पेन्शनर मंडळी, ज्येष्ठ नागरिकांना ‘अच्छे दिन’; ज्येष्ठांची रेल्वे तिकिटावरील ५० टक्के सवलत बंद!
नवी दिल्ली (ब्रेकिंग महाराष्ट्र) – सेवानिवृत्त नागरिक व ज्येष्ठांना केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने जोरदार झटका दिला आहे. रेल्वे प्रवास भाड्यात या नागरिकांना आता पूर्वीची अर्धभाडे सवलत देण्यात येणार नाही, अशी भूमिका केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी घेतली आहे. त्यामुळे वृद्ध व खेळाडू यांची ५० टक्क्यांची सवलत आता बंद होणार असल्याने या नागरिकांना केंद्रातील पंतप्रधान मोदी सरकारने जोरदार झटका दिला आहे.
केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी याबाबत लोकसभेत माहिती दिली होती. ते म्हणाले होते, की ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे देत असलेल्या प्रवास भाड्यातील सवलतीपोटी २०१९-२०२मध्ये सरकारला १६६७ कोटी रुपये द्यावे लागले होते. जवळपास इतकेच पैसे दरवर्षी प्रवास भाड्यातील सवलतीपोटी मोजावे लागतात.
कोरोनापूर्वी ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे तिकीटावर ५० टक्के सूट मिळत होती. परंतु, कोरोना सुरु झाल्यानंतर रेल्वेसेवा बंद होती व ही सवलतही बंद झाली. कोरोना संपल्यानंतर रेल्वे पुन्हा सुरु झाली परंतु, प्रवासी भाड्यातील ही सवलत बंद केली गेली ती गेलीच. एवढेच नाही तर आता ज्येष्ठ नागरिकांना ५० टक्क्यांची सवलत मिळणार नाहीच, हे मोदी सरकारने आता जाहीरच केले आहे. काल, लेखी जबाबात रेल्वे मंत्री म्हणाले, की ज्येष्ठ नागरिकांना ही सवलत नसेल तथापि, दिव्यांग, ११ कॅटेगरीतील रुग्ण आणि विद्यार्थी यांच्या सवलती सुरु राहतील. भारतातील ज्येष्ठ नागरिकांना रेल्वेचा प्रवास सोयीस्कर असतो. एक तर रस्तामार्गावरील प्रवास त्यांना विविध शारीरिक व्याधींमुळे करता येत नाही. तर हृदयाच्या कमजोरीमुळे ते विमान प्रवासही करू शकत नाहीत. त्यामुळे आता रेल्वे प्रवासातील सवलतही बंद झाल्याने ज्येष्ठ नागरिक संताप व्यक्त करत आहेत.
————