BuldanaBULDHANAHead linesMaharashtraPolitical NewsPoliticsVidharbha

ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा केल्यास मी तुमचा मर्डर करेन, आणि अजरामर होईन; सुबोध सावजींनी पुन्हा ‘पुंगी वाजवली’!

– डोणगाव पोलिसांत अदखलपात्र गुन्हा दाखल

बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – राज्यासह देशभरात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात ४८ पैकी ४० जागा या महाविकास आघाडीला मिळणार आहेत, अशी स्थिती असताना निवडणूक आयोगाने जर ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा केला, तर आपण त्याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. राज्यातील सर्व मतदारांच्यावतीने मी आपला मर्डर करेन. निवडणूक आयुक्तांना गळा घोटणार’, अशी थेट धमकीच माजी महसूल मंत्री सुबोध सावजी यांनी देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त यांना दिली आहे. त्या संदर्भातील पत्र थेट त्यांच्या दिल्ली कार्यालयाला सावजी यांनी पाठवले असल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, असे काही तरी खळबळजनक करून चर्चेत राहण्याचा सावजी यांचा नेहमीच प्रयत्न असतो. त्यामुळे त्यांची ही धमकी म्हणजे, पुन्हा एकदा चर्चेत राहण्यासाठी त्यांनी पुंगी वाजवली आहे, अशी चर्चा जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात सुरू होती. या धमकीप्रकरणी डोणगाव पोलिस ठाण्यात सावजीविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सुबोध सावजींचे धमकीपत्र.

सावजी यांनी धमकीचे पत्र दिल्ली कार्यालयाला पाठवल्याने सर्व यंत्रणा अ‍ॅलर्ट मोडवर आली आहे. सावजी असे काही करणार नाहीत, त्यांना असे काही तरी वक्तव्य करून चर्चेत राहण्याची खोड आहे, याची जाणिव यंत्रणांना आहे, तरीदेखील यंत्रणांनी सतर्कता बाळगली असल्याचे दिसून येत आहे. सावजी हे माजी महसूल राज्यमंत्री असून, अकोला व बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्रीदेखील ते राहिलेले आहेत. अनोखी आंदोलने आणि अधिकार्‍यांना जनतेच्या प्रश्नासाठी धमक्या देण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. संभाजी भिडे गुरुजी, जिल्हा परिषदेतील अधिकारी यांच्या मर्डरचीदेखील त्यांनी मागच्या काळात धमकी दिली होती. आता त्यांनी थेट देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त यांच्याच गळा घोटून ठार मारण्याची धमकी दिल्याने ते पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत.
सावजी यांनी निवडणूक आयोगाला ई-मेलद्वारे पाठविलेल्या पत्रात नमूद आहे की, भारतात झालेल्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात असलेल्या मतदारांचा कौल हा महाविकास आघाडीकडेच आहे. या आधारे ४८ जागांपैकी ३८ ते ४० लोकसभेच्या जागा या महाविकास आघाडीच्या येणारच. परंतु जनतेच्या व माझ्या मनात संशय आहे की, आपण ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा करून लोकांच्या मतदानाचा लोकशाहीचा गळा घोटणार आहात. असे घडल्यास महाराष्ट्रातील मतदारांच्यावतीने या अन्यायाच्या विरोधात मी आपला गळा घोटल्याशिवाय राहणार नाही. माझे वय सध्या ८० वर्षाचे आहे आता दहा किंवा वीस वर्षात जगायचे आहे. माझ्या डोळ्यातदेखत महाराष्ट्रातील करोडो मतदारांचा लोकशाही पद्धतीने वापरलेल्या मतदारांच्या अधिकाराचा आपण उघड उघड खून करणार असाल, मुडदा पाडणार असाल, तर मी या मतदारांचा हक्काच्या सन्मानार्थ आपला मुडदा पाडेल किंवा खून करण्यास मागे पुढे पाहणार नाही. लोकशाहीच्या इतिहासात मी माझे नाव अजरामर करेल, असे सावजी यांनी या धमकीपत्रात नमूद केलेले आहे. याप्रकरणी डोणगाव पोलिस ठाणे येथे सावजी यांच्यावर कलम ५०६ अन्वये अदखलपात्र गुन्हा नोंदविल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकारी अमरनाथ नागरे यांनी दिली.


सावजींना चर्चेत राहण्याची सवयच…!

यापूर्वीदेखील सुबोध सावजी यांनी शिवप्रतिष्ठाणचे संभाजी भिडे यांच्या आक्षेपार्ह विधानावरून राज्यभर पेटलेल्या आंदोलनानंतर भिडेंना अटक करा नाहीतर मी त्यांचा खून करेल, असे विधान केले होते. याबद्दल त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनादेखील पत्र लिहिले होते. तसेच बुलढाणा जिल्हा परिषदेतील भ्रष्टाचारावर कारवाई न झाल्यास अशा लोकांची हत्या करेल असा खळबजनक इशारादेखील दिला होता. भाजपचे नेते राम कदम यांची जीभ छाटून आणणार्‍या पाच लाखाचे बक्षीसदेखील त्यांनी जाहीर केले होते. विशेष म्हणजे, मावळते खासदार प्रतापराव जाधव हे निवडणुकीत पडणार असून, ते जर जिंकले तर सावजी तीन लाख रूपये देणार आहेत, अशी पैजही त्यांनी त्यांच्या एका मित्राशी लावलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!