भाेकर (प्रतिनिधी) – ओबीसींचे रद्द झालेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पुन्हा मिळाल्याने भोकरमध्ये ओबीसी बांधवांच्यावतीने फटाके फोडून जल्लोष करण्यात आला.
ओबीसी आरक्षणाबाबत न्यायालयात योग्य डाटा सादर न केल्यामुळे मागील सरकारच्या काळात ओबीसींचे आरक्षण रद्द झाले होते. त्याबाबत ओबीसीमधून मोठा असंतोष निर्माण झाला होता. ठीक ठिकाणी मोर्चे आंदोलने निवेदने देण्यात आली होती. योग्य प्रकारे न्यायालयात डाटा सादर करण्याबाबत हालचाली सुरू झाल्या होत्या. निवडणूक आयोगाच्या वतीने ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्याची राज्य निवडणूक आयोगाने तयारीही केली होती. नव्यानेच स्थापना झालेल्या राज्य सरकारने ओबीसीचा डाटा न्यायालयात सादर केल्याने सर्वोच्च न्यायालयाने दि. 20 जुलै रोजी ओबीसींचे 27 टक्के आरक्षण कायम ठेवून निवडणुका घेण्याचे आदेश दिले. यामुळे ओबीसी समाजाला योग्य न्याय मिळाला असून येणाऱ्या निवडणुका ओबीसी आरक्षणा सहित होतील.
भोकरमध्ये साजरा करण्यात आला जल्लोष
ओबीसींचे आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवल्यामुळे भोकर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात फटाके वाजवून निर्णयाचे स्वागत करण्यात आले. यावेळी ओबीसी नेते नामदेव आयलवाड, सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष माधवराव अमृतवाड, संचालक रामचंद्र मुसळे, सतीश देशमुख, राजू अंगरवार, तालुका संपर्कप्रमुख बी. आर. पांचाळ, एल. ए. हिरे,सुभाष नाईक, संदीप गौड, निळकंठ वर्षेवार, अंबादास आटपालवाड, ऍड. परमेश्वर पांचाळ, मोहन राठोड, गंगाधर महादावाड, रमेश महागावकर, शिवाजी देवतळे, गणेश राठोड, गणेश पा. कापसे, रंगराव पाटील, आदिनाथ चिंताकुंटे इ.उपस्थिती होती.