‘ब्रेकिंग महाराष्ट्र’च्या सडेतोड वृत्ताचे ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र काळे यांच्याकडून स्वागतच; “मातृतीर्थातील कोणत्याही भूमिपुत्राचा सदैव अभिमानच”!
– पत्रकार हा सर्वातआधी सुजाण नागरिक असतो. त्यामुळे नागरिकत्वाच्या भावनेतून घेतलेल्या प्रत्येक भूमिकेला पत्रकारितेचे लेबल लावणे सुसंगत नाही!
बुलढाणा (बाळू वानखेडे) – पत्रकारितेतूनही प्रस्थापितांना समांतर म्हणून काही विस्थापित पुढे आणता आले, कुणाला हरभर्याच्या झाडावर चढवून त्याला खड्ड्यात ढकलण्याचे राजकीय मार्गदर्शन कधीच केले नाही. नव्या चेहर्यांना नेतृत्व म्हणून पत्रकारितेतून पुढे आणले. तळी उचलली पण ती जिल्हा विकासाची, कागदांचा ‘येळकोट’ करून पेनाचा ‘जय मल्हार’ करत!, अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त करताना ज्येष्ठ व संवेदनशील पत्रकार राजेंद्र काळे यांनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’चे संपादक पुरूषोत्तम सांगळे यांनी त्यांच्यावर केलेल्या टीकेला चोख प्रत्युत्तर दिले. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या नागरी सत्कार सोहळ्याचे श्री काळे हे अध्यक्ष व मुख्य संयोजक होते. या सोहळ्यानिमित्त शेतकरी नेते रविकांत तुपकर, शिवसेना (ठाकरे) जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे, जालिंधर बुधवत आदी सर्वपक्षीय विरोधकांनाही या सोहळ्याला बोलावले गेले असते, तर हा सोहळा खर्याअर्थाने भूमिपुत्राच्या नागरी सत्काराचा ठरला असता, व त्यातून जिल्ह्यातील राजकीय कटुता दूर होऊन राज्यात एक सकारात्मक संदेश गेला असता, अशी भावना व्यक्त करणारी टीका श्री सांगळे यांनी राजेंद्र काळे यांच्यावर केली होती. या टीकेचे सर्वस्तरातून जोरदार स्वागत झाले. श्री काळे यांनीही या भूमिकेचे स्वागत करत, आपली बाजूही ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलताना मांडली.
राजेंद्र काळे म्हणाले, की केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव या मातृतीर्थातील मूळ भूमिपुत्राला केंद्रीय मंत्रिपदाचा बहुमान मिळाल्यावर, एका अभिमानास्पद भावनेतून जिल्हा मुख्यालय बुलढाणा नगरीत त्यांचा नागरी सत्कार व्हावा.. अशी पोस्ट मी सोशल मीडियावर केली. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत या संकेल्पनेला मूर्तरुप देण्यासाठी ‘विसावा’ विश्रामगृहावर बैठक झाली, त्यात नागरी समिती स्थापन होवून आ. संजय गायकवाड यांनी माझ्या नावाची घोषणा अध्यक्षपदी केली. यापूर्वी जरी आम्ही डॉ.राजेंद्र शिंगणे हे मंत्री बनल्यावर नागरी सत्कार घेतला होता. तरी, या सोहळ्याची माझ्यावर पूर्ण जबाबदारी आल्याने एक ‘शिवधनुष्य’ पेलण्यासारखे होते.. त्यातमध्ये दोन दिवस प्रकृती अस्वास्थ्यामुळे अॅडमीट व्हावे लागले. पण सर्व समिती सदस्यांनी मोलाची साथ दिली. अडचणी अनंत होत्या, सोहळ्याचे स्थळही तसे नवीन होते.. स्थळावरूनच काही सदस्यांनी समितीतून एक्झिट घेतली होती. त्यात राजकारणाचा सोहळा असल्याने आयोजकांची अडकित्त्यात सुपारी असते, या सर्वांवर मात करत सर्व सोहळा दिमाखात पार पडला तो.. अभूतपूर्वच! अर्थात काही चुकाही झाल्या असतील, त्याबद्दल प्रास्ताविकात ‘हात जोडून माफ करा’ असे आर्जव केले. ‘प्रतापगड’ कमानीवर स्वागत, ग्रामदेवता जगदंबेची महापूजा, भारतमाता पूजन, जनता चौक-आठवडी बाजारातून उत्स्फुर्त स्वागत, जयस्तंभ चौकात स्वागताचा जल्लोष, संगम चौकातील शिवस्मारकावर शिवपूजन, ५१ तोफांची सलामी, ठीकठिकाणी जेसीबीद्वारे पुष्पवर्षाव… असं मार्गाक्रमण करत रॅली पोहोचली ती ओंकार लॉन्सवर, अन् तिथे झाला मुख्य नागरी सत्कार भव्य-दिव्य पध्दतीने. पोलिस बँडची धुन, शाहीर सज्जनसिंह राजपूत व संचाचे स्वागतगीत, भूमिपुत्रासाठी लक्षवेधी ‘बैलगाडी’ भेट, भले मोठे हार अन् तब्बल दीड-दोन तास चाललेले सत्कार!
