अकोल्यात ‘शिवशाही’ला भीषण आग; चालकाच्या सतर्कतेने ४४ प्रवासी बालंबाल बचावले!
अकोला (जिल्हा प्रतिनिधी) – अकोला-खामगाव राष्ट्रीय महामार्गावर रिधोरा गावानजीक शेगाव येथून अकोल्याकडे येत असलेल्या एस टी महामंडळाच्या चालत्या शिवशाही बसला आज (दि.२५) दुपारी दोन वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. या बसमधील ४४ प्रवाशांच्या जीवावर मोठे संकट आले होते, परंतु संत गजानन महाराजांच्या कृपेने ते टळले. बसचालकाने आग लागल्याचे लक्षात येताच तातडीने ही बस रस्त्याच्या कडेला उभी करून प्रवाशांना पटापट खाली उतरवले. परिणामी, मोठी जीवितहानी टळली. तथापि, संपूर्ण बस आगीत जळून खाक झाली. घटनास्थळी स्थानिक गावकर्यांनी धाव घेऊन मदत व बचावकार्य केले. नंतर अकोला व खामगाव येथून आलेल्या अग्निशामक दलाच्या बंबाने पाण्याच्या सहाय्याने आग विझवली. अकोला शहराच्या बाहेर बाळापूर रोडवर हॉटेल तुषारनजीक ही थरारक घटना घडली.
एसटी महामंडळाची शिवशाही बस संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज यांच्या शेगाव येथून अकोल्याकडे रवाना झाली होती. यादरम्यान बसचालक पी. एन. डोंगरे यांना अचानक काहीतरी जळण्याचा वास आला. त्यामुळे चालकाने बस रस्त्याच्या कडेला उभी केली. आणि तातडीने सर्व प्रवाशांना बाहेर काढले. त्यानंतर बसने घेतलेला पेट आणखीनच वाढला. या आगीत बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे. या बस मध्ये त्यावेळी ४४ प्रवासी होते. मात्र, चालकाच्या सतर्कमुळे सर्व प्रवाशांचे प्राण वाचले आहेत. आग लागल्याचे लक्ष आल्यानंतर चालक डोंगरे यांनी बसमधील अग्निशामक यंत्राद्वारे आगीवर नियंत्रणाचा प्रयत्न केला. मात्र, आग आटोक्यात आली नाही. काही क्षणांमध्ये संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन पथकाने घटनास्थळावर धाव घेत, जळत्या बसवर पाण्याचा मारा केला व आगीवर नियंत्रण मिळवले.
दरम्यान, चालकाच्या माहितीनुसार, अकोला आगार क्रमांक दोनची शिवशाही बस क्रमांक एमएच ०९ इएम १७९२ प्रवाशांना घेऊन आज सकाळी शेगांव येथे गेली होती. शेगांव येथून ४४ प्रवासी घेऊन परतीच्या मार्गावर असलेली विनावाहक बस रिधोरा गावानजीक आली असता, बसमध्ये तांत्रिक अडचण आली. चालकाच्या कक्षामध्ये बसला आग लागली. परंतु, सुदैवाने सर्व प्रवासी सुखरूप असून, बस मात्र जळून खाक झाली आहे. मागच्या वर्षी अशाच प्रकारे नागपूर-अमरावती दरम्यान प्रवास करीत असलेल्या चालत्या शिवशाही बसने पेट घेतल्याने तिचा जागीच कोळसा झाला होता. तर प्रसंगावधान राखून प्रवाशांनी आपले जीव वाचविले होते. नेहमीच शिवशाही बसेसविषयी आग लागण्याच्या दुर्घटना होत असतानाही त्या प्रवाशांच्या सेवेत का ठेवल्या जात आहेत. अगदी भंगार झालेल्या ह्या बसेस प्रवाशांच्या जीवावर उठलेल्या असतानाही त्या भंगारात का काढल्या जात नाहीत? असा प्रश्न आता निर्माण झालेला आहे.
——————-