– लोकशाहीच्या उत्सवात मातृतीर्थ जिल्ह्याचे एक पाऊल पुढे!
चिखली (महेंद्र हिवाळे) – बुलढाणा हा मातृतीर्थ जिल्हा असून, राजमाता जिजाऊंच्या पावनभूमीत लोकशाहीचा उत्सव पार पडत आहे. त्या अनुषंगाने चिखली मतदान केंद्राची धुरा महिला अधिकार्यांच्या हाती सोपविण्यात आली असून, या पथकात सर्व महिला अधिकारी आहेत. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या निर्णयाचे सर्वस्तरातून जोरदार स्वागत होत आहे.
आजमितीस संपूर्ण देशात लोकसभा सदस्य निवडीची अर्थात लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. त्या अनुषंगाने मातृतीर्थ बुलढाणा लोकसभा मतदारसंघ अंतर्गत २३ चिखली विधानसभा मतदारसंघातील सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व ती प्रक्रिया चोख सांभाळणार्या सर्व यंत्रणेतील घटक यांच्या माध्यमातून एक आगळी वेगळी व समाजाचे लक्ष वेध होईल, अशा प्रकारची कृती घडवून आणल्या गेली आहे. या निवडणूक प्रक्रियेत मतदान घेण्यासाठी नेमण्यात आलेल्या चमूमध्ये संपूर्ण महिला भगिनीं यांचा समावेश असून, मतदान केंद्राध्यक्ष व इतर सर्व कर्मचारी ह्या महिला आहेत. आम्हीसुद्धा सक्षम आहोत, अबला नाही सबला आहोत, आणि देशाच्या या महान कार्यात आमचासुद्धा सहभाग आहे व त्यात आम्ही अग्रभागी आहोत, याचा सार्थ अभिमान ह्या महिला भगिनींच्या चेहर्यावर दिसत होता. मंडळ अधिकारी मंगल सवडदकर, तलाठी कल्पना वानखेडे, अर्चना बाहेकर, इंदु शेजोळ, अर्चना शिंगणे, संगीता कासारे यांचा या चमुमध्ये समावेश आहे. अभिनव अशा या चमू चे सर्वच स्तरातून कौतूक होत आहे. या उपक्रमामुळे लोकशाहीची प्रकिया नक्कीच गतिमान होणार आहे, अशा स्तुत्य प्रतिक्रिया उमटत आहेत.
———–
उद्या मतदान; ‘तिरंगी’ लढतीत कोण मारणार बाजी?