शिवसेनाप्रमुखांचा होता हात.. पक्षप्रमुखांना दाखवला हात? असाही प्रताप..
बुलडाणा(✍️ राजेंद्र काळे) :- ‘प्रताप जाधव बोलतोय..’ असं फोनवरुन बोलणारे खा.प्रतापराव जाधव. अधिकाऱ्यांसाठी ते साहेब, कार्यकर्त्यांसाठी भाऊ, तर कुटुंबियासाठी ते नाना.. अशा त्यांच्या नाना तऱ्हा. प्रचंड राजकीय रसायन त्यांच्यात ठासून भरलेलं, त्यात ते बालाजीभक्त-विठ्ठलभक्त. विविध गुरु व बाबांवर त्यांची श्रध्दा असल्याने.. अगदी निवडणूक ते निकालादरम्यान एका ठिकाणी झालेल्या भंडाऱ्यात त्यांनी श्रध्देपोटी घातलेलं लोटांगण, अनेकवेळा पालखीसोबत त्यांनी केलेली खामगाव ते शेगांव पायीवारी..
खरंच प्रतापराव म्हणजे, अफलातून प्रताप!
मादणी ते दिल्ली, हा त्यांचा प्रताप (सॉरी प्रवास!) तसा थक्क करुन सोडणारा. मेहकरला त्यांनी ‘अडत’ टाकली, अन् तिथूनच खऱ्याअर्थानं राजकीय दुकानदारी सुरु केली. आधी ते शरद पवारांच्या अर्स काँग्रेसमध्ये होते, पण पवार १९८५ च्या दरम्यान राजीव गांधींसोबत इंदिरा काँग्रेसमध्ये गेले अन् प्रतापराव शेतकरी संघटनेच्या चळवळीकडे वळले. तो काळ शिवसेना रुजविण्याचा होता. दिलीपराव रहाटे हे आधी मेहकरचे तालुकाप्रमुख व नंतर जिल्हाप्रमुख बनले, तिकडे रहाटे-इकडे बाळासाहेब कोरके.. घाटावर शिवसेनेचा झंझावात तयार होवू लागला. घाटाखाली जनसंघ व नंतर भाजपा आल्याने शिवसेनेला हिंदुत्वाची स्पेस अगदी आजपर्यंतही मिळू शकली नाही. म्हणून अजूनही लोकसभेसाठी घाटाखाली सेनेची ताकद भाजपाचा मतदारच राहिली आहे. कदाचीत त्यामुळेच प्रतापरावांचा कल भाजपाकडे झुकला असणार,
व्हाया शिंदे गट.. तो विषय नंतर घेवू!
तर रहाटेंचे वयाच्या अवघ्या २८व्या वर्षी अॅटॅकने निधन झाले. रहाटेंच्या काळात तालुका संघटक असणारे प्रतापराव जाधव मग शिवसेना जिल्हाप्रमुख बनले. घरावर तुळशीपत्र ठेवून त्याकाळी शिवसेना बांधायला त्यांनी सुरुवात केली. म्हणून आज ते ‘गद्दार’ म्हणविणाऱ्यांना उत्तर देतांना, आम्हीही शिवसेना वाढीसाठी ‘रक्ताचे पाणी’ केल्याचे सांगतात. अर्थात हे वास्तव नाकारुन चालणार नाही.
