अकोल्यात आंबेडकरांचे जोरदार शक्तिप्रदर्शन; परभणीत उमेदवार बदलून हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांना उमेदवारी!
अकोला/परभणी (जिल्हा प्रतिनिधी) – वंचित बहुजन आघाडीने धक्कादायक खेळी करत, परभणीतील आपला आधी जाहीर झालेला उमेदवार बदलत हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांना उमेदवारी जाहीर केली व डख यांनी आपला अर्ज दाखलही केला. तर दुसरीकडे, अमरावतीत आनंदराज आंबेडकर यांना ऐनवेळी पाठिंबा जाहीर करत, तसे पत्र प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी दिले. अकोला या बालेकिल्ल्यात वंचित आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज निवडणूक आयोगाकडे दाखल केला आहे.
वंचित बहुजन आघाडीचे नेते @Prksh_Ambedkar यांचा नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी जमलेले जन समुदाय !
वंचित बहुजन आघाडीचा विजय असो !!! pic.twitter.com/4CtYRBZeWr
— Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia) April 4, 2024
वंचित आघाडीने यापूर्वी परभणीतून बाबासाहेब उगले यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, आता त्यांच्याजागी हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांना उमेदवारी देण्यात आली. डख यांनी आज परभणीतून वंचितचे उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज भरला. परभणीत महाविकास आघाडीकडून संजय उर्फ बंडू जाधव आणि महायुतीकडून महादेव जानकर हे रिंगणात आहेत. आता पंजाबराव डख या निवडणुकीत त्यांच्यासमोर कितपत आव्हान निर्माण करु शकणार, हे पाहावे लागेल.
दुसरीकडे, गेल्यावेळी अकोला लोकसभा मतदारसंघात दुसर्या क्रमांकांची मते घेणारे प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीच्यावतीने पुन्हा एकदा अकोल्याच्या रणमैदानात उतरलेत. काँग्रेस त्यांच्या उमेदवारीला पाठिंबा देईल, अशी अपेक्षा होती. मात्र त्यांना महाविकास आघाडीत घेण्याचे प्रयत्न फोल ठरले आणि डॉ. अभय पाटील यांच्या रुपाने काँग्रेसने मराठा उमेदवाराला उमेदवारी दिली. आंबेडकर यांनी आज अकोला लोकसभा मतदारसंघासाठी जोरदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी २ एप्रिलला अमरावती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला होता. त्यांना वंचित बहुजन आघाडीकडून पाठिंबा अपेक्षित होता. तो न मिळाल्याचे पाहून त्यांनी उमेदवारी मागे घेण्याची आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची घोषणा केली. पण, आज दुपारी वंचित बहुजन आघाडीने उमेदवार रिंगणात न उतरविण्याचा निर्णय घेऊन आनंदराज आंबेडकर यांना पाठिंबा जाहीर केला. दरम्यान, सायंकाळी आनंदराज आंबेडकर यांनी पत्र लिहून आपण निवडणूक लढणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आनंदराज आंबेडकर हे आपला अर्ज मागे घेतात की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
वंचित बहुजन आघाडीकडून आतापर्यंत २५ लोकसभा मतदारसंघांमध्ये उमेदवार जाहीर केले गेले आहेत. त्यापैकी तीन उमेदवार वंचितकडून बदलण्यात आले आहेत. रामटेकमध्ये वंचितकडून यापूर्वी शंकर चहांदे यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, तांत्रिक कारणामुळे माघार घेत असल्याचे सांगत चहांदे यांनी काँग्रेसचे अपक्ष बंडखोर उमेदवार किशोर गजभिये यांना पाठिंबा जाहीर केला होता. तर यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात वंचित आघाडीने पूर्वी सुभाष पवार यांना रिंगणात उतरवले होते. मात्र, त्यानंतर अचानक निर्णय बदलत अभिजित राठोड या तरुण चेहर्याला संधी देण्याचा निर्णय घेतला होता.