या सोहळ्याच्या आयोजनात सहभागी होतो तो एक नागरिक म्हणून, योगीराज व्यासपीठाचा सदस्य म्हणून. पत्रकारिता करतांना आधीपासूनच सामाजिक उपक्रमात सहभाग नोंदवला. हातातला पेन बाजूला ठेवून अनेकवेळा ग्रामस्वच्छतेसाठी झाडू हाती घेतला, सेवासंकल्प प्रकल्पात सतरंज्या उचलण्याचे काम केले. २०१०ला ‘वृत्तदर्पण’च्या त्रिशतकपूर्ती सोहळ्यात सत्काराचे गुच्छ न स्विकारता उत्तराखंड प्रकोपासाठी मदतनिधी बॉक्स ठेवला, नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्यांना मदतीचा हात म्हणून ‘आम्ही बुलढाणेकर’ चळवळीत कार्यकर्ता म्हणून आठवडी बाजारात मदतीचा बॉक्स घेवून फिरलो, पत्रकार भवन जीर्णोद्धारात प्लॅस्टरवर पाणी मारण्याचे काम केले. स्त्रीभ्रूण हत्येविरोधात ‘लेक माझी’ चळवळीतून रान पेटवले. जिल्हा पत्रकार संघाचा अध्यक्ष बनल्यावर जवळपास बंद पडत चाललेली पत्रकारांची चळवळ नव्याने उभी केली, अनेक सामाजिक उपक्रम त्यातून राबवून कार्यकाळ पूर्ण होताच पद सोडण्याचा पायंडा पाडला. शेगावला पत्रकारांचे ‘न भुतो:’ असे राष्ट्रीय अधिवेशन घेता आले. संघटनांपासून दूर गेलेला पत्रकार आज अनेक संघटनांमधून सक्रिय झालेला दिसतो, ही त्याचीच फलश्रुती… हे तर फक्त उदाहरणादाखल. खूप काही सांगता येईल, मूळात या गोष्टी सांगायच्या नसतात. पण जेंव्हा काहीजण आपल्या एखाद्या पुढाकाराबद्दल ‘पत्रकार’ म्हणून आपल्याकडे बोट दाखवतात, तेंव्हा ‘नागरिक’ म्हणून अशा काही गोष्टी नमूद करण्याची गरज भासते.
पत्रकारितेतूनही प्रस्थापितांना समांतर म्हणून काही विस्थापित पुढे आणता आले, कुणाला हरभर्याच्या झाडावर चढवून त्याला खड्ड्यात ढकलण्याचे राजकीय मार्गदर्शन कधीच केले नाही. नव्या चेहर्यांना नेतृत्व म्हणून पत्रकारितेतून पुढे आणले. तळी उचलली पण ती जिल्हा विकासाची, कागदांचा ‘येळकोट’ करून पेनाचा ‘जय मल्हार’ करत !.. ३० वर्षांच्या या शब्दप्रवासात वेगवेगळ्या प्रकारचे हल्ले पचवत उभे राहता आले, ते केवळ प्रामाणिकतेच्या प्रांजळ भूमिकेमुळेच. कुणाशीही स्पर्धा न करता, आपली स्पर्धा आपल्याशीच.. या भूमिकेतून सर्वांना सोबत घेवून मार्गाक्रमण करत असतांनाही ‘काबीलीयत के लिए दुश्मनों की जरुरत नही होती, अपने आप दुश्मन बन जाते अगर काबीलीयत रही तो..’ या शायरीचा अनुभव अनेकदा येतो. पण तरीही कधीच कोणाला पलटून उत्तर दिले नाही. कारण ‘अपने खिलाफ होनेवाली बाते, मै खामोशी से सुनता हूँ.. जवाब देने का हक, मैंने वक्त को दे रखा है।’
सोहळे घेत आलो, जीवघेण्या आजारातून बाहेर आल्यावर अजीम नवाज राहींचा ‘शब्दयोध्दा’ सन्मान सोहळा घेतला. आपल्या मातीतील प्रा.डॉ.सदानंद देशमुख यांचे ‘बारोमास’ अन् ‘तहान’ या कादंबरीवरील नाटकं आपल्याच मातीत सोहळ्यासारखी घेतली. साहित्य संमेलन घेतले, काव्य मैफिली आयोजित केल्या. लेकीचं लग्न एक सामाजिक सोहळा केला. सोहळे साजरे करणे, हे जीवंतपणाचं लक्षण असून.. सोहळे जीवंतपणीच साजरे व्हायला हवेत. ‘भाऊ पाटील’ हा आमचा ग्रुपच सोहळ्यांनी सजलेला, ‘योगीराज व्यासपीठ’ सोहळ्यातच रंगलेला. या मातीतील कोणत्याही भूमिपुत्राचा सन्मान, हा आमचा अभिमान.. आपल्या माणसांचे कौतुक आपण नाही करायचंतर, कोणी करायचं ? त्यामुळे पुन्हा कधी कोणी अशी जबाबदारी सोपवलीतर, त्या सोहळ्यासाठी पुढाकार घेण्याची भूमिका राहीलच.. ‘पत्रकार’ म्हणून नाहीतर ‘सुजाण नागरिक’ म्हणून!, अशी भूमिकाही राजेंद्र काळे यांनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलताना व्यक्त केली.