवडणुकीसाठी झोकून दिले होते, अर्थात थोडक्यात त्यावेळी सदाभाऊंचा पराभव झाला. पण त्यातून खूप काही शिकून २०१९साठी बुलढाणा लोकसभा मतदार संघातून रविकांत तुपकरांनी तयारी सुरु केली, पण झाले उलटेच.. २०१४ला महायुतीत असणारी स्वाभिमानी २०१९ला महाविकास आघाडीत गेली, अन् तुपकरांना थांबविण्यात आले. मात्र त्यावेळी प्रतापरावांवर आरोपांच्या तोफांचा भडीमार करत तुपकरांनी शिंगणे यांच्यासाठी सर्वस्व झोकून प्रचार केला. मात्र शिंगणे हरले अन् प्रतापराव जिंकले, हा नंतरचा भाग!
नंतर होत्या २०१९च्या विधानसभा निवडणुका, पण दरम्यानच्या काळात २ दिवसांसाठी का होईना.. पण रविकांत तुपकर सदाभाऊंच्या रयत क्रांती संघटनेत गेले. अर्थात ते परत शेट्टींच्या स्वाभिमानीत आले, पण काचाला गेलेला तडा काही जुळू शकला नाही. तुपकरांनी आव आणूनही शेट्टींनी त्यांना मात्र अगदी संघटनेतून काढेपर्यंत कोणतेही पद दिले नाही. एवढेच काय, त्यांच्याविरोधात बुलढाणा जिल्ह्यात प्रशांत डिक्कर यांना ताकद देण्याचे काम राजू शेट्टींनी केले. शेट्टी जिल्ह्यात येत, पण तुपकरांना त्याची खबरबात नसायची. का रे दुरावा, का रे अबोला..चा सिलसिला असाच चालू राहिला. पण चूप बसतील ते तुपकर कसले? त्यांनी आंदोलने चालूच ठेवली. स्वाभिमानी शेतकरी संघटना नाहीतर स्वाभिमानी हेल्पलाईन सेंटर त्यांनी सुरु ठेवले. या हेल्पलाईनच्या माध्यमातून कोरोना काळात जनसामान्यांना झालेली हेल्प महत्वपुर्ण ठरली. अजूनही दर सोमवारी या सेंटरमध्ये जनता दरबार भरवून तुपकर समस्या सोडवितात.
दरम्यानच्या काळात प्रा.जालींधर पाटील यांच्या मराठी व्याकरण भाषेत रविकांत तुपकरांनी राजू शेट्टी यांच्याशी ‘सवतासुभा’ करुन ‘कापूस व सोयाबीन एल्गार मोर्चा’ दरवर्षी सुरु ठेवला. त्यानंतर अरबी समुद्रात उडी, मंत्रालय ताब्यात घेणे.. अशी मुंबईतील आंदोलने तर पुढे दिल्लीत जावून पियुष गोयलांशी चर्चा.. ही त्यांची आंदोलनात्मक सिरीयल असायची. पिक विम्याचा कळीचा मुद्दा त्यांनी उचलला. त्यात देवेंद्र फडणवीस व जे-जे कृषीमंत्री असतील त्यांना भेटून निवेदने त्यांनी देवून इतर राजकीय नेत्यांवर कुरघोडी केली. त्यांना जनतेच्या अर्थसहाय्यातून मिळालेली इनोव्हा ‘लोकरथ’ हा सोहळाही त्यांच्या व्यक्तीत्वातील कर्तृत्वाला उजाळा देणारा ठरला.
पण व्हायचे काय, तुपकर फक्त निवडणूक लढविण्याची हवाच तयार करतात.. अशी हवा त्यांच्याविषयी जिल्ह्यात निर्माण झाली. म्हणून हवा कशीही का असेना, २०२४च्या लोकसभा निवडणुकीत उतरुन तुपकरांना हवा निर्माण करावीच लागणार होती. मात्र केवळ हवाच नाहीतर एक वादळ निर्माण झाले तुपकरांचे लोकसभा निवडणुकीत, ग्रामीण भागात ‘पाना’ जोरदार चालला. या पान्याने तुपकरांचा राजकीय गाडीचा नट जोरदार कसल्या गेला, त्यांना अडीच लाखापर्यंत मते मिळाली.. एकट्याच्या जीवावर. त्यांच्यात अन् विजयी उमेदवार प्रतापराव जाधव यांच्यात एक लाखाचेही अंतर राहिले नाही, जरी ते तिसर्या क्रमांकावर असले तरीही. ते जर दुसर्या क्रमांकावरील प्रतिस्पर्धी असतेतर लाखांच्यावर मतांनी निवडूनही आले असते कदाचित !
