पारनेर (प्रतिनिधी) : केंद्र सरकारने तरुणांना देशसेवेची संधी उपलब्ध करून देण्यासाठी ‘अग्निवीर योजना’ जाहीर केली आहे. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या मैदानावर २३ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर २०२२ या कालावधीत हा मेळावा होणार आहे. या मेळाव्यात पारनेर तालुक्यातील जास्तीत जास्त तरुणांनी सहभागी व्हावे, असे आवाहन अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व भाजप नेते सुजित झावरे पाटील यांनी केले आहे.
या योजनेअंतर्गत भारतीय सैन्य दलात तरुणांची भरती करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने पुणे येथील सैन्यभरती मुख्यालय कार्यालयामार्फत अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथे अग्निवीर सैन्य भरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे. अहमदनगर, बीड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर आणि पुणे या सहा जिल्ह्यातील नवयुवकांसाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. अग्निवीर जनरल ड्युटी, अग्निवीर टेक्निकल, अग्निवीर क्लार्क स्टोअर कीपर आणि अग्निवीर ट्रेड मॅन या पदांसाठी हा सैन्य भरती मेळावा आयोजित केला आहे. पात्र उमेदवारांनी या सैन्य भरती मेळाव्यात सहभागी होण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे.
१ जुलैपासून ही नोंदणी सुरू झाली असून ३० जुलैपर्यंत ही नोंदणी करता येणार आहे. पारनेर तालुक्यासह अहमदनगर व वरील अन्य पाच जिल्ह्यांमधील पात्र तरुणांनी मोठ्या संख्येने आपली नावनोंदणी करून या सैन्यभरती मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन सुजित झावरे यांनी केले आहे. अग्निपथ योजने अंतर्गत भारतीय लष्करात सहभागी होऊन देशाची सेवा करण्याची मोठी संधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रातील भाजप सरकारने उपलब्ध करून दिली आहे. या योजनेचा अधिकाधिक तरुणांनी लाभ घ्यावा, असेही आवाहन झावरे यांनी केले आहे.
—————–