Breaking newsHead linesMaharashtraMetro City

संस्था चालकांची दुकानदारी बंद होणार; यापुढे शिक्षक भरती ‘एमपीएससी’मार्फत!!

– पुढील भरती शक्यतोवर ‘एमपीएससी’मार्फत होणार

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी) – शिक्षक व्हायचे म्हटले की संस्था चालकांच्या घशात लाखो रुपये टाकावे लागतात. सद्या पदवीधर शिक्षकाचा दर साधारणपणे १५ ते २० लाख रुपये सुरु असल्याचे सांगण्यात येते. परंतु, संस्था चालकांची ही दुकानदारी यापुढे कायमची बंद होणार आहे. शिक्षक भरती थेट राज्य लोकसेवा आयोग (एमपीएससी)मार्फत करण्याचे नियोजन राज्य सरकार करत आहे. राज्याच्या शिक्षण विभागाने तसा प्रस्ताव सरकारला सादर केला असून, या प्रस्तावावर राज्य लोकसेवा आयोग काम करत असल्याचेही वरिष्ठस्तरीय सूत्राने सांगितले.
सद्या पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरती केली जाते. परंतु, त्यातही गैरप्रकार निदर्शनास आले असून, काही प्रकरणात चौकशी सुरु आहे. राज्यात सद्या शिक्षकांची मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहेत. खासगी संस्था व शासकीय पदेही मोठी रिक्त आहेत. खासगी संस्थेवर शिक्षक लागायचे म्हणजे किमान १० ते १५ लाख रुपये मोजावे लागतात. काही गरीब उमेदवारांनी कर्जे काढून व शेती विकून डोनेशनच्या नावाखाली ही रक्कम भरली व खासगी संस्थांवर शिक्षकाच्या नोकर्‍या मिळवल्या आहेत. तेरी भी चूप मेरी भी चूप असा हा सगळा मामला असतो. परंतु, आता या प्रकाराला वेसण घालण्याचे काम राज्य शिक्षण विभाग करतो आहे.
यापुढे खासगी असो की शासकीय कोणतीही शिक्षक भरती राज्य लोकसेवा आयोग (एमपीएससी) मार्फत करण्याचा प्रस्ताव शिक्षण आयुक्तालयाकडून राज्य सरकारला सादर करण्यात आलेला आहे. आणि, विशेष म्हणजे, या प्रस्तावावर शिक्षण सचिव, राज्य सरकार आणि एमपीएससीदेखील सकारात्मक आहे. भरती प्रक्रियेसंदर्भात ‘एमपीएससी’ने काही तांत्रिक बदल सूचवले आहेत. ते बदल झाले व सरकारने परवानगी दिली, तर ही भरती प्रक्रिया सुरु करता येईल. यापूर्वी २०१९ मध्ये १२ हजार शिक्षकांची भरती झाली होती. आतादेखील जवळपास 19 हजार पदे रिक्त असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे ही सर्व पदे ‘एमपीएससी’मार्फत भरली गेली तर गोरगरीब आणि पात्र उमेदवारांना निश्चितच फायदा होईल, आणि अब्जावधी रुपयांची काळ्या पैशाची उलाढाल वाचेल, असे शिक्षण विभागातील एका वरिष्ठ अधिकार्‍याने ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलताना सांगितले आहे.

नियम बदलण्याची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सध्या सुरू असलेली शिक्षक भरती पूर्ण केली जाईल, असे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी सांगितले आहे. त्यामुळे येत्या काळात शिक्षक भरती होणार आहे, ती शिक्षक भरती ‘एमपीएससी’च्या माध्यमातून घेण्याचा शिक्षण विभागाचा प्रयत्न असेल. सध्या राज्यात पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती केली जाते. २०१९ मध्ये १२ हजार शिक्षकांची मोठी शिक्षक भरती करण्यात आली. राज्यात शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असताना शिक्षक भरतीची मागणी वारंवार केली जात आहे.
—————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!