– तक्रारदार अपिलात गेल्यानंतर पितळ उघडे पडण्याची शक्यता!
चिखली (महेंद्र हिवाळे) – तालुक्यातील पळसखेड दौलत येथे अतिक्रमीत जागेवर घरकुलाचे बांधकाम सुरू असल्याची तक्रार भारत नामदेव आराख या तक्रारदाराने सुरूवातीला ग्रामसेवक शिवशंकर खेडेकर यांच्याकडे केली. तसेच, संबंधित घरकुलधारक लाभार्थ्यांच्या आठ-अ या कोणत्या कागदपत्रांच्याआधारे काढण्यात आल्यात, याचीही विचारण केली. पण, त्यांनी या तक्रारीची दखल घेतली नाही. त्यामुळे या तक्रारदाराने पंचायत समितीकडे धाव घेतली असता, या तक्रारीवर काहीही कारवाई झाली नाही. त्यामुळे हा तक्रारदार आता अपिलात जाणार असून, तेथे संबंधित ग्रामसेवक व पंचायत समिती अधिकारी यांचे पितळ उघडे पडण्याची शक्यता आहे. कागदपत्रांची शहानिशा न करता घरकुल मंजूर झाले कसे, हा प्रश्न यानिमित्ताने पुढे आला आहे.
सविस्तर असे की, पळसखेड दौलत येथील भारत नामदेव आराख यांनी अतिक्रमणामध्ये चाललेल्या घरकुल बांधकामाची तक्रार ही ग्रामपंचायत सचिव शिवशंकर खेडेकर यांना दिली होती. सदर घरकुल बांधकाम हे अतिक्रमणामध्ये येत आहे, असे कळवूनही या तक्रारीकडे ग्रामसेवकाने दुर्लक्ष केले. घरकुल लाभार्थ्याचा नमुना आठ अ काढला कसा, घराला दोन्ही बाजूला रस्ता आहे, रस्त्यापासून तीन जणांचा भावहिस्सा असलेला आठ अ हा लांबीला ४२ इतका आहे. खाली हाच शेवटचा जागेचा आठ-अमध्ये ५० कसा झाला. गाव नमुना आठ-अला बन्सी शामा खराडे या घरकुल लाभार्थ्याची १२ बाय ५० ची जागा नोंद आहे. विजय कचरू गायकवाड यांची गाव नमुना ‘आठ-अ’ला १२ बाय ५० ची जागा आहे. परंतु, संतोष फकिरा खराडे यांची गाव नमुना ‘आठ – अ’ला २४ बाय ४२ ची जागा नोंद आहे. गाव नमुना ‘आठ-अ’ला बन्सी खराडे व विजय गायकवाड यांची कोणत्या कागदपत्राआधारे नोंद घेण्यात आली. ग्रामपंचायतीच्या रेकॉर्डला चतुःसीमा रस्ता असताना बोळ दर्शविण्यात का आली? भुजंगराव काळे यांच्या जागेपासून ते मधुकर गायकवाड यांच्या जागेपर्यंत असलेला रस्ता किती फुटाचा आहे? याची विचारणा करत याबाबतची प्रत मिळावी, अशी मागणीही तक्रारदाराने केली होती. परंतु, ही माहितीही तक्रारदाराला देण्यात आली नाही. याबाबत मला माझा रस्ता मिळावा, अशी मागणीही तक्रारदाराने केली होती. या तक्रारीची कोणतीही दखल घेतली गेली नाही. याबाबत पंचायत समितीमधून कुठलाही कर्मचारी घटनास्थळी येऊन पंचनामा केलेला नाही. सदर व्यक्तीने पुन्हा त्याचे बांधकाम सुरू केले आहे. पंचायत समिती तथा ग्रामसचिव यांना अर्ज देऊन काही होत नाही. तसेही पंचायत समिती चिखली येथील बीडीओ हे प्रभारी असल्यामुळे येथील कर्मचार्याला त्यांच्या कामात पारदर्शकता राहिली नाही, तक्रारदाराचे म्हणणे आहे.
याबाबत भारत आराख यांनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी संपर्क साधून सांगितले, की मी वारंवार ग्रामपंचायत सचिव शिवशंकर खेडेकर यांना तोंडी सांगून अथवा तक्रारवजा विनंतीअर्ज करूनदेखील त्यांनी या अर्जाची दखल घेतली नाही. किंवा, पंचायत समितीचे कुठलेही कर्मचारी घटनास्थळी आले नाही. सदर व्यक्तीने जागा बांधणे एक आठवडाभर बंद ठेवून रस्त्यामध्ये परत चालू केली आहे. मी शिवशंकर खेडेकर यांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधला असता, त्यांनी माझा फोन घेतला नाही, व पंचायत समितीकडून मला कोणत्याही प्रकारचे समाधानकारक उत्तर मिळालेले नाही. उलट अतिक्रमणामध्ये घर बांधणार्या व्यक्तीला पंचायत समितीकडून पाठिंबा देण्यात येत आहे. याबाबत आपण लवकरच पंचायत समितीला स्मरणपत्र देऊन जिल्हा परिषदेकडे ग्रामसचिव व पंचायत समिती अधिकार्याची तक्रार दाखल करणार आहे, असेही या तक्रारदाराने सांगितले आहे. चिखली पंचायत समितीमध्ये ग्रामीण भागातून येणार्या ग्रामस्थांचे प्रश्न सुटत नसल्याने ग्रामीण भागातील ग्रामस्थ हे पंचायत समितीच्या कर्मचार्यांबद्दल नाराजी व्यक्त करत आहेत. तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींनी पंचायत समितीमध्ये वाढता भ्रष्टाचार व ग्रामस्थांच्या समस्येकडे लक्ष द्यावे, अशी मागणीही ग्रामस्थ करत आहेत.