विदर्भ हादरला! अमरावती विभागातून ८१२ महिला, मुली बेपत्ता!! गेल्या कुठे?
– अमरावती विभागातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात ८१ दिवसात ८१२ महिला व तरुणी झाल्या बेपत्ता!
संजय शिराळ
बुलडाणा : महाराष्ट्रामध्ये महिला व तरुण मुलींचे बेपत्ता होण्याचे प्रमाण दिवसेंनदिवस मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने ही एक चिंतनीय बाब आहे. तर घराची प्रतिष्ठा धुळीस मिळू नये यासाठी कित्येक मुलींचे वडील पोलिस स्टेशनला फिर्याद देण्याचे टाळतात. त्यामुळे ती आकडेवारी बाहेर येणे शक्य नाही. यामधील काही महिला व तरुण मुली घरी परतल्या असतील, काही मुलींनी लग्न करुन तसे पोलिस विभाग किंवा कुटुंबीयांना अवगत केले असेल. परंतु एकच प्रश्न पडतो मुली व महिलांचे बेपत्ता होण्याचे प्रमाण का वाढले? हे एक कोडंच निर्माण झाले आहे. अमरावती विभागातील ८१ दिवसात ८१२ महिला व तरुण मुली बेपत्ता झाल्याची भयावह आकडेवारी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ला मिळाली आहे. महिला व तरुणी बेपत्ता होण्यामागे सेक्स रॅकेट तर सक्रीय नाही ना?, असा प्रश्न या अनुषंगाने उपस्थित केल्या जात आहे.
बेपत्ता झालेल्या मुलींचे काय झाले असेल याबाबत अडीच वर्षापूर्वी अधिवेशनामध्ये प्रश्न् सुध्दा उपस्थित करण्यात आला होता. त्या अनुषंगाने संबंधीत जिल्ह्याचे पोलिस अधीक्षकांनी पोलिसांना बेपत्ता महिला व मुलींचे अहवाल सादर करण्याचे आदेश देवून त्यासाठी प्रत्येक पोलिस स्टेशनमध्ये महिला व पुरुष पोलिस अधिकार्यांच्या नियुत्तäया सुध्दा करण्यात आल्या आहेत. परंतु काळ गेला वेळ गेला अशीच त्याची परिस्थीती झाली आहे. शासन महिलांवरील अन्याय, अत्याचार करण्यासाठीr विविध योजना राबवित असून, तसे शेकडो शासन निर्णय काढले आहेत. परंतु तशी व्यवस्था, तेवढे मनुष्यबळ कदाचीत पुरविल्या गेल्या नसल्याने शासन निर्णयाला फक्त कागदावरच महत्व प्राप्त झाल्याने महिलांवर होणारे अन्याय, अत्याचार मोठ्या प्रमाणात वाढत आहे. शासन व प्रशासनाचे धोरण म्हणजे ‘धरल तर चावतेय सोडलतर पळतेय’ अशी झाली आहे.
जिल्ह्यासह महाराष्ट्रभर शेकडो, हजारो तरुण मुली व महिला बेपत्ता होत आहे. पुढे त्या मुलींचे काय झाले? त्या सध्या कुठे आहेत? त्या सुरक्षित आहे की, त्यांना दलालांनी वेश्या व्यवसायाकडे वळविले, याचे खर कारण बाहेर येणे अपेक्षित असतांना राजकीय पक्षाच्या लोकप्रतिनिधी महिला तसेच महिलांच्या हक्काविषयी काम करणार्या महिला मंडळ किंवा सामाजिक कार्यकर्ते या गंभीर विषयावर कोणीही कोणत्याही प्रकारचा प्रश्न उपस्थित नसल्याची ही एक शोकांतीकाच आहे. महिला व तरुण मुली बेपत्ता होण्याबाबत राज्याचे गृहविभागाला कुणी जाब विचारला नाही, की गृहविभागाने बेपत्ता महिला व मुली सध्या कुठे आहेत याचा आकडा जाहीर न केल्याने त्या महिलांचे काय झाले असेल, हे एक कोडचं बनलं आहे. राज्यात महिला व तरुणी बेपत्ता होण्यामागे कोणते सेक्स रॅकेट तर सक्रीय नाही ना? असा प्रश्न काही जाणकारांकडून उपस्थित होत आहे.याकडे राज्याच्या गृहविभागाने लक्ष देवून महिलांना बेपत्ता करणारे रॅकेट तर सक्रीय नाही ना, त्याचा शोध घेवून त्यांच्यावर वेळीच कारवाई करणे गरजेची मागणी सर्वसामान्य महिलांकडून होत आहे.
