भक्ती महामार्गाविरोधात शेतकरी रस्त्यावर; चिखलीत तब्बल दोन तास रास्ता रोको!
– महामार्गबाधीत शेतकर्यांसोबत मोठ्या संख्येने सामाजिक कार्यकर्त्यांचा आंदोलनात सहभाग
चिखली (तालुका प्रतिनिधी) – गरज नसलेला सिंदखेडराजा ते शेगाव हा भक्ती महामार्ग तातडीने रद्द करावा, या मागणीसाठी महामार्गविरोधी कृती समितीच्या नेतृत्वात सर्व शेतकरी आज (दि.४) सकाळी साडेआठ वाजता रस्त्यावर उतरले होते. महामार्गविरोधी कृती समितीच्यावतीने चिखली शहरातील खामगाव चौफुली येथे रस्ता रोको करण्यात आला. नागपूर-पुणे व जालना – मलकापूर राज्य मार्गावरील वाहतूक शेतकर्यांनी तब्बल दोन तास रोखून धरली. प्रस्तावित सिंदखेडराजा – शेगाव महामार्ग करण्यात येऊ नये, यासाठी गेल्या पाच महिन्यांपासून महामार्गविरोधी कृती समितीच्यावतीने वेगवेगळी आंदोलने सुरू आहेत.
भक्ती महामार्गाच्या निर्मितीला बुलढाणा जिल्ह्यातील शेतकर्यांकडून तीव्र विरोध होत आहे. शेतकरी विरोध करत असतानादेखील राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार याकडे गांभीर्याने पाहत नसल्याचा आरोप भक्ती महामार्गबाधीत शेतकरी करत आहेत. हे सरकार शेतकर्यांच्या भावनांचा विचार करत नाही, म्हणून शेतकरी संतप्त झाले आहेत. आजच्या आंदोलनात महामार्गबाधीत शेतकर्यांसोबत सामाजिक कार्यकर्ते व काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (ठाकरे) पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना व मनसेसह राजकीय पक्षातील पदाधिकारीसुद्धा सहभागी झाले होते. कोणतीही मागणी नसतांना गरज नसलेला हा महामार्ग तयार करून शेतकर्यांना भूमिहीन करू नये, या मागणीला त्यांनी सक्रीय पाठिंबा दिला. शेती व शेतकरी वाचविण्यासाठी आम्ही कायम शेतकर्यांसोबत राहू. त्यासाठी वेळप्रसंगी सरकारने आमच्यावर गुन्हे दाखल केले तरी ते सहन करू, असा आक्रमक पवित्रा या वेळी राजकीय पदाधिकार्यांनी घेतल्याचे दिसून आले. शेतकर्यांमध्ये एकजूट कायम ठेवण्याचा आणि महामार्ग रद्द होइपर्यंत एकजूट राहण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. चार-दोन ठेकेदार, भूमाफिया, रेतीतस्करी करणारे धनदांडगे हा भक्तीमार्ग व्हावा, असा कट रचत असतील, तर तो त्यांचा कावा हाणून पाडल्या जाणार असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया कृती समितीतील आंदोलकांकडून व्यक्त करण्यात आल्या. रास्ता रोकोदरम्यान चिखलीतून जाणार्या राष्ट्रीय महामार्गावर अनेक वाहने अडकून पडल्याने काहीकाळ वाहतूक व्यवस्था बाधीत झाली होती. या रास्ता रोकोदरम्यान अनुचित प्रकार घडू नये म्हणून, चिखली पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त लाण्यात आला होता.
