आ.श्वेता महालेंसह ५ महिला आमदारांना ‘फेक कॉल’; किनगावजट्टूच्या मुकेश राठोडसह त्याची गर्लफ्रेंड जेरबंद!
– सोलापूरच्या काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनाही फसवले
पुणे (ब्रेकिंग महाराष्ट्र) – चिखलीच्या आमदार श्वेता महाले यांच्यासह सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे यांना ‘फेक कॉल’ करून त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करणारा, व पुण्याच्या आमदार माधुरी मिसाळ यांच्याकडून पैसे उकळणारा, आरोपी मुकेश अशाेक राठोड (वय 23) याला पुणे पोलिसांनी अखेर जेरबंद केले आहे. या भामट्याने भाजपच्या चार महिला आमदारांना फसवण्याचा प्रयत्न केला असून, हा भामटा बुलडाणा जिल्ह्यातील किनगावजट्टू (ता. लाेणार)चा रहिवासी आहे. त्याच्यासह त्याची गर्लफ्रेंडदेखील पोलिसांनी जेरबंद केली असून, ती औरंगाबादची आहे. दोघेही एमपीएससीची तयार करतात. पैसे नसल्याने त्यांनी हा गोरखधंदा सुरु केला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आई आजारी असल्याचे सांगून, एका अज्ञात व्यक्तीने या महिला आमदारांना मदत मागितली होती. मदत म्हणून ती रक्कम ऑनलाइन माध्यमातून देण्यात आली होती. मात्र तो फेक कॉल होता, असे लक्षात आल्यानंतर आमदारांनी तक्रार दिली. त्यानुसार पुण्यातील बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस त्या अज्ञात आरोपीचा शोध घेत होते. अखेर दोन दिवसांनी पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. मुकेश राठोड असे त्या भामट्याचे नाव आहे. तर त्याच्या या गुन्ह्यात त्याला त्याच्या गर्लफ्रेंडनेही साथ दिल्याने पोलिसांनी तिलादेखील अटक केली आहे. सुनीता असे तिचे नाव असून, ती औरंगाबादची आहे.
आमदार माधुरी मिसाळ, श्वेता महाले, मेघना बोर्डीकर आणि देवयानी फरांदे यांना या भामट्याने फेक कॉल करत पैसे मागतले होते. चिखलीच्या आमदार श्वेता महाले यांना तर तो त्यांच्याच मतदारसंघातील असल्याचे म्हणाला होता. या चारही आमदार एका बैठकीसाठी एकत्र आल्यानंतर, याबाबत त्यांच्यात एकमेकींशी चर्चा झाली व हा प्रकार उघडकीस आला. आमदार माधुरी मिसाळ यांच्या मुलीने याबाबत बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या दोघांना अटक करण्यात आल्यानंतर आरोपीने सोलापूरच्या काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांचीही फसवणूक केल्याचे समोर आले. बिबवेवाडी पोलिसांनी आरोपी मुकेशला औरंगाबादवरुन अटक केली असून, त्याला अधिक चौकशीसाठी पुण्यात आणले आहे.
आरोपी मुकेश राठोड हा किनगावजट्टू (ता.लाेणार) जिल्हा बुलडाणा येथील रहिवासी असून, त्याचे शिक्षण बीए इंग्रजीपर्यंत झालेले आहे. तर त्याची मैत्रिण हिने बीएस्सीपर्यंतचे शिक्षण घेतलेले आहे. ती औरंगाबादचीच रहिवासी आहे. हे दोघेही गेल्या तीन वर्षांपासून एमपीएससीचा अभ्यास करत आहेत. त्यांना खर्चासाठी पैसे हवे होते. खाणावळीचे पैसे देण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. आमदार मंडळी वैद्यकीय खर्चासाठी मदत करतात, हे माहिती असल्याने या दोघांनी आमदारांना खोटे सांगून पैसे घेतले. घरची परिस्थिती गरिबीची असल्याने घरून पैसे मिळत नव्हते, त्यामुळे खर्च भागवण्यासाठी या दोघांनी आमदारांकडूनच पैसे गोळा केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. अधिक तपास बिबवेवाडी पोलिस करत आहेत.
मुकेश राठोड हा लोणार तालुक्यातील किनगावजट्टू येथील असून, तो स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतो. त्याने पोलिस उपनिरीक्षक पदाची परीक्षा दिलेली आहे. तर आरोपी सुनीता ही औरंगाबादची असून, तिचे बीएसस्सी पर्यंत शिक्षण झालेले आहे. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना त्यांची ओळख झाली. काही महिन्यांपूर्वी त्याने आमदार माधुरी मिसाळ यांना भेटल्यानंतर त्यांचा मोबाईल क्रमांक घेतला होता. त्यानंतर त्याने आईच्या उपचारासाठी म्हणून पैसे मागितले व फसवणूक केली. सुनीता या तरुणीने हे पैसे स्वतःच्या बँक खात्यात स्वीकारले म्हणून ही तरुणी या प्रकरणात आरोपी आहे.