BuldanaBULDHANAHead linesVidharbha

शेतकर्‍यांचे नेते रविकांत तुपकर आज भरणार उमेदवारी अर्ज

– शेतकरी, कष्टकरी, तरुण, महिला व शहरी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे तुपकरांचे आवाहन

बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – शेतकर्‍यांच्या हक्कासाठी जीवाचे रान करून लढणारे शेतकरी नेते रविकांत तुपकर हे अखेर जनतेच्या आग्रहास्तव लोकसभेच्या मैदानात उतरले असून, दिनांक २ एप्रिलरोजी हजारो शेतकरी, युवावर्गाच्या साक्षीने ते आपला लोकसभा निवडणुकीतील उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. ही निवडणूक माझी एकट्याची नसून तमाम शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य नागरिक, तरुण आणि शहरातील बांधवांची ही लढाई आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी व आशीर्वाद देण्यासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा, असे आवाहन रविकांत तुपकर यांनी केले आहे. या लोकसभा निवडणुकीत शेतकर्‍यांचे पंचप्राण असलेले हे युवानेते किमान दोन लाखांच्या मताधिक्क्याने निवडून येतील, असा विश्वास बुलढाणा जिल्हावासीयांतून व्यक्त होताना दिसत आहे.

शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी लोकाग्रहास्तव लोकसभा निवडणुक लढविण्याची घोषणा केल्यानंतर त्यांच्या सभांना जिल्हाभरात प्रचंड पाठिंबा मिळत आहे. लोक त्यांना निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात लोकवर्गणीही देत आहे. सध्या ग्रामीण भागात व शहरी भागातही तुपकरांची लाट निर्माण झाल्याचे वास्तवदर्शी चित्र आहे. जनतेच्या पाठिंब्याने, आशीर्वादाने आणि सहकार्याने रविकांत तुपकर २ एप्रिल रोजी मंगळवारी आपला लोकसभेचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. सर्व सामान्यांचा उमेदवार म्हणून आपण अर्ज दाखल करणार आहे. गेल्या २२ वर्षांपासून शेतकरी, कष्टकरी, तरुण व सर्वसामान्य नागरिकांसाठी लढा देत आहे. अनेक आंदोलने केली, तडिपार झालो, पोलिसांच्या लाठ्या-काठ्या खाल्ल्या, तुरुंगात गेलो आणि सर्वसामान्य, कष्टकरी, शेतकरी, शेतमजुरांना न्याय मिळवून दिला. शहरी नागरिकांसाठीदेखील वारंवार सत्याग्रह केला. माझा हा संघर्ष जर तुम्हाला वाया जाऊ देत नसेल तर स्वतःच्या खर्चाने, घरच्या भाकरी बांधून आशीर्वाद देण्यासाठी आणि अर्ज भरण्यासाठी मंगळवार, २ एप्रिल रोजी बुलढाणा शहरातील जिजामाता प्रेक्षागारजवळील टिळक नाट्य मंदिराच्या खुल्या मैदानात सकाळी १०.०० वाजता हजारोंच्या संख्येने उपस्थित राहा, अशी विनंती रविकांत तुपकर यांनी केली आहे.


बुलढाणा चला हो बुलढाणा चला…!

ग्रामीण व शहरी भागात सध्या रविकांत तुपकरांच्या नामांकन अर्ज दाखल करण्याचीच जय्यत तयारी सुरू असल्याचे चित्र आहे. गावोगावचे तरुण गावातील प्रत्येक घरी जाऊन अगदी लग्नाच्या अक्षदा दिल्याप्रमाणे अर्ज दाखल करण्यासाठी बुलढाणा येण्याचे निमंत्रण देत आहेत. बुलढाणा चला हो बुलढाणा चला… अशीच हाक सध्या प्रत्येक ठिकाणी दिसून येत आहे.


उमेदवारी अर्ज भरण्याची २ एप्रिल ही तारीख रविकांत तुपकर यांनी आठवडाभरापूर्वीच जाहीर केली होती. त्यानंतर काही दिवसांपूर्वी शिंदे गटाचे उमेदवार प्रतापराव जाधव यांनीदेखील हीच तारीख निश्चित करत, उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जाहीर केली. त्यामुळे, २ तारखेला आता बुलढाण्यात तुपकर व जाधव यांचे जोरदार शक्तिप्रदर्शन पहायला मिळणार आहे. प्रतापराव जाधव हेदेखील मोठी रॅली काढणार असून, सभा घेणार आहे. तर तुपकरांचीही जोरदार सभा होणार आहे. तुपकरांनी पोलिसांकडे रॅलीसाठी दिलेला अर्ज हे वृत्त लिहिपर्यंत पोलिसांनी मंजूर केला नव्हता. त्यामुळे पोलिस कुणाच्या दबावात आहे का, असा प्रश्न निर्माण झाला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!