प्रतापरावांनी १९८९ मध्ये खरेदी-विक्री संघाची निवडणूक पहिल्यांदा लढवून ती जिंकली, मात्र १९९० मध्ये अवघ्या १० हजार मतांनी त्यांना सुबोध सावजींकडून पराभव पत्करावा लागला होता. १९९२ मध्ये त्यांनी थोडं डिमोशन करत शिवसेनेच्या तिकिटावर दे.माळी सर्कलमधून जिल्हा परिषदेची निवडणूक जिंकली, व मिनी मंत्रालयात शिवसेनेचा प्रवेश झाला, नंतर अवघ्या तीनच वर्षात आलेल्या विधानसभा निवडणुकीत १९९५ला त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर लढणाऱ्या सावजींना मात देवून पहिल्यांदा भगवा फडकवत प्रतापगडाची वीट रचल्या गेली. त्यावेळी राज्यात सेना-भाजपाचे सरकार आले होते, मनोहर जोशी मुख्यमंत्री होते. पहिल्यांदा आमदार झालेल्यांना मंत्री करायचे नाही, असे धोरण ठरलेले असतांना दुसऱ्याच मंत्रीमंडळ विस्तारात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने ते राज्यमंत्री बनले. क्रीडा, युवक व सांस्कृतीक खात्याचा पदभार त्यांच्याकडे देण्यात आला होता. पुढे मुख्यमंत्री बदलले, पण प्रतापराव राज्यमंत्री म्हणून कायम राहिले. फक्त खाते बदलले, त्यांच्याकडे पाटबंधारे आले. बुलडाणा जिल्हा पालकमंत्रीपद भाजपाकडे असल्याने, त्यांना स्वजिल्ह्यात मात्र झेंडा फडकविता आला नाही.. ते अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बनले. त्याचदरम्यान बुलडाणा लोकसभा मतदार संघात खासदार म्हणून आनंदराव अडसूळ यांचा प्रवेश झालेला होता. अडसूळ हे आमदार म्हणून विजयराज शिंदेंना फेवर होते, तेव्हापासूनच त्यांच्यात व अडसूळांमध्ये बेबनाव व्हायला सुरुवात झाली. अगदी पुढे जिल्हाप्रमुखांच्या निवडीवरुनही दोघांचे वाजले होते. १९९९ व नंतर २००४ला विजय मिळवत प्रतापरावांनी आमदारकीची हॅट्रीक केली. २००९ ला मेहकर मतदार संघ राखीव झाला, व प्रतापरावांची पावलं बुलडाणा मतदार संघातून लोकसभेकडे वळली. त्यांच्याविरोधात होते तत्कालीन मंत्री ना.डॉ.राजेंद्र शिंगणे. शिंगणे साहेब मंत्री आहेच, पण प्रतापराव पडलेतर ते थेट वखरावर जातील.. अशा विविध भावनिक मुद्द्यांवरुन व घाटाखाली मिळालेली अभूतपूर्व साथ.. त्यातून थोड्या मताने प्रतापराव विजयी झाले. २०१४ ला मोदीलाट होती, तरीही बाळासाहेबांप्रती मतदारांनी वाहिलेली ही आदरांजली आहे.. अशी भावयुक्त भावना विजयानंतर प्रतापरावांनी मांडली होती. २०१९ला तर मोदी त्सुनामीच होती, हा भाग वेगळा!
खा.प्रतापराव जाधव हे आजपर्यंतच्या राजकीय आयुष्यात एकूण ८ वेळा सेनेच्या धनुष्यबाणावर लढले. १९९०चा पराभव वगळता प्रत्येकवेळी ते जिंकून आले. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातली बाळासाहेब ठाकरे यांची पहिली सभा १९८९ ला मेहकरला झाली होती, ती सभा प्रतापरावांची राजकीय मुहूर्तमेढ रोवणारी होती. पुढे शिवसेनाप्रमुखांच्या आशिर्वादानेच प्रतापरावांना मंत्रीपद मिळाले. शिवसेनाप्रमुखांचा हात प्रतापरावांवर राहिला. त्या आशिर्वादाचे भावनिक बॅनर हरेक लोकसभा निवडणूकीत प्रतापरावांप्रती ‘इमोशनल टच’ करणारेच ठरले. हे झाले शिवसेनाप्रमुखांचे, पक्षप्रमुख असणाऱ्या उध्दव ठाकरेंच्या तिनही लोकसभा निवडणुकी दरम्यान खामगावात झालेल्या विराट सभा, प्रतापरावांसाठी विजयाची पायाभरणी करणाऱ्या ठरल्या. प्रतापरावांकडील कौटुंबिक विवाह सोहळ्यात मेहकरला येवून पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंनी आशिर्वादावर हजेरीही लावली. म्हणजे बाळासाहेब असो की उध्दव ठाकरे, इतिहास बघितलातर त्यांनी प्रतापरावांना कुटुंबातील एक घटकच मानले. राज्यमंत्री पदाची शपथ घेवून बाळासाहेबांच्या आशिर्वादासाठी प्रतापराव जाधव जेव्हा ‘मातोश्री’वर पोहोचले होते, तेव्हा बाळासाहेबांनी शिवैनिकांच्या माँसाहेब मिनाताई ठाकरे यांना त्यांचे औक्षण करायला लावून प्रतापरावांप्रती पुत्रत्वाचा भाव व्यक्त केला होता. पुढे मिनाताई गेल्यावर लोकसभा निवडणूक जिंकल्यावर ‘मातोश्री’वर सौ.रश्मीताई ठाकरे यांनी प्रतापरावांचे औक्षण केले. तुम्ही कोणत्याही पक्षात जा, असं ‘तेजोवलय’ मिळणार नाही. तर आता-आता युवासेनेच्या माध्यमातून ऋषी जाधव यांना बळ देण्यासाठी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनीही मेहकरला जाहीर सभा घेतली होती. नुकतीच ऋषीची युवासेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीतही निवड झाली होती.