आता बुलढाणा व हातकणंगले या २ लोकसभा मतदार संघावरच दृष्टीक्षेप टाकलातर तुपकरांनी त्यांचे तत्कालीन नेते राजू शेट्टींना ओव्हरटेक केलेले दिसते. तरी शेट्टी दोनदा खासदार व राज्याचे नेते. बुलढाणा लोकसभा मतदारसंघात १९ लाखाच्या जवळपास मतदान होऊनही तुकाराम अडीच लाख मध्ये पडली, तर हातकणंगले मतदारसंघात बारा लाखावर मतदार होऊ नये शेट्टी जेमतेम पावणेदोन लाखापर्यंत पोहोचू शकले. सिंदखेडराजा विधानसभा मतदार संघात तुपकर २९ हजार मतांनी पुढे होते, मात्र एकाही विधानसभा मतदारसंघात राजू शेट्टी पुढे जाऊ शकले नाही. हरल्यावर शेट्टींनी मतदारांना “माझे काय चुकले ?” हा भावनिक प्रश्न विचारला, तोच प्रश्न तुपकरांनी चौकशी समितीपुढे बोलल्यावर एका पत्रातून नेमल्यावर शेट्टी यांना विचारला होता- “माझे काय चुकले ?”.. ना मतदारांकडून शेट्टींना उत्तर आले, ना शेट्टींनी तूपकरांना उत्तर दिले !
लोकसभा निवडणुका आटोपल्या, चौकशी समितींचे घोंगडे भिजत होतेच. समितीपुढे न जाता, तुपकरांनी १० पानांचे पत्र पाठवून शेट्टींनाच आरोपीच्या पिंजर्यात आधीच उभे केले होते. अखेर चौकशी समितीने पुण्यात बैठक घेवून रविकांत तुपकरांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी केल्याचे ठरल्याप्रमाणे जाहीर केले. यावेळी तुपकरांवर विविध ठपके ठेवण्यात आले. त्याआधीच तुपकरांनी २४ जुलैला चळवळीची पुढची दिशा ठरविण्यासाठी पुण्यात राज्यभरातील कार्यकर्त्यांना बोलावून बैठकीचे आयोजन केले होते, त्यामुळे २ दिवस आधीच चौकशी समितीने लोंबकळत ठेवलेली तुपकरांची हकालपट्टी अगदी संघटनात्मक घटनेला बांधील राहून करुन टाकली.
ही हकालपट्टी म्हणजे शेपटीवर पाय देण्याचा प्रकार होता, मग खवळणार नाही ते तुपकर कसले? आधीच आक्रमक, परिणामांची पर्वा न करता बोलणारे. त्यामुळे पुण्यातल्या बैठकीत ते आडपडदा न ठेवता थेट राजू शेट्टींवरच बोलले, इतके की काही ठिकाणी ते घसरले. राजू शेट्टींच्या कार्यशैलीला वैतागून सोडून गेलेल्यांची यादीच त्यांनी वाचली. अर्थात त्या यादीतील अनेक जणांनी सोडून जावे, ही तेंव्हा तुपकरांचीच इच्छा होती. सदाभाऊंना हाकलल्याने तुपकर दुसर्या नंबरवर आले होते. बरं शेट्टींना वैतागून अनेकजण सोडून गेले, मग बुलढाणा जिल्ह्यात अनेक जणांनी स्वाभिमानी शेतकरी संघटना सोडतांना ते कोणाला वैतागले होते. असो, राजकारणात फक्त पुढच्यांवर आरोप करायचे असतात!
बुलढाण्यातल्या एका बैठकीत तुपकरांनी आधीच ६ विधानसभा मतदार संघात निवडणूक लढविण्याची घोषणा केली होती. आता पुण्याची बैठक राज्याची होती, म्हणून त्यांना महाराष्ट्रासाठी धोरण ठरवायचे होते. त्या बैठकीत त्यांनी छोट्या-मोठ्या संघटनांना सोबत घेवून राज्यात २५ जागा लढविण्याचा निर्णय टाळ्यांच्या गजरात जाहीर केला. पण् कशावर? म्हणून त्यांनी घोषणा केली. महाराष्ट्र क्रांतीकारी आघाडीची!
तुपकर तसे “एल्गार” पुकारणारे, पण त्यांनी ही “क्रांतीकारी” घोषणा केली. यात “शेतकरी” शब्द कुठेच दिसत नाही. किसान क्रांती मोर्चा, शेतकरी एल्गार आघाडी.. असेही काही करता आले असते, पण त्यांनी ते का टाळले? हे त्यांनाच माहित. ही नवी आघाडी महाविकास आघाडीसाठी मारक तर ठरणार नाही ना?? ‘वंचीत’ला दूर करण्यासाठी हे नवे राजकीय ‘संचीत’तर नाही ना??? अनेक प्रश्न आहेत. त्याची उत्तरे विधानसभा निवडणुकीत मिळतीलच. पण आता रविकांत तुपकर हे एका आघाडीचे संस्थापक म्हणून राज्याचे प्रमुख नेते बनले होते. आतापर्यंत ते स्वाभिमानीत दुय्यम होते.
महाराष्ट्र क्रांतीकारी आघाडीसाठी रविकांत तुपकरांना शुभेच्छा देत असतांना, मांडल्या गेली या नव्या क्रांतीकारी आघाडीची उत्क्रांती !
(लेखक हे दैनिक देशोन्नतीचे बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी व राज्यातील ज्येष्ठ पत्रकार आहेत. संपर्क ९८२२५९३९२२)