BULDHANACrimeHead linesLONARVidharbha

दुसरबीड येथील समृद्धी महामार्ग टोलनाक्यावर राडा; एकजण गंभीर जखमी; प्रवाशाने पिस्तुल काढल्याचा टोल कर्मचार्‍यांचा आरोप!

बुलढाणा/बिबी (जिल्हा प्रतिनिधी ) – समृद्धी महामार्गावरील नागपूर एक्झिट आयसी क्रमांक १२ दुसरबीड येथील टोल नाक्यावर काल (दि.४) दुपारी दोन वाजेच्या सुमारास जोरदार राडा झाला. टोलवरून महिला कर्मचारी व जालना येथील प्रवासी यांच्यात शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर या महिला कर्मचार्‍यांनी आपल्या पुरूष सहकार्‍यांना बोलावले असता, या प्रवाशांना धक्काबुक्की व मारहाण झाली. तर प्रवाशाने पिस्तुल काढल्याचा आरोप टोल कर्मचार्‍यांनी केला आहे. या मारहाणीत प्रवासी गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर जालना येथे वैद्यकीय उपचार सुरू आहेत. बिबी पोलिसांत याप्रकरणी टोल प्लाझाच्या मॅनेजरने तक्रार दाखल केली असून, तूर्त तरी बिबी पोलिसांनी संबंधित प्रवाशांविरोधात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास चालवला आहे. हे प्रवासीदेखील तक्रार दाखल करण्याची शक्यता आहे.

या घटनेबाबत समृद्धी महामार्गावरील टोलप्लाझा क्रमांक १२च्या मॅनेजरने बिबी पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीत नमूद आहे, की टोल नाक्यावर दिवसपाळीकरिता महिला कामगार काम करत असताना, ४ जुलैरोजी दुपारी दोन वाजून १५ मिनिटांनी मला फोन आला की, बूथ क्रमांक दोनवर गाडी क्रमांक एमएच २१ सीए ३५९९ मधील व्यक्ती हे महिला कर्मचार्‍यांशी वाद करत आहेत. त्यानुसार मी व सुपरवायझर अमोल पवार हे त्या बूथकडे जात असताना, रस्त्यामध्ये तीन लोक आमच्याकडे येताना दिसले. त्यांना काय झाले असे विचारले असता, त्यातील एकाने आमच्या सुपरवायझरला चापट व बुक्क्याने मारहाण केली. मी त्यांना सोडवायला गेलो असता, त्यांनी मलाही नाकावर चापट व बुक्क्यांनी मारहाण केली. आम्ही ऑफिसकडे पळालो असता, आमचे वरिष्ठ व्यवस्थापक राजू सर हेदेखील तेथे आले. त्यावेळी मारहाण करणार्‍यापैकी पांढरे शर्ट घातलेल्या व्यक्तीने हातात पिस्टल घेतल्याचे दिसून आले. त्यावेळी राजू सर यांनी मध्यस्थी करून त्या व्यक्तीच्या हातातील पिस्टल काढून घेतली व त्यांना तेथून जाण्यास सांगितले. मारहाण करणार्‍यापैकी दोघांची नावे वसीम तांबोळी व मौसीम तांबोळी असल्याचे असल्याचे या तक्रारअर्जात नमूद आहे. या तक्रारीवरून बिबी पोलिसांनी आरोपींविरोधात भारतीय न्यायसंहितेनुसार गुन्हे दाखल केले आहेत.

दरम्यान, या घटनेत संबंधित गाडीतील प्रवाशांनाही मारहाण झाली असून, त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे या प्रवाशांना जालना येथे दाखल करण्यात आलेले असून, त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. बिबी पोलिस लवकरच त्यांचा जबाब घेण्यासाठी जालना येथे जाणार आहेत. तसेच, हे जखमी प्रवासीही लवकरच बिबी पोलिसांत आपली तक्रार दाखल करणार असल्याची माहिती हाती आली आहे.
———–

टोल कर्मचार्‍यांची अरेरावी ही नेहमीचीच बाब!

दुसरबीड येथील टोल नाक्यावरील कर्मचारी हे अतिशय उद्धट असल्याचा अनुभव प्रवाशांना येत आहे. ते प्रवाशांना अरेरावी करतात. या अरेरावीतूनच ही घटना घडल्याचे घडल्याचे बोलले जात आहे. या घटनेत संबंधीत कारमधील प्रवासी व टोल नाक्यावरील कर्मचारी यांच्यात चांगलीच मारहाण झाली असून, प्रवाशांना जबर मार लागलेला आहे. त्यांनीही या घटनेत पोलिस तक्रार दाखल करण्याची गरज आहे. तसेच, बिबी पोलिसांनी निरपेक्ष तपास केला, तर टोल कर्मचार्‍यांचीही दादागिरी उघडकीस येण्याची शक्यता आहे.
———–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!