– बहुजन समाजातील मुला-मुलींसाठी बुलढाण्यात आता उभे राहणार अद्ययावत वसतीगृह!
बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – मराठा सेवा संघाच्यावतीने चालविण्यात येणार्या मुला-मुलींसाठीच्या वसतीगृहासाठी बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी बुलढाणा नगरपरिषदेच्या मालकीची ०.८९ आर जागेसह तीन कोटी रूपयांचा निधीदेखील राज्य सरकारकडून मंजूर करून दिला आहे. याबाबतचा शासन निर्णय नुकताच प्राप्त झाला असून, या जागेवर आता बहुजन समाजातील मुला-मुलींसाठी अद्ययावत असे वसतीगृह बांधले जाणार आहे.
राज्यातील नगरपालिकांना वैशिष्टपूर्ण कामांसाठी शासनामार्फत अनुदान देण्यात येते. त्यानुसार, आ. संजय गायकवाड यांनी पाठपुरावा केल्यामुळे राज्य सरकारने धाड रोडवरील सरकारी तलावाच्या सुशोभिकरणासाठी यापूर्वी राखीव ठेवलेला परंतु, वेळेत खर्च न झालेला निधी बुलढाणा नगरपरिषदेच्या जागेवर वसतीगृह बांधण्यासाठी दिला आहे. याबाबतचा शासन निर्णय राज्य सरकारने २३ जुलैरोजी काढला असून, या निर्णयाची प्रत आ. संजय गायकवाड यांनी मराठा सेवा संघाचे पदाधिकारी डॉ. मनोहर तुपकर (राज्य सहसचिव), रवी काळवाघे (कार्याध्यक्ष, मराठा सेवा संघ बुलढाणा), डॉ. अशोकराव खरात (जिल्हाध्यक्ष, डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकार कक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा सहकारी बँक), डॉ. दिवाकर काळे, दत्तात्रय शेळके, डॉ. पाचरणे, डॉ. गजानन जाधव, डॉ. आर. एस. पाटील, अरूण चव्हाण, सोमनाथ इथापे, मनिष ठाकरे, दीपक गायकवाड, गणेश रहाटे, दीपक गायकवाड, समाधान कापसे, दत्तात्रय भोंडे, अमोल पवार यांच्यासह शिवश्री प्रवीण मिसाळ आदींकडे सुपूर्त केली आहे. त्यामुळे बुलढाण्यात आता बहुजन समाजातील गोरगरीबांच्या मुला-मुलींसाठी अद्ययावत असे वसतीगृह बांधण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
नगरपरिषदेकडून ही जागा मिळविण्यासाठी मराठा सेवा संघाचे पदाधिकारी यांनी प्रयत्न केले होते, तसेच आ. गायकवाड यांनीदेखील पाठपुरावा करून राज्य सरकारकडून व नगरपरिषदेकडून ही जागा मराठा सेवा संघाला मिळवून दिली. तसेच, ही जागा तर शासनाकडून मिळवून देतोच, पण होस्टेल बांधून देण्यासाठी निधीही मिळवून देतो, असा शब्द आ. गायकवाड यांनी मराठा सेवा संघाला दिला होता. आज अखेर आ. गायकवाड यांनी आपला शब्द खरा करून दाखविल्याने जिल्हा मराठा सेवा संघाच्यावतीने त्यांचे आभार व्यक्त करण्यात आलेले आहेत.
—————-