विहिर अनुदान घोटाळाप्रकरणी त्रीसदस्यीय समितीमार्फत चौकशी!
– विनायक सरनाईक, देवीदास कणखर यांच्या आक्रमक भूमिकानंतर, व ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने आवाज उठविल्यानंतर ‘बीडीओं’नी उचलले कठोर पाऊल!
– विहिरी मंजूर करून देण्यासाठी पैसे उकळणार्या दलाल, सरपंच, ग्रामसेवक व संबंधित कर्मचार्यांची आता खैर नाही?
चिखली (महेंद्र हिवाळे) – चिखली तालुक्यात पंचायत समितीअंतर्गत राबविण्यात आलेल्या मनरेगांतर्गतच्या सामूहिक विहीर अनुदान योजनेच्या विहिरी मंजूर करून देण्यासाठी तालुक्यातील काही सरपंच, ग्रामसेवक व पंचायत समितीतील काही कर्मचारी तसेच दलाल यांनी शेतकर्यांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळून मोठा आर्थिक घोटाळा झाल्याची बाब स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनायक सरनाईक, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवीदास पाटील कणखर यांनी चव्हाट्यावर आणली होती. तसेच, याबाबत ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’नेदेखील वारंवार आवाज उठवून हा प्रश्न ऐरणीवर आणला होता. ऐन निवडणुकीच्या काळात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने राज्य सरकार चांगलेच हादरले होते. त्यामुळे अखेर चिखली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी या घोटाळाप्रकरणी तीनसदस्यीय चौकशी समिती गठीत केली असून, सखोल चौकशी करून १५ दिवसांच्याआत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पैसे उकळणार्या संबंधित कर्मचारी, ग्रामसेवक, सरपंच आणि दलाल यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. ज्या शेतकर्यांना फाईल नामंजूर करण्याची भीती दाखवून पैसे उकळले गेलेत, त्यांनी उघडपणे अथवा गोपनीयपणे आपल्या तक्रारी या समितीकडे सादर कराव्यात, असे आवाहन शेतकरी नेते विनायक सरनाईक यांनी केलेले आहे.
या विहिर अनुदान घोटाळाप्रकरणी विनायक सरनाईक व देवीदास पाटील कणखर यांनी १० मेरोजी गटविकास अधिकारी चिखली यांना सविस्तर निवेदन दिले होते. त्या अनुषंगाने बीडीओंनी संदीप सोनुने कृषी अधिकारी, पंचायत समिती चिखली, एस.एस.पाटील विस्तार अधिकारी, पंचायत समिती चिखली, गजानन वराडे, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पंचायत समिती चिखली या तिघांची चौकशी समिती गठीत केली आहे. या समितीला निवेदनात नमूद सर्व आरोपांची सखोल व सविस्तरपणे चौकशी करण्याचे आदेश दिनांक १४ मेरोजी दिले गेले असून, १५ दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेशही देण्यात आलेले आहे. या सर्व प्रकरणाची आता सखोल चौकशी होणार असल्याने संबंधित पैसेखाऊ दलाल व कर्मचार्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. दरम्यान, बीडीओंच्या या निर्णयाने शेतकरीवर्गाने समाधान व्यक्त केले आहे. तसेच, उर्वरित फाईलींवर तातडीने सह्या होऊन या फाईली मंजूर कराव्यात, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
ग्रामपंचायतींकडून आलेले परिपूर्ण प्रस्ताव पंचायत समितीमध्ये पडून असल्याने एकाच गठ्ठ्यातील, एकाच गावातील उद्दिष्ट शिल्लक असतांना ठरावीकच फाईली मंजूर करण्यात आल्यात. त्यामुळे उर्वरित फाईलींमध्ये त्रुटी नसताना त्या मान्यतेशिवाय कशा राहिल्यात? ज्या शेतकर्यांना भीती दाखवून विहिरींसाठी पैसे उकळण्यात आलेत, त्या शेतकर्यांना त्यांचे पैसे परत करा, तसेच उर्वरित विहिरी, गोठे व इतर पंचायत समितीत रखडून असलेल्या प्रस्तावास तातडीने मान्यता द्या. उर्वरित परिपूर्ण विहीर प्रस्तावास तातडीने मान्यता देण्यात यावी, सदर प्रकरणी जबाबदार अधिकारी, कर्मचारी यांनी आपल्या कर्तव्यात, कामात कसूर केल्याप्रकरणी सखोल चौकशी करण्यात यावी, अशी आमची मागणी आहे. तसेच, आमच्या तक्रारींची बीडीओंनी तातडीने व गांभीर्याने दखल घेऊन चौकशी समिती नेमली, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत, आता निरपेक्षपणे चौकशी होईल, अशी आशा आहे.
– विनायक सरनाईक, जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना
————-
अनुदानित विहिरींच्या मंजुरीसाठी चिखली तालुक्यांत शेतकर्यांची तब्बल १६ कोटींची लूट?