Breaking newsBuldanaBULDHANAVidharbha

बुलढाणा जिल्ह्यातील २० लाख लोकसंख्येला कवेत घेण्याची एअरटेलची महत्वांकांक्षी योजना; पण ठेकेदार लावतोय शासनाला कोट्यवधींचा चुना!

– चिखली, मेहकर, नांदुरा, देऊळगावराजा, जळगाव जामोद, सिंदखेडराजा व संग्रामपूर तालुक्यात केबल टाकून नेटवर्क विस्तारीत करणार!

बुलढाणा/मुंबई (खास प्रतिनिधी) – भारतीय एअरटेल कंपनी बुलढाणा जिल्ह्यात आपले नेटवर्क विस्तारीत करत असून, जिल्ह्यातील तब्बल २० लाख लोकसंख्येला कवेत घेण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. चिखली, मेहकर, नांदुरा, देऊळगावराजा, जळगाव जामोद, सिंदखेडराजा व संग्रामपूर तालुक्यात केबल टाकून नेटवर्क विस्तारीत करण्याचे काम सुरू असून, जवळपास ८१५ गावांत एअरटेल पोहोचणार आहे. फोर-जी, फाईव्ह-जी, ब्रॉडब्रॅण्ड आणि फायबरची सेवा देण्यासाठी कंपनी प्रयत्न करत आहे. विशेष बाब म्हणजे, जिल्ह्यातील काही भागाकरिता एका मोठ्या नेत्याच्या जवळच्या ठेकेदाराला रस्ताखोदाई करून केबल टाकण्याचे कंत्राट मिळाले असून, हा ठेकेदार नियम धाब्यावर बसवून तसेच शासनाला कोट्यवधींचा चुना लावून आपले काम करत आहे. आपले कुणी काहीच वाकडे करू शकत नाही, अशा अर्विभावात हा ठेकेदार असून, या सर्व प्रकाराचे लवकरच ‘ब्रेकिंग महाराष्ट्र मीडिया ग्रूप’ बिंग फोडणार आहे. त्यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीत हा नेता या ठेकेदारामुळे चांगलाच अडचणीत येणार आहे. शासनाला चुना लावून कोण टक्केवारीचा मलिदा खात आहे? याची माहिती लवकरच जिल्हावासीयांना कळणार आहे.
ठेकेदाराने रोडच्या बाजूला असे जीवघेणे खड्डे खोदून ठेवलेले आहेत. त्यात एखादा भीषण अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

वर्ष २०२४च्या अखेरपर्यंत देशातील तब्बल ६० हजार खेड्यांत आपले नेटवर्क पोहोचविण्याची भारती एअरटेल या दूरसंचार कंपनीची महत्वांकांक्षी योजना आहे. त्यादृष्टीने एअरटेलने जोरदार काम सुरू केले आहे. याच योजनेंतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील ८१५ गावांत एअरटेल आपले नेटवर्क विस्तारीत करणार आहे. जेणे करून ग्राहकांना फोर-जी, फाईव्ह-जी, ब्रॉडब्रॅण्ड, आणि एअरटेल फायबरची दर्जेदार व चांगल्या स्पीडची सुविधा मिळेल. त्यासाठी रस्त्याच्या बाजूला खोदून केबल टाकण्याचे काम एका खासगी ठेकेदाराला मिळालेले असून, हा ठेकेदार जिल्ह्यातील एका मोठ्या नेत्याचा खासमखास माणूस आहे. या नेत्याच्या जोरावर या ठेकेदाराने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्तेखोदाईची परवानगी घेतलीच नसल्याचे आढळून येत आहे. एवढेच नाही तर रस्त्याच्या बाजूला असलेली झाडेदेखील अवैधपणे तोडली जात आहे. त्यामुळे राज्य शासनाला कोट्यवधी रूपयांचा चुना लागत असून, पर्यावरणाचीही अपरिमित हानी होत आहे.

या ठेकेदाराविरोधात सार्वजनिक बांधकाम उपविभाग देऊळगावराजाचे अभियंता काबरा यांनी पोलिसांत तक्रार देण्याची सूचना केली होती. परंतु, अद्यापही तक्रार व गुन्हा दाखल होऊ शकला नाही. उलट या ठेकेदाराला पाठीशी घालण्याचे काम सुरू असून, त्यासाठी या मोठ्या नेत्याने आपले राजकीय ‘प्रेशर’ही वापरल्याची माहिती कानावर येत आहे. एकूणच हा अत्यंत धक्कादायक प्रकार जिल्ह्यात सुरू असून, सद्या निवडणुकांच्या धामधुमीत कुणाचे या बाबीकडे लक्ष नाही. परंतु, या रस्तेखोदाईतून कोणता नेता मोठ्या प्रमाणात मलिदा खात आहे, आणि त्याच्या कोणत्या पंटर ठेकेदाराला पाठीशी घालत आहे? याचा सविस्तरपणे पर्दाफाश ‘ब्रेकिंग महाराष्ट्र मीडिया ग्रूप’ लवकरच करणार असून, याबाबत राज्य शासनाकडे रितसर तक्रार दाखल करणार आहे. यावर कारवाई न झाल्यास न्यायालयाचे दारदेखील ठोठाववले जाणार असल्याचे ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’चे विशेष प्रतिनिधी अनिल दराडे यांनी सांगितले आहे.

दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता आढाव यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले, की सदर कंपनीने रस्तेखोदाई कामासाठी रितसर परवानगी घेतली असून, शुल्कदेखील भरले आहे. तसेच, कंपनीची सुरक्षा ठेव बांधकाम खात्याकडे आहे. त्यामुळे कुठे काही नुकसान किंवा चुकीचे झाले असेल तर कंपनीवर कारवाई करता येईल. दुसरीकडे, एअरटेल कंपनीचे अधिकारी ब्राम्हणकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, संपर्क हाेऊ शकला नाही. एकीकडे आढाव हे परवानगी घेऊन खोदकाम करण्यात आल्याचे सांगितले असले तरी, याबाबतची कागदपत्रे दाखवण्यास मात्र त्यांनी टाळाटाळ केली आहे.

————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!