उद्या मतदान; ‘तिरंगी’ लढतीत कोण मारणार बाजी?
– रविकांत तुपकर, प्रतापराव जाधव आणि नरेंद्र खेडेकर यांच्यातच लोकसभेची खरी लढत!
- १७ लाख ८२ हजार मतदार बजावणार मतदानाचा हक्क
- शहरी ३८१, ग्रामीण १५८१ असे १९६२ मतदान केंद्र
- ११ हजार अधिकारी, ५ हजार पोलिस राहणार तैनात
बुलढाणा (बाळू वानखेडे) – बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी उद्या (दि.२६) सकाळी सात वाजेपासून मतदान होणार आहे. अधिकारी कर्मचार्यांना मतदानाच्या साहित्याचे वाटप करण्यात आले असून, मतदान प्रक्रियेसाठी यंत्रणा सज्ज झाल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिली. या मतदारसंघात शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची जोरदार लाट दिसून आली असून, लाखांच्या सभा घेणार्या तुपकरांच्या फाटक्या झोळीत मतांचे दान पडणार का? याकडे शेतकरी, गोरगरिबांच्या नजरा लागून आहेत. या मतदारसंघात प्रामुख्याने तिरंगीच लढत होणार असून, शेतकरी नेते रविकांत तुपकर, ‘महायुती’चे प्रतापराव जाधव व ‘महाआघाडी’चे नरेंद्र खेडेकर यांच्यातच खरी लढत रंगणार आहे. या तिघांपैकी कुणाच्या गळ्यात विजयाची माळ पडते? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी १७ लाख ८२ हजार मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार असून, १ हजार १०४ ठिकाणी १ हजार ९६२ मतदान मतदान केंद्र राहणार आहेत. या मतदान प्रक्रियेसाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांनी दिली. उद्या, २६ एप्रिलरोजी सकाळी सात ते संध्याकाळी सहा या वेळेत मतदान होणार आहे. गुरुवारी आणि शुक्रवारी निवडणुकीच्या काळात ताब्यात असलेल्या एकूण ४० एसटी बस, ५३ जीपवर जीपीएस यंत्रणा कार्यरत राहणार आहे. त्यामुळे कोणती बस आणि जीप कुठे आहे, याची माहिती निवडणूक मुख्य कार्यालयाच्या कंट्रोल रूमवर प्राप्त होईल. त्यामुळे कोणती टीम कुठे पोहोचल्या, तसेच कोणते झोनल ऑफिसर कुठे आहेत, याची माहिती कंट्रोल रूमला कळेल, असेही जिल्हाधिकारी पाटील यांनी सांगितले. उद्याच्या मतदानात १८ ते १९ वर्षे वयोगटातील नव्याने नोंदणी केलेले २६ हजार ५०० मतदार पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. मतदार संघात ९ लाख ३३ हजार १७३ पुरूष, तर ८ लाख ४९ हजार ५०३ महिला आणि २४ तृतीयपंथी मतदारांची नोंद झाली आहे. यात दिव्यांग १४ हजार २३४, ८५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक २६ हजार ८३०, तर ४ हजार ३९५ सैन्यदलातील मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. सर्व मतदान केंद्रावर मतदारांना रांगेत उभे राहण्याची आवश्यकता राहणार नाही. याठिकाणी रांगविरहीत मतदानासाठी टोकन पद्धतीचा वापर करण्यात येणार आहे. मतदारांना रांगेत उभे ठेवण्याऐवजी मतदान केंद्रालगत असलेल्या स्वतंत्र कक्षामध्ये बैठक, वीज, पंखे, पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यानंतर टोकन क्रमांकानुसार मतदानासाठी केवळ पाच मतदारांना रांगेत उभे ठेवण्यात येणार आहे. उष्ण वातावरणात मतदारांना मतदान करणे शक्य व्हावे, यासाठी सुविधा पुरवण्यात येणार आहे. तसेच उन्हामुळे निर्माण होणार्या उष्माघातापासून बचाव करण्यासाठी आवश्यक असलेली सुविधा देण्यात येणार आहे. मतदानासाठी एकूण १ हजार ९६२ मतदान केंद्र राहणार आहे. यापैकी ३८१ शहरी तर १५८१ नागरी भागात मतदान केंद्र राहणार आहेत. यातील ९८७ मतदान केंद्राचे वेबकास्टींगद्वारे लाईव्ह स्वरूपात मतदान प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. मतदान केंद्रावर दिव्यांगांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सक्षम अॅपद्वारे व्हीलचेअर आणि मतदान केंद्रावर नेण्या-आणण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी अॅपवर नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणी केल्यानुसार या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. मतदान प्रक्रियेमध्ये मतदानाच्या दिवशी कर्तव्यावर असणार्या अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यांच्यासाठी कर्तव्यावर नियुक्त असणार्या मतदान केंद्रावर त्यांना मतदान करण्याची सुविधा देण्यात आली आहे. तसेच जिल्ह्याबाहेरील कर्तव्यावर असलेल्या १ हजार १४९ अधिकारी, कर्मचारी पोस्टाद्वारे मतदान करण्याचा अधिकार प्रदान करण्यात आला आहे. त्यांच्यासाठी डाक मतदान प्रक्रियेची सुविधा राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यात घरून मतदानाला रविवारपासून सुरूवात झाली आहे. यात दिव्यांग ६९२ आणि ८५ वर्षावरील २ हजार १७१ असे गृह मतदानासाठी नोंदणी केलेले एकूण २ हजार ८६३ मतदारांचे मतदान करण्यात येत आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी ११ हजार ५९२ अधिकारी कर्मचारी कार्यरत असणार आहेत. तसेच ५ हजार पोलीस बंदोबस्तासाठी तैनात राहणार आहेत, असेही जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी सांगितले.
