– स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आवळल्या एकाच्या मुसक्या
पाचोड (विजय चिडे) – पैठण तालुक्यातील धुळे-सोलापूर महामार्गावरील आडगाव जावळे आणि दाभरूळ परिसरात काही दिवसापूर्वी सात ते आठ दरोडेखोरांनी काठ्या चाकू, कोयत्याच्या धाकाने दरोडा टाकून धुमाकूळ घालत, विविध ठिकाणी सहाजणांना गंभीर मारहाण केली होती. तुळजापूर येथून देवदर्शन घेऊन आलेल्या भाविक रस्तात थांबले असता, त्यांच्याकडील दागिने, रोख व मोबाईल चोरुन नेले होते. ही घटना २२ जूनच्या मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास घडली होती. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले होते. या दरोड्यातील एकाच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले आहे. शाहरुख आमया पवार रा. टाकळी अंबड, ता. पैठण असे त्या दरोडेखोराचे नाव असून उर्वरित सहा ते सात दरोडेखोर अद्याप फरार आहेत.
सविस्तर असे, की रवींद्र भास्करराव कुलकर्णी (३८, रा. हर्सुल) हे कुटूंबातील सहाजणांसह कारने देवदर्शनासाठी तुळजापूर येथून परत येत होते. परत येताना रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास आडगाव जावळे (ता. पैठण) येथील केली. पेट्रोल पंपाजवळील रस्त्यालगत असलेल्या आयआरबीच्या स्वच्छता गृहाजवळ स्ट्रीट लाईटचे उजेडात लघुशंकेसाठी थांबले असताना, त्यांच्या व्हॅनजवळ अचानक रोडच्या खालून अनोळखी सात-आठ दरोडेखोरांनी फिर्यादीला कारबाहेर ओढून रस्त्याच्या खाली नेत, कोयत्याने वार करत रोकड सातहजारासह मोबाईल हिसकावला. तसेच रवींद्र यांच्या आईवरही कोयत्याने वार करुन गळ्यातील सोन्याचे एक तोळ्याचे मंगळसूत्र (किंमत अंदाजे २० हजार रुपये) हिसकावून घेतले तसेच वैशाली कुलकर्णी यांना मारहाण करून मोबाईल व सोन्याचे मंगळसूत्र घेतले.
कारमधील अनंत कुलकर्णी यांनाही कोयत्याच्या मुठीने मार देऊन ३९०० रुपये काढून घेत पोबारा केला. त्यानंतर त्याच दरोडेखोरांनी आपला मोर्चा दाभरूळ (ता. पैठण) येथील गजानन नाथा जावळे (२७ वर्ष) यांच्याकडे वळवित त्यांना मारहाण ओरडल्यास कापून टाकू अशी धमकी देत, चांदीचे ब्रेसलेट, सोन्याची चैन, रोख दहा हजार, मोबाईल असा एकूण २८ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेत गावातील पद्माबाई विनायक गायकवाड यांच्या गळ्यातील सोन्याची पोत चोरट्यांनी चोरून नेली होती. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दरोडेखोर पवार याच्या मुसक्या आवळत त्याच्याकडून रोकडसह, मोबाईल असा ७ हजार ३०० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक मनिष कलवानीया, अपर पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर रेंगे, पाचोड पोलिस ठाण्यांचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश सुरवसे, पोउपनि प्रदीप तुबे, सुरेश माळी, सफी बालू पाथ्रीकर, पोह श्रीमंत भालेराव, लहू थोटे, संतोष पाटील, पोना शेख नदीम, पोकॉ योगेश तरमाळे, जिवन घोलप, संजय तांदळे, पवन चव्हाण यांनी केली आहे.
Leave a Reply