पारनेर (प्रतिनिधी) – गुरूवर्य सद्गुरू नाना महाराज वनकुटेकर यांच्या पुण्यतिथी सोहळयानिमित्त वनकुटे येथे विठ्ठल रखुमाई अखंड हरिनाम सप्ताह तसेच ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळयाचे २२ जुलै ते २९ जुलै दरम्यान आयोजन करण्यात आल्याची माहिती हनुमान भजनी मंडळ व समस्त ग्रामस्थ वनकुटे यांनी दिली.
बाळकृष्ण महाराज कांबळे व एकनाथ महाराज चत्तर शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली, शिष्यगण व वारकरी बांधवांच्या सहकार्याने सदगुरू नाना महाराज वनकुटेकर यांचा पुण्यतिथी सोहळयासह हरिनाम सप्तहाचे आयोजन करण्यात आले आहे. पहाटे ४ ते ६ काकडा भजन, सकाळी ७ ते ९ ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ व रात्री ८ ते १० तुलसी रामयण कथा व जागार असे दैनंदिन कार्यक्रमांचे स्वरूप आहे. शुक्रवार दि. २२ रोजी सकाळी ९ ते ११ दरम्यान नाना महाराज यांच्या पुण्यातिथी निमित्त बाळकृष्ण महाराज कांबळे यांचे किर्तन होईल.
दि. २२ जुलै पासून तुलसी रामयण कथा प्रवक्ते ह भ प नवनाथ महाराज म्हस्के यांच्या तुलसी रामायण कथेस प्रारंभ होईल. दि. २२ रोजी ग्रंथ महात्म्य व शिवपार्वती विवाह, दि. २३ रोजी श्रीराम जन्म कथा, दि. २४ रोजी सिता स्वयंवर, दि. २५ रोजी श्रीराम वनगमन व केवट प्रसंग, दि. २६ रोजी सिता हरण व श्रीराम हनुमान भेट दि. २७ रोजी सिता शोध व लंका दहन, दि.२८ रोजी श्रीराम रावण युध्द व श्रीराम राज्याभिषेक असे या कथेचे स्वरूप आहे. दि. २९ रोजी सकाळी ९ ते ११ दरम्यान बाळकृष्ण महाराज कांबळे यांच्या काल्याच्या किर्तनाने सप्ताहाची सांगता होईल. या कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन हनुमान भजनी मंडळ व समस्त ग्रामस्थ वनकुटे यांनी केले आहे.