एवढा इतिहास उगाळण्याचं कारण, हल्ली सोशल मिडीयातून फक्त वर्तमानावर भाष्य असतं. बंडासाठी फक्त अडीच वर्षाची पटणारी कारणं पटवून सांगितली जातात, साडे३ दशकं कोणी मागे वळून पाहत नाही.. कारण रिल्स व शेअर चॅटच्या जमान्यात तेवढा कुणाला वेळंही नाही. बापानं फक्त मटक्यात गमावलेला पैसाच वायलं (म्हणजे वेगळं..) होण्यासाठी पोरगा पाहतो, पण मंडकं-मडकं जमा करुन बापानं उभा केलेला संसार तो पाहत नाही. इन्स्टंट कारणं लोकांना पटतात, कारण जमानाच फास्टफुडचा आहे.. पण कोसळत असतांना ते उभारण्यासाठीचे श्रम-संघर्षाचा विचार कोणी करत नाही. वाजपेयीच म्हणाले होते – ‘पार्टीया बनेगी-बिगडेगी, लेकीन ये देश रहना चाहिए.. देश का लोकतंत्र रहना चाहिए!’ तीच काळाची गरज आहे.
खा.प्रतापराव जाधव यांनी घेतलेला निर्णय हा कोणत्या मानसिकतेतून घेतला असावा? हे भाजप जाणे.. अर्थात ‘वृंदावन’मधील बैठकीत ८० टक्के पदाधिकाऱ्यांनी मूळ शिवसेना न सोडण्याची ‘भावना’ व्यक्त केली असलीतरीही. २०२४ साठी हा निर्णय त्यांच्यासाठी काळाची गरज असेलही. ठाकरेंना सोडतांना ते सांगत असलेली कारणे लाख खरेही असतील. संजय राऊत व चांडाळ चौकडी बोगस असेलही. अगदी प्रतापराव आज १०० नाहीतर १०१ टक्के बरोबर असतील सुध्दा. कारण ‘इमोशनल’ होण्यापेक्षा ‘प्रॅक्टीकल’ होणं महत्वाचं, हेच आजचं राजकारण आहे. प्रतापरावांनी शिवसेना वाढीसाठी रक्ताचे पाणी केलेच आहे, हा सुध्दा बुलडाणा जिल्ह्यासाठी इतिहास आहे. प्रतापरावांप्रती अगदी ‘न्युट्रल’ होवून विचार केलातर, त्यांच्या नेतृत्वापेक्षाही त्यांचे व्यक्तीमत्व सर्वसामान्यांना जवळचे वाटणारे आहे. आमदार व खासदारकीची हॅट्रीक मारुन सुध्दा त्यांच्यात कुठलाच ‘अॅटीट्यूड’ कधीच नसतो, म्हणून हे नेतृत्व नकळत अनेकांना जवळचं वाटतं. लोकांना आपलासा वाटणारा हा लोकनेता आहे. याच लोकनेत्यावर शिवसेनाप्रमुखांचा आशिर्वादपर हात होता. प्रत्येक लोकसभा निवडणूक प्रचारात तो भावनिक हात मतदारांना साद घालत होता. गुरुपौर्णिमेला तोच बाळासाहेबांचा हात खा.जाधव यांच्या पोस्टमध्ये राहत होता. हा जर विचार केलातर, शिवसेनाप्रमुखांचा होता हात.. असे म्हणत असतांना शिंदे गटात गेल्यानंतर म्हणावे लागेल.. पक्षप्रमुखांना दाखवला हात.
अर्थात
प्रतापरावांचा असाही प्रताप!