या रास्ता रोको आंदोलनात बुलडाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार राहुल बोंद्रे, डॉ.सत्येंद्र भुसारी, शेतकरी नेते विनायक सरनाईक, डॉ.ज्योतीताई खेडेकर, गणेश बरबडे, श्रीकिसन धोंडगे, अशोकराव पडघान, संतोष वानखेडे, विष्णू पाटील कुळसुंदर, दीपक म्हस्के, श्रीराम झोरे, नीलेश अंजनकर, विजयाताई खडसन, डॉ. संजय गवई, दासा पाटील, कपील खेडेकर, रामभाऊ जाधव, नारायण देशमुख, प्रदीप भवर, शिवनारायण म्हस्के या राजकीय मंडळीसह शेतकरी समाधान म. म्हस्के, बंडू जाधव, गणेश म्हस्के, साहेम खेडेकर, विजय वाघ, विठोबा मुंडे, गणेश म्हस्के, नितीन म्हस्के, शिवा म्हस्के, मुरलीधर सपकाळ, जगदेव म्हळसणे, राजू म्हस्के, अशोक अंभोरे, हर्षल म्हस्के, बबन आंभोरे, भारत म्हस्के, रामभाऊ म्हस्के, अच्युतराव म्हस्के, राजेंद्र म्हस्के, मदनराव म्हस्के, पांडुरंग म्हस्के, तुळशिराम डिगोळे, अंबादास वाघमारे, राहुल ठोंबरे, ऋषी वाघमारे, राजेंद्र मोरे, माधवराव तोरमळे, विश्वंभर जाधव, मधुकर वाघ, समाधान खेन्ते, मधुकर ढवळे, विठोबा ढवळे, परमेश्वर म्हळसणे, चेतन म्हस्के, भारत म्हस्के, मनोज जाधव, विठ्ठल शेळके, सतिष उगले, राम आंभोरे, मंगेश मोरे, श्रीकांत म्हस्के, माधुरी म्हस्के, वंदना सपकाळ, मंदाताई म्हळसने, सिंधुताई सपकाळ, कलाताई सपकाळ, कैलास ढोबरे, मधुकर ढोंबरे, गोपाल मरकड, रंजित करंडे, वनीता म्हस्के, स्वाती म्हस्के, सुलाबाई म्हस्के, राजाराम ढोंबरे, रामदास ढोंबरे, दीपक ठोबरे, करण ठोंबरे, गजानन म्हस्के यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते.
———-
परीक्षार्थी विद्यार्थी, स्कूल बसेस, रुग्णवाहिकांना दिली वाट मोकळी करून!
सिंदखेडराजा ते शेगांव हा प्रस्तावीत भक्ती महामार्ग रद्द व्हावा म्हणून गेल्या काही दिवसांपासून कृती समितीच्या माध्यमातून जिल्हाभरातून या महामार्गाला विविध आंदोलनातून विरोध होत आहे. याचाच एक भाग म्हणून आज चिखली खामगांव चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी पुणे-नागपूर, तसेच मलकापूर-सोलापूर, बुलढाणा-जालना या मार्गावरील वाहतूक रोखल्याने वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती. दरम्यान, आंदोलकांनी रूग्णवाहिका, शाळकरी मुलांची वाहने, तसेच विविध परीक्षांकरीता राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणार्या परीक्षार्थींच्या वाहनांना मात्र या रास्ता रोकोतून वाट मोकळी करून दिली होती, हे विशेष.
———
शेतकर्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू – राहुल बोंद्रे
प्रस्तावीत भक्ती महामार्ग हा शेतजमिनी अधिग्रहणामुळे शेतकर्यांना देशोधडीला लावणारा ठरत आहे. हा महामार्ग रद्द होईपर्यंत विविध आंदोलनांच्या माध्यमातून आपण शेतकर्यांच्या सोबत राहून लढा देऊ, तसेच सदैव शेतकर्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे, तसेच महामार्ग रद्द झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याची भूमिका काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी यावेळी जाहीर केली. लोकसभा निवडणुकीनंतर सत्ताधार्यांनी या महामार्गासंदर्भात भूमिका बदलली असून, सत्ताधारी आणि विरोधक महामार्ग निर्मितीच्या विरोधात आहेत, तर सत्ताधार्यांनी हा महामार्ग एका दिवसात रद्द करून दाखवावा, असे आव्हानही राहुल बोंद्रे यांनी आ. डॉ. राजेंद्र शिंगणे, आ.श्वेताताई महाले पाटील यांच्यासह सत्ताधारी आमदारांना यावेळी दिले.
————-