– जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष
– पालक, ग्रामस्थांच्या निवेदनाला दाखवल्या वाटाण्याच्या अक्षता
खामगाव (प्रतिनिधी) – खामगाव तालुक्यातील पाळा येथील शाळेवर शिक्षक देण्यात यावेत, या मागणीसाठी अखेर पालक व ग्रामस्थांनी आंदोलनाचे शस्त्र उपासले आहे. वर्ग एक ते सातच्या वर्गांना फक्त तीनच शिक्षक शिकवत असून, त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. शिक्षक देण्याबाबत पालक व ग्रामस्थांनी वारंवार निवेदने दिली आहेत. मात्र जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने या निवेदनांना केराची टोपली दाखवली. त्यामुळे आजपासून अखेर पाळा ग्रामस्थांनी शाळेवर बहिष्कार व बेमुदत साखळी उपोषण सुरु केले आहे.
सविस्तर असे, की खामगाव तालुक्यातील पाळा येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये वर्ग एक ते सात असून, एकूण विद्यार्थी संख्या १३६ आहे. कार्यरत शिक्षक मात्र तीनच आहेत. गेल्या एक वर्षापासून पंचायत समिती गटविकास अधिकारी राजपूत साहेब, गटशिक्षणाधिकारी श्री गायकवाड साहेब, तसेच जिल्हा परिषदेचे जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री पागोरे साहेब यांच्याकडे वेळोवेळी शिक्षक मागणीचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सर्व सदस्य तसेच ग्रामपंचायत सरपंच व सर्व सदस्य तसेच पालकांनी वेळोवेळी निवेदने दिलेली आहेत. परंतु, या निवेदनांची अद्यापही दखल घेतलेली नाही. बिंदू नियमावलीनुसार पोर्टललाही तक्रार देऊनही अद्याप पावेतो एकही शिक्षक मिळाला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी व प्राथमिक शिक्षणाधिकारी पागोरे यांचे डोळे उघडण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सर्व सदस्य, ग्रामपंचायत सरपंच व सदस्य व सर्व विद्यार्थ्यांचे पालक यांनी शाळा बंद आंदोलन सुरु केले आहे. ग्रामस्थांनी आज, गुरूवार (दि.२१)सकाळपासून शाळा बहिष्कार व बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे. यामध्ये प्रामुख्याने शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष ्दत्ता मावळे, उपाध्यक्ष सतीश हजारे, शिक्षणतज्ञ राधाकृष्ण गाढवे, सरपंच कविताताई खटके, ग्रामपंचायत सदस्य जयराम माळशिकारे, भागवत वनारे, सुनिल गाढवे, संतोष खटके, विश्राम सांगळे, मधुकर सांगळे, तुळशिराम आटोळे, तुकाराम गावडे, भगवान पनखुले, नारायण आटोळे, ओम गाढवे, नारायण ठनके, हरी खोमणे, अमोल वाघ, नारायण खराबे व इतर सर्व ग्रामपंचायत सदस्य शाळा व्यवस्थापन समिती सदस्य आणि सर्व पालक मंडळी व गावकरी यांचे हे शाळा बंद आंदोलन व साखळी उपोषणात सहभागी झालेले आहेत. यापैकी कुणाचे काही बरेवाईट झाल्यास त्याला सर्वस्वी जबाबदार जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे अधिकारी राहतील, असा इशारा ग्रामस्थांनी दिलेला आहे.
प्राथमिक शिक्षणाधिकारी किशोर पागोरे करतात काय?; ग्रामस्थ संतप्त!
पाळा (ता. खामगाव) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत एक ते सातपर्यंत वर्ग आहेत. या वर्गात १३६ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तर या सात वर्गांना फक्त तीनच शिक्षक शिकवतात. विद्यार्थ्यांची शैक्षणिक हेळसांड आणि तीनच शिक्षकांवर अतोनात अध्यापन ताण पडत असताना, ही बाब ग्रामस्थ व शिक्षण समितीने जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी किशोर पागोरे यांच्या कानावर टाकलेली आहे, तसेच निवेदनही दिले असल्याचे ग्रामस्थांनी सांगितलेले आहे. तरीही पागोरे यांनी येथे शिक्षक का दिले नाहीत? हा प्रश्न आहे. पागोरे हे करतात काय?, त्यांना या गंभीरप्रश्नी तेथे जाऊन दाखल का घ्यावी वाटली नाही, असा संतप्त सवालही ग्रामस्थ करत आहेत.
—————