BuldanaChikhali

पुलावर पाणी असेल तर वाहने सावधपणे चालवा!

– अंढेरा पोलिस ठाणे हद्दीतील नदी-नाले ओव्हरफ्लो, पुलांवरून वाहतेय पाणी
मेरा बु. ता. चिखली (प्रताप मोरे) – गेल्या काही दिवसांपासून संततधार पाऊस पडत असल्याने नदी नाले ओव्हरफ्लो होवून वाहत आहेत. त्यामध्ये अनेक रोडच्या पुलावरून पुराचे पाणी मोठ्या प्रमाणावर वाहत आहे, तर रोडवर वाहने घसरून अनेकांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे वाहनधारकांनी पुलावरून अथवा रोडवरून वाहने चालवितांना सावधगिरी बाळगावी, असा सल्ला अंढेरा पोलिस ठाण्याचे ठाणेदार गणेश हिवरकर यांनी दिला आहे.
अंढेरा पोलीस स्टेशन हद्दीत अंढेरा, शिवणी आरमाळ, मेरा बु व मेरा खुर्द, मेंडगाव, गांगलगाव, पाडळी शिंदे, अंबाशी, रोहडा, अंत्री खेडेकर, चिंचखेड, शेळगाव आटोळ, आंचरवाडी, देऊळगावघुबे, भरोसा, अमोना, मिसाळवाडी या गावालगत असलेल्या पुलावरून पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पुराचे पाणी वाहत जाते. पुराचे पाणी पुलावरून वाहत असतांना गावकर्‍यांना तासनतास पुलावरून पाणी कमी होईपर्यंत तेथेच थाबावे लागते, त्यामध्ये काही वाहनधारक आपला जीव धोक्यात टाकून पुलावरून वाहने टाकण्याचा प्रयत्न करतात, आणि आपले वाहन पुराच्या पाण्यातून चालवित असतांना वाहनावरील नियंत्रण सुटणे, वाहन खोल पाण्यात जाणे, मधोमध वाहन अडकून पडणे, घसरणे अशामुळे वाहने पुराच्या पाण्यात वाहून जातात. अशा घटना घडत असल्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर येतात. तसेच संध्या संततधार पाऊस सुरू असल्याने रोडवर काळी माती व वाळू येवून पसरते आणि रोडवर पसरलेल्या रेती, काळी मातीमुळे वाहने घसरुन वाहन धारकांना लहान मोठ्या अपघाताला सामोरे जावे लागते. अशा वेळी वाहन धारकांनी आपली सावधगिरी बाळगून वाहन चालवितांना हेल्मेटचा वापर करणे, वाहनाचा वेगमर्यादा ४० ठेवणे, मोठे वाहन जवळून जातांना आपले वाहन बाजूला घेणे अथवा उभे करणे, महिलांना अथवा लहान मुलांना गाडीवर बसून प्रवास टाळणे, आदी बाबीकडे काळजी पूर्वक लक्ष दिल्यास अपघात टाळता येतो. त्याच प्रमाणे अपघात टाळण्यासाठी व वाहन धारकांना मार्गदर्शन करण्यासाठी अंढेरा पोलीस कर्मचारी रोडवर उभे राहून मार्गदर्शन करणार आहेत. यासाठी दुय्यम ठाणेदार वासाडे, एसआय राठोड, सिरसाट, झिने, सोनकांबळे, गवई, काकड, उगले, पोफळे हे कार्यरत राहणार आहे, असे ठाणेदार गणेश हिवरकर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!