खरी माहिती बाहेर येणे गरजेचे!
ब्रेकिंग महाराष्ट्रला पोलिस विभागाच्या संकेत स्थळावरील मिळालेल्या आकडेवारीनुसार अमरावती विभागात १ मे ते २० जुलै या ८१ दिवसाच्या कालावधीमध्ये ८१२ महिला व तरुणी बेपत्ता झाल्या आहेत. यापैकी काही तरुणी व महिला घरी परतल्या असतील, काही पळून गेल्याने मुली लग्न करुन परतल्या असतील किंवा आई-वडिलांच्या संमतीने त्यांचे पळून गेलेल्या मुलासोबत लग्न लावून दिले असेल, परंतु ज्या मुली व महिला घरी परतल्याच नाही किंवा त्यांचा कोणत्याही प्रकारचा थांगपत्ता लागला नाही, त्या सध्या कुठे व कोणत्या परिस्थितीमध्ये आहेत. याची खरी माहिती बाहेर येणे गरजेचे आहे.
महिला मंडळ व लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे
ज्या महिला व तरुणींचा थांगपत्ता लागलेला नाही, त्यांची माहिती बाहेर आणण्यासाठी महिला मंडळ, महिला लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार यांनी प्रश्न उपस्थित करुन महिला व मुली बेपत्ता होण्यामागे रॅकेट तर सक्रीय नाही. याची सत्यता बाहेर आणण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, अन्यथा मुलींचे बेपत्ता होण्याचे प्रमाण भविष्यात असेच वाढत राहिले तर मुली व महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर त्यांच्या सुरक्षा करणारे शासन निर्णयाचे अस्तित्व कागदावरच राहील, एवढे मात्र निश्चीत!
जिल्हानिहाय बेपत्ता झालेल्या महिला व तरुणींची धक्कादायक आकडेवारी
अमरावती विभागातील बुलडाणा, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ या पाच जिल्ह्यात १ मे ते २० जुलै २०२२ या ८१ दिवसाच्या कालावधीमध्ये ८१२ महिला व तरुण बेपत्ता झाल्या आहेत. यामध्ये बुलडाणा जिल्ह्यामध्ये मे महिन्यात ७४, जून महिन्यात ७१ तर २० जुलैपर्यत २५ अशा एकूण १७० महिला व तरुणी बेपत्ता झाल्या आहेत. अकोला जिल्ह्यात मे महिन्यात ४२, जून महिन्यात ४० तर २० जुलैपर्यंत २१ अशा एकूण १०३, तर अमरावती जिल्ह्यात अमरावती शहर विभागात मे महिन्यात २७, जून ४१ तर २० जुलैपर्यंत २९ अशाप्रकारे ९७ महिला व तरुणी बेपत्ता झाल्यात. अमरावती ग्रामीणमधून मे महिन्यात ६६, जून महिन्यात ५४ तर २० जुलैपर्यंत ५२ अशाप्रकारे १७२ महिला व तरुणी बेपत्ता झाल्या आहेत. वाशिम जिल्ह्यातील मे महिन्यात २६ तर जून महिन्यात २८ तर २० जुलैपर्यंत २२ महिला अशाप्रकारे एकूण ७६ तरुणी बेपत्ता झाल्या तर यवतमाळ जिल्ह्यात मे महिन्यात ९३, जून महिन्यात ६९ तर २० जुलैपर्यंत ३२ अशाप्रकारे एकूण १९४ महिला व तरुणी बेपत्ता झाल्या आहेत.
—————