– पहिल्याच पावसाळ्यात बंधारा वाहून जाण्याची भीती
सिंदखेडराजा (अनिल दराडे) – तालुक्यातील किनगावराजा येथील पाताळगंगा नदीवर मृद व जलसंधारण विभागाकडून बांधला जात असलेल्या सिमेंट बंधार्याचे काम अतिशय निकृष्टदर्जाचे सुरू असून, या कामाचे गुणवत्ता परीक्षण करण्यात येऊन, संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ऐरणीवर आली आहे. हा बंधारा निकृष्टदर्जाचा बांधला गेल्यास नजीकच्या काळात तो फुटला जाऊन वाहून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
किनगांवराजा येथील पातळगंगा नदीवर मृद व जलसंधारण विभागाकडुन द्वारयुक्त सिमेंट बंधारा तयार करण्याचे काम सुरू आहे. या कामामध्ये निकृष्टदर्जाची मातीमिश्रीत रेती वापरली जात असून, गिट्टी, लोखंड हे साहित्यही कमी दर्जाचे वापरले जात आहे. ठेकेदाराकडून सुरू असलेल्या या कामात शासनाने ठरवून दिलेली गुणवत्ता जोपासली जात नसून, नियमाची पायमल्ली सुरू असल्याचे दिसते. पातळगंगा नदीच्या परिसरातील शेतकर्यांना सिंचनाची सोय उपलब्ध होण्यासाठी गट क्रमांक ७९२ मध्ये मागील काही महिन्यांपासून नदीवर द्वारयुक्त सिमेंट बंधार्यांचे काम सुरू आहे. या बंधार्यासाठी मातीमिश्रित रेतीचा वापर करण्यात येत आहे, तसेच फक्त दिसण्यासाठी लोखंडाचा वापर केला जात आहे. कामासाठी ४० व २० एमएम गिट्टीचा वापर करणे आवश्यक असताना संबंधित ठेकेदाराकडून फक्त दिसण्यासाठी बारीक गिट्टीचा वापर होत असल्याचे दिसून येते.
द्वारयुक्त सिमेंट बंधार्यांमध्ये सळईचा वापर आवश्यक असतांना संबंधित ठेकेदाराकडून कमी प्रमाणात सळई वापरण्यात येत आहे. त्यामुळे नदीला पावसाळ्यामध्ये मोठ्याप्रमाणात पुरांचे पाणी आले तर सध्या काम सुरू असलेला द्वारयुक्त सिमेंट बंधारा वाहून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे बंधार्याचे हे काम दर्जेदार करण्याची मागणी मृद व जलसंधारण विभागाकडे केली जात आहे. याबाबत इसाक कुरेशी यांनी उपविभागीय अधिकारी मृद व जलसंधारण उपविभाग देऊळगांवराजा यांच्याकडे तक्रारदेखील दाखल केलेली आहे.
———