AalandiHead linesPachhim Maharashtra

मानाच्या दहा पालख्यांपैकी सहा पालख्यांतील 344 दिड्यांना शासकीय अनुदानास मान्यता

– उर्वरित दिंड्यांनाही लवकर मिळणार अनुदान

आळंदी (अर्जुन मेदनकर) – राज्यातील मानाच्या दहा पालखी सोहळ्यापैकी सहा पालखी सोहळ्यातील ३४४ दिंड्यांना प्रत्येकी २० हजार रुपये प्रमाणे ६८ लाख ८० हजार रुपये अनुदान देण्यास पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी प्रशासकीय मान्यता दिली असल्याची माहिती शिवसेना धर्मवीर वारकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष हभप अक्षय महाराज भोसले यांनी दिली. दरम्यान, एकूण दीड हजार दिंड्यांनी अनुदानासाठी प्रस्ताव दिले असून, उर्वरित दिंड्यांनाही लवकरच अनुदान मंजूर होईल, असेही हभप. भोसले महाराज यांनी सांगितले.
हभप. अक्षय महाराज भोसले

सविस्तर असे, की आषाढी एकादशीपुर्वी राज्यातील मानाच्या दहा पालखी सोहळ्यातील सुमारे १५०० दिंड्याना वारकरी दिंडी सन्मान निधी योजनेची २० हजार रुपये रक्कम थेट लाभधारक दिंडी किंवा दिंडी चालक यांच्या नावावर जावी, याबाबत शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेचे प्रमुख अक्षय महाराज भोसले यांनी शासन दरबारी जोरदार प्रयत्न केले होते. पालखी सोहळ्याबरोबर चालणा-या असंख्य दिंड्या या परंपरेने चालत असल्यामुळे त्या धर्मादाय आयुक्तांकडे नोंदण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे शासनाने जरी अनुदान जाहीर केले, असले तरी त्यांच्या कागदपत्रांची पुर्तता त्यांना करणे शक्य नसल्याने या दिंड्याना शासनाच्या अनुदानाचा प्रत्यक्ष लाभ मिळणे अशक्य होते. त्यामुळे हे अनुदान दिंडी चालकाच्या नावावर मिळावे, अशी मागणी दिंडी चालकांनी केली होती. त्यानुसार मानाच्या दहा पालख्यातील सुमारे १५०० दिंड्यांच्या नावावर किंवा नोंदणीकृत नसलेल्या दिंड्यांच्या चालकांच्या नावावर अनुदानाची २० हजार रुपये रक्कम जमा करण्यात येणार आहे.
राज्यातील दहा मानाच्या पालखी सोहळ्यापैकी संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव, संत मुक्ताबाई, संत एकनाथ, संत चांगावटेश्वर व मातारुक्मिणी या ६ अधिकृत मानाच्या पालखी सोहळ्यात चालणा-या सुमारे ३४४ दिंड्यातील सुमारे तीन लाख वारक-यांना या अनुदानाचा लाभ मंजूर करण्यात आला असल्याचे हभप अक्षय महाराज भोसले यांनी सांगितले. सदर दिंडीचे खाते असल्यास खात्यावर किंवा दिंडी प्रमुखाच्या खात्यावर निधी वर्ग करण्यात येईल, असे सांगून संत ज्ञानेश्वर , संत तुकाराम , संत नामदेव व संत निळोबाराय या पालखी सोहळ्यात चालणा-या दिंडी प्रमुखाचे खाते क्रमांक, बँक नाव, बँक शाखा व आयएफएससी कोडं ही माहिती उपलब्ध होताच, अनुदानाची रक्कम सदर दिंडीच्या किंवा दिंडीचालकाच्या बॅंक खात्यावर जमा करण्यात येइल, असे ते म्हणाले.
————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!