चिखली (महेंद्र हिवाळे) – रायपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या सोनेवाडी येथील तरुणाला रस्त्याने पाठीमागून येणार्या मोटारसायकलने जबर धडक दिल्याने तो जागेवरच ठार झाला. तर या अपघातात दोघेजण गंभीर जखमी झालेले आहे. देवीदास काळे असे मृतकाचे नाव आहे, तर शुभम तायडे, शिवप्रसाद काळे अशी जखमींची नावे आहेत. याप्रकरणी रायपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या घटनेने सोनेवाडी गावावर शोककळा पसरली होती. उत्तरीय तपासणीनंतर देवीदासच्या मृतदेहावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
सविस्तर असे, की मृतक देवीदास काळे, शुभम तायडे, शिवप्रसाद काळे व अनिल तायडे हे सोनेवाडीजवळील सिमेंट रस्त्याने पायदळी चालत होते. त्यांना एमएच २८ बीएफ ५४९८ क्रमांकाची दुचाकी चालवत असलेल्या आरोपी मनोज विलास जाधव रा. हतेडी ता. जि. बुलढाणा याने पाठीमागून जोराची धडक दिली. यात देविदास काळे या युवकाचा जागेवरच मृत्यू झाला. विशेष म्हणजे, आरोपी मोटासायकलवर ट्रिपल सीट होता. याप्रकरणी रायपूर पोलीस स्टेशनला अनिल भानुदास तायडे रा. सोनेवाडी यांनी सदर घटनेची फिर्याद दिली आहे. रायपूरचे ठाणेदार दुर्गेश राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय राजेश गवई यांनी कलम ३०४ ए, २७९, ३३७, ३३८, ४२७ निष्काळजीपणे वाहन चालवल्याने देविदास काळे यांचा मृत्यूला कारणीभूत असल्याने आरोपी मनोज जाधव याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून, आरोपीला अटक केली होती. पुढील तपास ठाणेदार दुर्गेश राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल शेख राजीक तपास करीत आहे.