शेतकर्यांच्या मागण्यांसाठी मेहकर तहसीलवर सोमवारी धडकणार ‘आक्रोश मोर्चा’!
बुलढाणा (बाळू वानखेडे) – पीकविम्याचा सरसकट लाभ द्यावा, यासह इतर शेतकरी हितांच्या मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात व शेतकरी आंदोलक गजानन अमदाबादकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनात सोमवारी (दि.२९) मेहकर तहसील कार्यालयावर भव्य शेतकरी आक्रोश मोर्चा काढला जाणार आहे. ‘प्रतापगड’ समजल्या जाणार्या केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या बालेकिल्ल्यातच हा मोर्चा निघणार असल्याने या मोर्चाच्या यशस्वीतेकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
वर्ष २०२३-२०२४च्या पीकविम्याचा सरसकट लाभ द्या, नैसर्गिक आपत्ती व शेतकरीविरोधी धोरणाचे बळी ठरलेल्या शेतकर्यांना एकही ५० हजारांचे अनुदान द्या, सोयाबीन ८ हजार व कापूस १० हजार रूपयांचा भाव गृहीत धरून भाव फरक द्या, अपात्र ठरवलेल्या शेतकरी आत्महत्याग्रस्त परिवारांना तत्काळ एक लाख रूपये द्या, वन्य प्राण्यांच्या त्रासापासून बंदोबस्तासाठी सामूहिक तार कुंपनाला ९० टक्के अनुदान द्या, वन्य प्राण्यांच्या नुकसानीचे दावे तत्काळ निकाली काढून नुकसान भरपाई द्या, सर्व बेरोजगारांना जागा व घरकुल उपलब्ध करून द्या, व घरकुलांचे अनुदान तात्काळ अदा करावे, या मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढला जाणार आहे. सोमवारी सकाळी ११ वाजता हा मोर्चा शासकीय विश्रामगृह येथून निघणार असून, तो मेहकर तहसील कार्यालयावर धडकणार आहे. या मोर्चात जास्तीत जास्त शेतकरी, बेरोजगार, शेतमजूर यांच्यासह नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन शेतकरी नेते विनायक सरनाईक, डॉ. ज्ञानेश्वर टाले, सहदेव लाड यांनी केले आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटना व रविकांत तुपकर यांचा अधिकृत घटस्फोट झाल्यानंतर तुपकर यांचे बुलढाणा जिल्ह्यातील हे पहिलेच आंदोलन आहे. आणि, विशेष म्हणजे हे आंदोलन केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचा बालेकिल्ला समजल्या जाणार्या मेहकरमध्ये होत आहे. मेहकरमध्ये शिंदे गटाचे आमदार डॉ. संजय रायमुलकर हे सत्ताधारी पक्षाचे आमदार असून, हा शेतकरी आक्रोश मोर्चा ना. जाधव व आ. रायमुलकर यांच्यासाठी एक प्रकारचे राजकीय आव्हान ठरणार आहे. कारण, या मोर्चाच्या माध्यमातून तुपकर हे मेहकरात जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
———–