मतदान केंद्राच्या ठिकाणी १४४ कलम लागू
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २४ एप्रिलरोजी सायंकाळी ५ वाजल्यापासून ते २६ एप्रिल रोजी मतदानाच्या दिवसापर्यंत जमावबंदी आदेश लागू राहतील. मतदान केंद्राच्या ठिकाणी १४४ कलम लागू करण्यात आले असून, १०० मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू राहणार आहेत. लोकसभा निवडणूक प्रक्रिया निर्भय, निष्पक्ष आणि शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. नागरिकांना मतदानाला येण्यासाठी आणि मतदान केंद्रावर सर्व सोयी पुरविण्यात येणार आहेत. नागरिकांनी मतदान प्रक्रियेमध्ये निर्भयपणे सक्रीय सहभाग नोंदवून मतदान करावे, असे आवाहनही निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.किरण पाटील यांनी केले आहे.
जिल्ह्यात महायुतीचे वर्चस्व; पण जनमत रविकांत तुपकरांच्या बाजूने?
या लोकसभा निवडणुकीत शेतकरी नेते रविकांत तुपकर हे अपक्ष लढत आहे. त्यांच्या प्रचारसभांना गावोगावी जोरदार प्रतिसाद मिळाला असून, जनमत त्यांच्या बाजूने दिसून आले आहे. विरोधकांनी त्यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली. त्यांच्या कुटुंबीयांवर आरोप केलेत, या आरोपांमुळे जिल्ह्यातील जनतेत विरोधकांविषयी संतापाची लाट तर तुपकरांविषयी सहानुभूती दिसून आली आहे. आता हे जनमत तुपकरांसाठी मतदानात बदलणार का? हे पहावे लागणार आहे. जिल्ह्याचा विचार करता, बुलढाणा विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड हे आहेत. तर चिखली मतदारसंघात भाजपच्या आमदार श्वेता महाले या आहेत. सिंदखेडराजा मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार राजेंद्र शिंगणे हे आहेत. तर मेहकर मतदारसंघात शिंदे गटाचे आमदार संजय रायमुलकर हे आहेत. खामगांव विधानसभा मतदारसंघात भाजपचे आकाश फुंडकर व जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार संजय कुटे हे आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत तरी बुलढाणा लोकसभा मतदारसंघात महायुतीची ताकद मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. ही ताकद प्रतापराव जाधव यांच्या कितपत कामी येते हेही पहावे लागणार आहे. दुसरीकडे, कट्टर शिवसैनिक व शरद पवार, उद्धव ठाकरे, आणि काँग्रेसला मानणारे मतदार नरेंद्र खेडेकर यांना मतदान देतील की नाही, हेही दिसून येणार आहे.
कामगार मतदारांना मतदानासाठी सुट्टी
उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाच्या आदेशानुसार, निवडणूक होणार्या मतदान क्षेत्रात सर्व मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी देण्यात येणार आहे. सदर सुट्टी उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभागांतर्गत येणार्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने आदींना लागू राहणार आहे. खासगी कंपन्यांमधील आस्थापना, सर्व दुकाने आणि इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्य गृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना, तसेच माहिती तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स रिटेलर्स यांना हा आदेश लागू राहणार आहे. अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी आदींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसल्यास मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टीऐवजी केवळ दोन ते तीन तासाची सवलत देता येईल. मात्र त्याबाबत जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी, बुलढाणा यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहिल. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन ते तीन तासांची सवलत मिळेल, याची दक्षता संबंधित आस्थापना मालकांनी घेणे आवश्यक राहणार आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीत राज्याचे ६१.०२ टक्के, तर बुलढाणा जिल्ह्यात ६३.५४ टक्के मतदान झाले होते. यावर्षी जिल्हा प्रशासनाने मतदार जनजागृती केली असल्यामुळे मतदानाचा टक्का वाढणार आहे. नागरिकांनी मतदानासाठी पुढे येऊन मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे. मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी मतदान ओळखपत्राशिवाय आधार कार्ड, मनरेगा जॉब कार्ड, बँक किंवा पोस्ट ऑफिसने जारी केलेले छायाचित्र असलेले पासबुक, कामगार मंत्रालयाच्या योजनेंतर्गत जारी केलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, वाहन चालक परवाना, पॅन कार्ड, रजिस्टार जनरल ऑफ इंडिया यांच्याद्वारा नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर अंतर्गत निर्गमित स्मार्ट कार्ड, भारतीय पासपोर्ट, छायाचित्रासह पेन्शन दस्तऐवज, केंद्र, राज्य सरकार, सार्वजनिक उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपनी यांनी कर्मचार्यांना जारी केलेले सेवा ओळखपत्र, खासदार, आमदारांना जारी करण्यात आलेले अधिकृत ओळखपत्र, भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालयाने जारी केलेले विशेष विकलांगता प्रमाणपत्र असे १२ कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहेत. यापैकी कोणतेही एक ओळखपत्र दाखवून मतदान करता येणार आहे.