Breaking newsBuldanaBULDHANAHead linesMaharashtraVidharbhaWorld update

बुलढाणा ठरला राज्यातील पहिला ‘डीजे’मुक्त जिल्हा!!

– विनापरवाना डीजेंवर कारवायांचा धडाका; आतापर्यंत 51 डीजेचालकांवर उगारला कारवाईचा बडगा
– ‘मालेगाव पॅटर्न’नंतर आता एसपी सुनील कडासणेंचा ‘बुलढाणा पॅटर्न’ राज्यात चर्चेत!

बुलढाणा (खास प्रतिनिधी) – जोपर्यंत अप्पर पोलिस अधीक्षक म्हणून सुनील कडासणे हे मालेगाव (जि. नाशिक) येथे होते, तोपर्यंत राज्यातील सर्वाधिक अशा संवेदनशील मालेगाव शहरात एकही दंगल झाली नव्हती. सामाजिक परिस्थिती कशी हाताळावी, असा उत्कृष्ट असा ‘मालेगाव पॅटर्न’ त्यांनी राज्य पोलिस दलाला दिला होता. त्यानंतर आता बुलढाण्यात त्यांनी विनापरवाना डीजे वाजवून सामाजिक, धार्मिक व ध्वनीचेही प्रदूषण करणार्‍या डीजे चालकांविरोधात कठोर पाऊले उचलली असून, आतापर्यंत 51 डीजेचालकांवर कारवाया करण्यात आल्या आहेत. त्यामुळे हा जिल्हा जवळपास डीजेमुक्तच झाला आहे. परिणामी, मालेगाव पॅटर्ननंतर जिल्हा पोलिस अधीक्षक सुनील कडासणे यांचा ‘बुलढाणा पॅटर्न’ आता राज्य पोलिस दलात चर्चेचा विषय बनला आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक सुनील कडासणे

लग्न आणि वरातीच्या मिरवणुकीत संवेदनशील ठिकाणी विनाकारण थांबवून कर्णकर्कश आवाजात डीजेच्या वाद्यावर आक्षेपार्ह गाणे वाजविल्या जात असल्याचे प्रकार जिल्ह्यात घडत असल्याने जिल्ह्याचा सामाजिक सलोखा धोक्यात आला होता. त्यामुळे दोन समाजामध्ये वाद निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याच्या घटनाही घडल्या होत्या. बुलढाणा शहरात गेल्या १४ एप्रिलरोजी डीजेच्या किरकोळ वादातून एक तरूणाची निघृण हत्या करण्यात आली होती. तसेच शहरात काही ठिकाणी विनापरवाना डीजे वाजविण्यात येत असल्याच्या घटनाही घडू लागल्या आहे. डीजे आला म्हणजे दारू आली आणि नशेत कोण काय करतील, हे काही सांगता येत नाही. त्यामुळे या गोष्टीला कुठे तरी आळा बसायला हवा. त्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक सुनील कडासणे यांनी कठोर भूमिका घेतली. जिल्ह्यात विनापरवानगी कुठेही डीजे वाजविल्यास त्याच्यावर कठोर कारवाईचे आदेश त्यांनी सर्व पोलिस ठाण्यांना दिले आहेत. त्यानंतर जिल्हाभरात पोलिसांनी कारवाईला सुरूवात केली असतानाच, सोबतीला आरटीओ बुलढाणादेखील दक्ष झाले आहे. ३० मेरोजी जळगाव जामोद येथे पहिली कार्यवाही झाल्यानंतर १ मेरोजी महाराष्ट्रदिनी जिल्हाभरात कार्यवाहीचे हत्यार उपसले गेले होते. मर्यादेपेक्षा जास्त आवाज असला किंवा परवानगी नसली तर डीजेचे वाहन थेट पोलीस ठाण्यात जमा करण्याचे आदेश एसपी सुनील कडासणे यांनी दिले होते. त्यानुसार, आतापर्यंत २२ डीजे धारकांवर कारवाई करण्यात आली आहे. शासनाच्या निर्देशानुसार, ७५ टक्के डिसिमल पेक्षा जास्त आवाज असला तर कारवाई करण्यात येते. नागरिकांनी कायद्याचे पालन करून आनंद साजरा करावा. मानवी जीवाला कुठल्याही प्रकारचा धोका निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी. अन्यथा कठोर स्वरूपाची कारवाई करण्यात येणार असल्याचे एसपी सुनील कडासने यांनी सांगितलेले आहे. डीजे गाड्यांच्या मॉडिफिकेशन बाबत प्रतिबंध लावण्यासाठी आरटीओ विभागातून सूचना दिल्या जातात. त्यामुळे पोलीस विभाग तसेच आरटीओ विभागाद्वारे आता डीजे धारकांवर कडक वॉच राहणार असून, दोघेही धडक कारवाया करत असल्याने जिल्ह्यातील अनेकांनी आपले डीजे वाहन शेजारच्या जिल्ह्यातील नातेवाईकांकडे पाठवून दिले आहे.


बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील टुणकी या गावात लग्नाच्या मिरवणुकीत डीजेवर आक्षेपार्ह गाणे वाजवल्याप्रकरणी दोन गटात तुफान राडा झाला होता. या वादात एका गटाने लग्नाच्या मिरवणुकीतील चक्क डीजेची गाडी फोडली होती. यात या गाडी आणि इतर साहित्याचे मोठे नुकसान झाले होते. किरकोळ वादातून उफाळून आलेल्या या वादाला अचानक हिंसक वळण लागले, परिणामी दोन्ही गटात मोठ्या प्रमाणात दगडफेक झाली होती. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून परिस्थिती नियंत्रण आणली. तर या प्रकरणी अनेकांना अटकही करण्यात आली आहे. अलिकडे बुलढाणा जिल्ह्यात सतत घडत असलेल्या अशा घटनांमुळे जिल्हा पोलिस अधीक्षकांनी कठोर कारवाईचा बडगा उगारून हा जिल्हा जवळपास डीजेमुक्त केला आहे.
——————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!