बिबी (ऋषी दंदाले) – किराणा दुकानदार असल्याने किराणा खरेदी करण्यासाठी मेहकर येथे दुचाकीने जाणार्या ४२ वर्षीय किराणा दुकानदाराच्या दुचाकीला रोही (नीलगाय) प्राण्याने धडक दिल्याने झालेल्या दुर्देवी अपघातात या दुकानदाराचे निधन झाले आहे. संतोष भीमसिंह राठोड, रा. पारखेड (ता.मेहकर) असे या दुकानदाराचे नाव असून, आज (दि.१५) सकाळी ८ वाजेच्या सुमारास मेहकर जवळच असलेल्या गौंढाळा फाट्यावर हा अपघात झाला. संतोष राठोड यांच्या पश्च्यात आई, वडिल, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा बराच मोठा आप्तपरिवार असून, त्यांच्या पार्थिवावर पारखेड येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. ते दुचाकी क्रमांक एमएच 28 बीएल 5091 ने मेहकर येथे किराणा आणण्यासाठी जात होते.
देऊळगाव साकरशाजवळील पारखेड येथील संतोष राठोड हे किराणा दुकानदार असून, नेहमीप्रमाणे ते दुकानाकरिता किराणा आणण्यासाठी मेहकरकडे जात होते. गौंढाळा ते भालेगावदरम्यान त्यांच्या भरधाव दुचाकीला अचानक आलेल्या रोही प्राण्याने धडक दिली, त्यामुळे दुचाकीवरून फेकले गेले व रोडवर आदळले. ते आदळल्याचे फाट्यावरील काही ग्रामस्थांनी पाहिले व त्यांनी लगेचच त्यांच्याकडे धाव घेतली. राठोड यांनी आपले नाव व गाव ग्रामस्थांना सांगितले व लगेचच त्यांनी मान टाकून दिली. त्यांना दवाखान्यात हालचाल करेपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती. याप्रकरणी मेहकर पोलिसांना कळविण्यात आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व मृतदेह शासकीय रूग्णालयात हलविला. राठोड हे मनमिळावू स्वभावाचे होते. त्यांच्या दुर्देवी निधनाने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत होती.
एस टी बस च्या धडकेत एक ठार
मेहकर तालुक्यातील डोणगांव पोलीस स्टेशनअंतर्गत येत असलेल्या ग्राम अंजनी बु. बसस्थानकावर पायी जाणार्या 45 वर्षीय इसमास एस टी बसने धडक दिल्याने या इसमाचा मृत्यू झाल्याची घटना 14 मे ला रात्री 11:30 च्या सुमारास घडली. अंजनी बु येथे बस स्थानकावर 14 मे ला रात्री 7:30 च्या दरम्यान एसटी बस क्र एम.एच.- 20- बी एल – 2881 च्या चालकाने त्याचे ताब्यातील एस टी भरधाव व निष्काळजीपणे चालवून जोरदार धडक दिल्याने रस्त्याने पायी जाणार्या अनिल शिवाजी चंदनशीव वय 45 वर्ष रा अंजनी बु यांचा मृत्यू झाला. फिर्यादी विनोद गोविंदा चंदनशिव रा. अंजनी बु. यांनी दिलेल्या तक्रारीवरून एसटी बस चालका विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार अमरनाथ नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेका संजय घिके यांचे यांचे कडे देण्यात आला.