Aalandi

पन्हाळागड ते पावनखिंड ४८ किमी ऐतिहासिक मार्गावर वारी!

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : स्वराज्य इतिहासात गारद करणे , पन्हाळगड व आग्राहून शिवरायांचे अकल्पित बुद्धी चातुर्याने निसटून जाणे या पराक्रमाला इतिहासात तोड नाही.  ऐतिहासिक गड वाटा , युद्ध वाटा दुर्ग भटक्यांकडून जिवंत ठेवण्याचे मोठे कार्य महाराष्ट्रात अनेक संस्था करताना दिसून येतात.  अशीच एक मोहीम पन्हाळागड ते पावनखिंड ४८ किमी ऐतिहासिक मार्गावर वारी करण्यात आली.  यात राज्यभरातून सातशे मावळ्यांसह दुर्गजागर प्रतिष्ठानचे संस्थापक संतोष जगताप यांचा सहभाग होता.
हिल ॲडवेंचर फाऊंडेशन ही संस्था गेल्या वीस वर्षापासून पन्हाळा ते पावनखिंड ४८ किमी ऐतिहासिक वाटेची पायी वारीचे आयोजन करीत आहे.  १६ व १७ जुलै रोजी पार पडलेल्या पायी वारीत महाराष्ट्रातील कोल्हापूर,  सांगली,  पुणे,  ठाणे,  नाशिक,  मुंबई,  बीड आदी जिल्ह्यातून सुमारे ७०० वर मावळे सहभागी झाले होते.  शनिवारी (दि.१६) सकाळी आठ वाजता वीर बाजीप्रभू देशपांडे यांचे पुजन व अभिवादन करून मोहिमेस सुरूवात करण्यात आली.  यावेळी दुर्गराज राजगड ग्रंथाचे लेखक राहुल ऊर्फ रायबा नलावडे पुणे व एका पायाने दिव्यांग असूनही सातत्याने दुर्ग भटकंती करणारे बीडचे कचरू चांभारे यांचा आयकॉन म्हणून आयोजकांतर्फे सत्कार करण्यात आला.  शिव व्याख्याते राहुल नलावडे यांच्या मनोगतानंतर मोहीमेस सुरूवात करण्यात आली.  अंगावर पाऊसधारा झेलत मसाईचे पठार , कुंभारवाडी,  खोतवाडी,  करपेवाडी,  आंबेवाडी मार्गे मोठमोठे नदी ओढे पार करत चिखल तुडवत शिवरायांच्या नामजयघोषात , हर हर महादेव शिवमय घोषणांत जयजयकार करत सर्व शिवप्रेमी धावत होते.  या वारीतील दुपारचे जेवण खोतवाडीला व रात्रीचा मुक्काम आंबेवाडीत झाला.

दुस-या दिवशी रविवारी ( दि.१७ ) अठरा किमी अंतर पार करत पावनखिंडला दुपारी दोन वाजता ही वारी पोहचली. पावनखिंड रणसंग्रामाची अनुभुती यानिमित्तानं मावळ्यांना घेता आली. हिल ॲडवेंचर फाऊंडेशनचे प्रमोद पाटील यांनी या मोहिमेचे यशस्वी नियोजन केले. त्यांच्या समवेत शंभराहून अधिक स्वयंसेवकांनी सहभाग घेतला. शिव दुर्ग साम्राज्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राहुल नलावडे, डॉ.अजय इंगळे, सत्तर वर्षाचे जेष्ठ तरूण अनिल भागवत, कचरू चांभारे, अंबादास गाजुल, तानाजी राजगुडे, रवींद्र गाढवे, सुनील क्षीरसागर, युवराज वगदे, योगेश मोहिते, किरण थोरात, सचिन तावरे, डॉ.शेलार आदींचा यात समावेश होता. दहा वर्षीय मुले मुली,  युवा युवती यांचा देखील सहभाग लक्षणीय संख्येने होता.  पावनखिंड येथील धारातीर्थ स्मारकास अभिवादन करून मोहिमेची सांगता करण्यात आली.  शरीराचा व मनाचा कस पणाला लावणारी ४८ किलोमीटर ची मोहीम यशस्वी रित्या पूर्ण केल्याचा आनंद सर्व मावळ्यांचे चेह-यावर होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!