खा. जाधव यांच्या रूपाने जिल्ह्यातील सुपुत्राला पहिल्यांदाच केंद्रात ‘लाल दिवा’!
बुलढाणा (बाळू वानखेडे) – बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून चौथ्यांदा निवडून आलेले महायुतीचे खासदार प्रतापराव जाधव यांच्या रूपाने जिल्ह्यातील सुपुत्राला केंद्रात पहिल्यांदाच ‘लाल दिवा’ मिळाला आहे. या मतदारसंघातून यापूर्वी निवडून येऊन मंत्रिपद भोगलेले काँग्रेसचे मुकुल वासनिक हे मूळचे नागपूरचे तर सद्या शिवसेना शिंदे गटात असलले आनंदराव अडसूळ हे तसे सोलापूरचे रहिवासी होते. बुलढाण्याच्या मातीत जन्माला येऊन केंद्रात लालदिवा मिळवणारे खा. जाधव हे पहिलेच भूमिपुत्र ठरलेले आहेत.
बुलढाणा लोकसभेसाठी यावेळी अतिशय चुरशीची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत महायुतीचे प्रतापराव जाधव यांनी तिहेरी लढतीत बाजी मारली. मंत्रिपदासाठीच्या ‘शेअरिंग’मध्ये शिवसेना शिंदे गटाच्या वाट्यावर सध्या तरी एकच कॅबिनेट मंत्रिपद आल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ खासदार तसेच मेरीट बेसीसवर प्रतापराव जाधव यांच्या नावाची शिफारस मंत्री पदासाठी केली. त्यामुळे खासदार प्रतापराव जाधव यांची थेट कॅबिनेट किंवा स्वतंत्र प्रभार मंत्रीपदी वर्णी लागलेली आहे. आज, ९ जूनरोजी सायंकाळी ते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासोबत मंत्रीपदाची शपथ घेत आहेत. या निमित्ताने सर्वसामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून न्याय मिळाल्याच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत. तशी प्रतिक्रियादेखील खा. जाधव यांनी दिली आहे.
विशेष म्हणजे, खा. प्रतापराव जाधव यांच्यानिमित्ताने जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच जिल्ह्यातील सुपुत्राला केंद्रात मंत्रीपद मिळाले आहे. यापूर्वी अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या बुलढाणा लोकसभेतून निवडून आलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व आताचे राज्यसभेचे विद्यमान खासदार मुकुल वासनिक हेसुद्धा केंद्रात क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री तसेच कॅबिनेट मंत्रीही होते. परंतु ते नागपूरचे रहिवासी आहेत. शिवसेना एकसंघ असताना स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीत मोठे झालेले व बुलढाणा लोकसभेतूनच शिवसेनेच्या उमेदवारीवर निवडून आलेले आनंदराव अडसूळ यांनीसुद्धा केंद्रात अर्थ राज्यमंत्रीपद भोगले आहे. परंतु तेसुद्धा सोलापूरचे आहेत. एकंदरीत बुलढाणा जिल्ह्याच्या इतिहासात खा. प्रतापराव जाधव यांच्या रूपाने जिल्ह्यातील सुपुत्राला प्रथमच केंद्रीय मंत्रिपदाचा ‘लालदिवा’ मिळाला असून, तोही थेट ‘कॅबिनेट किंवा स्वतंत्र प्रभारमंत्री’. या लाल दिव्याचा उपयोग आता मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी होईल, अशी सर्वसामान्यांना अपेक्षा आहे.
——–