पारडी शिरसाठ ते अंजनी खुर्द रस्त्याचे निकृष्टदर्जाचे काम; पुन्हा नव्याने काम करा!
वडगाव तेजन, ता. लोणार (विनोद पाटील तेजनकर) – प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून तयार करण्यात आलेला पारडी सिरसाठ ते अंजनी खुर्द रस्त्याचे काम अतिशय निकृष्टदर्जाचे करण्यात आल्याने परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. ठेकेदाराने हा रस्ता अक्षरशः थातुरमातूर तयार केला असून, डांबराखाली नुसती माती दिसत असून, हातानेदेखील हा रस्ता उखडून येत आहे. या रस्त्याचे निकृष्ट काम करणार्या ठेकेदारावर कारवाई करून, हा रस्ता पुन्हा करण्यात यावा, अशी मागणी परिसरातून होत आहे.
मोदी सरकारच्या कार्यकाळात महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारत देशामध्येच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून रस्तेविकास कामाच्या बाबतीत महाराष्ट्राने व भारत देशाने उच्चांक गाठला आहे. अतिशय चांगल्या प्रकारे रस्ते सर्वत्र तयार झाल्यामुळे दळणवळणासाठी सोयीस्कर झाले आहे. अशातच प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून पारडी सिरसाठ ते अंजनी खुर्द या रस्त्याचे काम नळगे कंट्रक्शन यांनी घेतले असून, त्यामधील वडगाव तेजन ते उदनापूर हा रस्ता अतिशय खराब झाल्याचे वडगाव तेजन येथील गावकर्यांसह शेतकर्यांकडून सांगण्यात येत आहे. हा रस्ता इस्टिमेटनुसार कोठेही झालेला दिसून येत नाही. एकाच रात्री संपूर्ण रस्ता झालाच कसा? असे प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना भेडसावत आहेत. हा रस्ता पूर्णत्वास गेलेल्या भागात हाताच्या एका बोटाने रस्ता उकळून येताना दिसून येत आहे व उखळून आलेल्या डांबरच्या खाली मातीच दिसून येत आहे. अशा अतिशय निकृष्ट दर्जाच्या कामाची वरिष्ठ स्तरीय चौकशी करून या रस्त्याचे काम परत करावे, अशी मागणी गावकर्यांकडून होत आहे.
दिनांक १ मे २०२४ रोजी कामगार दिनाच्या दिवशीच गावातील नागरिकांनी या रस्त्यावर गावातील सरपंच डॉ. विजय तेजनकर, ग्रा.प. सदस्य जेसराज शिरसाट, सदस्यपती जगन तेजनकर, मुरलीधर तेजनकर, पत्रकार तथा जिल्हा उपाध्यक्ष भाजपा किसान मोर्चा सतीश पाटील तेजनकर, पत्रकार विनोद पाटील तेजनकर तथा कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लोणार ( शरद पवार गट)सह अन्य बर्याच प्रतिष्ठित व्यक्तींना बोलावून त्यांना हा नवीन झालेला रस्ता हाताने उखडून दाखविल्यामुळे संपूर्ण गावात एकच खळबळ तयार होऊन गावातील बर्याच नागरिकांनी हा रस्ता पाहण्यासाठी धाव घेतली होती.
वडगाव ते उदनापूर रोड हा एकाच रात्रीत बनवून संपूर्ण मातीवरच एक इंचाचा डांबरचा थर टाकला आहे व तो हाताने निघून जात आहे. त्यामुळे ठेकेदाराने व प्रशासनाने प्रशासकीय अधिकार्यांनी हा रोड येथे येऊन पहावा व नवीन चांगल्या प्रकारे रस्ता बनवावा.
– अनिल पवार, माजी उपसरपंच वडगाव तेजन
—
संपूर्ण मातीवर डांबर टाकल्यामुळे ते निघून जात आहे. त्यामुळे हा रस्ता परत बनविण्यात यावा.
– दिलीप शिरसाट, शेतकरी वडगाव तेजन
—
हा रस्ता निकृष्ट दर्जाचा झालेला असून, मातीवर फक्त अर्धा इंच डांबर टाकलेले आहे साधा ट्रॅक्टर गेला तरी हा रस्ता पूर्णपणे उकळून जातो. त्यामुळे कोणतेही प्रोसिजर न करता निकृष्ट दर्जाच्या रस्त्याची प्रशासनाने पाहणी करून निर्णय घ्यावा.
– गौतम मोरे, समाजसेवक वडगाव तेजन
—-
उदनापूर ते वडगाव तेजन या रस्त्याचे काम बोगस झालेले आहे. रस्त्याशेजारी नाली खोदून ठेवल्यामुळे शेतात जायचे कसे, हा प्रश्न शेतकर्यांना भेडसावत आहे. त्यामुळे त्या नालीमध्ये सिमेंट पाईप टाकून शेतात जाण्यासाठी रस्ता बनवून द्यावा.
– गुलाब लोढे, शेतकरी वडगाव तेजन
—–
रस्त्याचे काम नियमाप्रमाणे योग्य झालेले आहे, रस्त्याची दुरुस्तीसुद्धा आमच्याकडेच आहे, त्यामुळे जर कुठे रस्ता दुरुस्त करायचे काम पडत असेल तर तो दुरुस्त करून घेऊ.
– नळगे ठेकेदार, नळगे कंट्रक्शन
———-