– सततची नापिकी, बँका, पतसंस्था व फायनान्सच्या कर्जाच्या ओझ्याखाली दबल्याने उचलले टोकाचे पाऊल; परिसरात हळहळ!
चिखली (महेंद्र हिवाळे) – तालुक्यातील अंत्री खेडेकर येथील युवा शेतकरी संजय नरहरी खेडेकर (वय ३३) यांनी बँक, पतसंस्था आणि फायनान्सच्या कर्जाच्या ओझ्याखाली दबल्याने, तसेच सततची नापिकी, शेतीपिकांचे नुकसान आणि शेतकर्यांकडे सरकारचे असलेले दुर्लक्ष यामुळे शेतातून काहीच उत्पन्न हाती येत नसल्याने नैराश्यात जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली. हा दुर्देवी प्रकार आज (दि.१६ मे) दुपारी १२.०० वाजेच्या सुमारास घडला. मेरा बुद्रूक शिवारात स्वतःच्या वडिलोपार्जित शेतातील लिंबाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन संजय यांनी आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. निवडणुकीच्या काळात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या घडत असताना, या युवा शेतकर्याच्या आत्महत्येने समाजमन सुन्न झाले होते.
संजय नरहरी खेडेकर यांच्यावर काही शासकीय बँका, खाजगी पतसंस्था तसेच बचत गट व फायनान्स कंपन्यांचे कर्ज होते. परंतु, शेतातून काहीच उत्पन्न निघत नसल्याने आणि या कर्ज देणार्यांचा तगादा वाढल्याने संजय खेडेकर यांनी आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास मेरा बुद्रूक शिवारातील आपल्या वडिलोपार्जित शेतात जाऊन लिबांच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास लावून घेतला. त्यांची जागीच प्राणज्योत विझली. त्यांनी गळफास घेतल्याची माहिती परिसरातील शेतकर्यांना कळताच त्यांच्यासह कुटुंबीयांनी तातडीने लिंबाच्या झाडाकडे धाव घेतली. परंतु, तोपर्यंत सर्वकाही संपले होते.
या घटनेची माहिती पोलिस पाटील व स्थानिकांनी अंढेरा पोलिस ठाण्याचे ठाणेदार विकास पाटील यांना देताच, त्यांनी मेरा-अंत्रीखेडेकर बीटचे जमादार उगले यांच्यासह घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह पंचनामा करून ताब्यात घेतला व उत्तरीय तपासणीसाठी चिखलीकडे पाठवला. महसूल विभागाचे तलाठी लखन जाधव, कोतवाल महेश गोरे यांनीही घटनास्थळी पाहणी करून अहवाल तयार केला. हा अहवाल तहसीलदार चिखली यांना सादर केला जाणार आहे. तसेच, या घटनेची माहिती तहसीलदार काकडे यांना दिली होती. या दुर्देवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. संजय खेडेकर यांच्या पश्च्यात आई-वडिल, भाऊ, बहीण, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा बराच मोठा आप्त परिवार आहे.
—————