सोमठाणातील भगरीतून विषबाधाप्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चव्हाण निलंबीत
– मध्यरात्रीच पदावरून हटवले; डॉ. भागवत भुसारी आता नवे जिल्हा शल्यचिकित्सक
बिबी (ऋषी दंदाले) – सोमठाणा येथील भगरीतून विषबाधा झालेल्या ग्रामस्थांच्या उपचारांत हेळसांड झाल्याप्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांना राज्य सरकारने निलंबीत केले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने याप्रकरणाची दखल घेतल्यानंतर राज्य सरकारने डॉ. चव्हाण यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. त्यांच्या जागी आता डॉ. भागवत भुसारी यांच्याकडे जिल्हा शल्यचिकित्सक पदाचा पदभार देण्यात आला. सोमठाणा येथील भगरीतून विषबाधाप्रकरणी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने वाच्यता फोडली होती. ही घटना सर्वप्रथम ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’नेच राज्य सरकार व राज्यभर पोहोचवली होती.
जिल्हा शल्यचिकित्सकांचा निलंबन आदेश वाचण्यासाठी येथे क्लीक करा..
लोणार तालुक्यातील सोमठाणा येथे फेब्रुवारी महिन्यात प्रदासाच्या भगरीतून विषबाधा प्रकरण घडले होते. विठ्ठल-रूख्मिणी मंदिरातील उपवासाच्या फराळातून तब्बल दोनशे ग्रामस्थांना विषबाधेची ही बातमी सर्वप्रथम ब्रेकिंग महाराष्ट्रने प्रसारित केली होती. त्यामुळे राज्यभरात खळबळ उडाली होती. तसेच, रात्रभर प्रशासकीय यंत्रणादेखील कामाला लागली होती. सोमठाणा येथील भगवान नाडे यांच्या शेतातील मंदिरामध्ये १४ फेब्रुवारीपासून सप्ताह सुरू होता. सप्ताहाच्या सातव्या दिवशी एकादशी असल्याने समारोपाच्या दिवशी भाविकांसाठी भगर, आमटीचा प्रसाद तयार करण्यात आला होता. मात्र हा प्रसाद खाल्ल्यामुळे सोमठाणा आणि खापरखेड येथील काही महिला व पुरुषांना त्रास होऊ लागला होता. साधारण ४०० हूनअधिक भाविकांना यातून विषबाधा झाली होती. त्यामुळे त्यांना तातडीने बिबी येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे डॉक्टरच उपलब्ध नसल्याने खासगी प्रॅक्टीस करण्यात आलेल्या डॉक्टरांना बोलावण्यात आले. रुग्णांची वाढती संख्या पाहता रुग्णालयाच्या आवारातच ताडपत्री टाकून झाडाला दोरी बांधून रुग्णांना सलाईन देत उपचार सुरू करण्यात आले होते. याबाबतचे वृत्त ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने प्रसारित करतात, सदर वृत्त संपूर्ण देशभरामध्ये गाजले होते. याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने सदर घटनेची गंभीर दखल घेतली होती. बुलढाणा जिल्ह्यातील रूग्णांच्या दयनीय परिस्थितीबद्दल अॅमिकस क्युरी (निष्पक्ष सल्लागार) वकील मोहित खन्ना यांनी अनेक बातम्या सादर केल्यानंतर मुख्य न्यायमूर्ती डी. के. उपाध्याय आणि न्यायमूर्ती आरिफ एस. यांच्या खंडपीठाने सरकारला सविस्तर प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश त्यावेळी दिले होते. याच प्रकरणाचा फटका डॉ. चव्हाण यांना बसला आहे. सदर घटनेमुळे आरोग्य विभागाची लक्तरे वेशीवर टांगली गेली होती. आता उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य आरोग्य विभागाने डॉ. चव्हाण यांना निलंबित केले आहे. डॉ. चव्हाण यांच्या निलंबनानंतर मध्यरात्रीच अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.भागवत भुसारी यांच्याकडे डॉ. चव्हाण यांचा पदभार देण्यात आलेला आहे.
—————–
खापरखेड सोमठाणा येथे उपवासाच्या फराळातून दोनशे महिला-पुरूषांना विषबाधा