Breaking newsHead linesMaharashtraMarathwadaPolitical NewsPoliticsVidharbha

विदर्भातील बुलढाणासह ५ तर मराठवाड्यातील ३ लोकसभा मतदारसंघात आज मतदान

बुलढाणा (संजय निकाळजे) – विदर्भ आणि मराठवाड्यातील एकूण ८ मतदार संघात शुक्रवार, दि. २६ एप्रिलरोजी दुसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे. विदर्भातील बुलढाणासह ५ तर मराठवाड्यातील ३ लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ -वाशिम या लोकसभा मतदारसंघात तर मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड, परभणी या तीन मतदारसंघात २६ एप्रिल रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदान होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात १ कोटी ४९ लाख २५ हजार ९१२ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. या आठ मतदारसंघात एकूण २०४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भातील पाच मतदारसंघात १९ फेब्रुवारी मतदान झाले. आता दुसऱ्या टप्प्यातील २६ एप्रिल रोजी मतदान होत आहे. त्यासाठी वरील आठ मतदारसंघात बुधवारी सायंकाळी पाच वाजता जाहीर प्रचार करण्याची मुदत संपली. सुमारे १६ हजार ५८९ मतदान केंद्रावर एक कोटी एकोणपन्नास लाख २५ हजार ९१२ मतदार मतदान करणार आहेत. यात ७७ लाख २१ हजार ३७४ पुरुष तर ७२ लाख ४ हजार १०६ महिला आणि ४३२ तृतीयपंथी मतदार आहेत. दिव्यांग व ८५ वर्षांवरील मतदाराकडून प्राप्त झालेल्या सुमारे १४ हजार ६१२ मतदारांनी १२ डी अंतर्गत घरातून मतदान करण्यासाठी अर्ज केला. तर देशाच्या सीमेवर व शासकीय कर्तव्यावर असलेले १८ हजार ४७२ मतदार टपालाद्वारे मतदान करणार आहेत. बुलढाण्यात शिंदे गटाचे विद्यमान खा. प्रतापराव जाधव, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे प्रा नरेंद्र खेडकर व शेतकरी संघटनेचे मात्र अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांच्यामध्ये लढत होणार असल्याचे चित्र आहे.
अकोल्यातून भाजपचे अनुप धोत्रे, काँग्रेसकडून डॉक्टर अभय पाटील, वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघात चौरंगी लढत होत आहे. भाजपकडून नवनीत राणा, काँग्रेसचे बळवंत वानखेडे, बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेचे दिनेश बुब आणि वंचितच्या पाठिंबावरील रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर यांच्या चौरंगी लढत होत आहे. वर्ध्यात भाजपचे विद्यमान खासदार रामदास तडस आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अमर काळे यांच्यात थेट लढत होत आहे. यवतमाळ- वाशिम मध्ये शिवसेना ठाकरे गटाचे संजय देशमुख आणि शिवसेना शिंदे गटाच्या जयश्री पाटील यांच्या थेट लढत होत आहे. हिंगोलीतही बाबुराव कोहाळीकर आणि नागेश आष्टीकर या दोन शिवसैनिकात थेट लढत होत आहे. नांदेडमध्ये भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर आणि काँग्रेसचे वसंतराव चव्हाण यांच्या थेट लढत होत आहे. परभणीत रासपचे महादेव जानकर आणि शिवसेना ठाकरे गटाची खासदार संजय उर्फ बंडु जाधव यांच्या थेट लढत होत आहे. एकंदरीत दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील ८ जागांसाठी २०४ उमेदवारांच्या भाग्याचा फैसला ईव्हीएम मध्ये कैद करणार आहेत.

उद्या मतदान; ‘तिरंगी’ लढतीत कोण मारणार बाजी?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!