देऊळगाव घुबे (राजेंद्र घुबे) – सततची नापिकी, बँक, पतसंस्था व काही खासगी कर्जे यामुळे नैराश्यात गेलेल्या अवघ्या चाळीसवर्षीय तरूण शेतकर्याने आज (दि.४) सायंकाळच्या सुमारास लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. देऊळगाव घुबे येथील शेतकरी गणेश भानुदास घुबे (वय ४०) हे मकाच्या शेतात दिवसभर कोळपणी करून बैलांना चारापाणी घालून शेतात बांधल्यानंतर, शेतातील लिंबाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. ही माहिती कळताच जवळपास शेतात काम करणारे इतर शेतकरी घटनास्थळी धावून गेले, पण तोपर्यंत सर्वकाही संपले होते.
गणेश घुबे यांच्या कुटुंबांमध्ये वयोवृद्ध आई, वडील व पत्नी एक सात वर्षांच्या मुलगा आणि दहा वर्षाची मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या नावावर सेंट्रल बँक शाखा गांगलगाव व धनश्री नागरी सहकारी पतसंस्था देऊळगाव घुबे या दोन बँकांचे कर्ज होते. सतची नापिकी व निसर्गाचा ढासाळलेला समतोल यामुळे त्यांची शेती तोट्यात आली होती. शेतातून काहीच उत्पन्न निघत नसल्याने लहान मुले यांचा शिक्षणाचा खर्च व वयोवृद्ध आई-वडील व कुटुंबातील गरजा भागविण्यासाठी स्वतःच्या नावावर असलेली काही जमीन विकूनदेखील कर्ज कमी झाले नव्हते. त्यामुळे गणेश घुबे हे प्रचंड खचले होते. सातत्याने येणार्या अडचणी कशा भागविणार, या विचाराने हतबल होऊन आज त्यांनी अखेर आपली जीवनयात्रा संपवली.
राज्यातील सरकारच्या नाकर्तेधोरणामुळे एका तरूण शेतकर्याला जीव द्यावा लागल्याने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेची माहिती मिळताच अंढेरा पोलिस स्टेशनचे ठाणेदार विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार कैलास उगले व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करून मृतदेह शवपरीक्षणासाठी चिखली येथे पाठवून पुढील तपास सुरू केला आहे. मयत घुबे यांच्या कुटुंबीयांना तातडीने आर्थिक मदत देऊन त्यांचे कर्ज माफ करण्याची मागणी पुढे आली आहे.