Breaking newsBuldanaBULDHANAHead linesMaharashtraPoliticsVidharbha

बुलढाण्यात भाजपची बंडखोरी; विजयराज शिंदेंचा अर्ज दाखल

– विजयराज शिंदेंची बंडखोरी भाजपपुरस्कृत, की अर्ज मागे घेणार?

बुलढाणा (बाळू वानखेडे) – भारतीय जनता पक्षाचे बुलढाणा लोकसभा प्रमुख तथा माजी आमदार विजयराज शिंदे यांनी लोकसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करून खळबळ उडवून दिली आहे. “शिंदेंची तलवार दोन-चार दिवसांत म्यान होईल”, असे सांगितले जात असले तरी, शिंदेंची ही बंडखोरी भाजपपुरस्कृत आहे की, ते खरेच अर्ज मागे घेतील? याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत. दरम्यान, शिंदेंच्या या भूमिकेने महायुतीला जबरदस्त तडा गेला असून, शिंदे गटाचे उमेदवार प्रतापराव जाधव यांची चांगलीच डोकेदुखी वाढली आहे. आधीच शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्यामुळे विजयाची शाश्वती उरली नसताना, विजयराज शिंदे जर खरेच मैदानात कायम राहिले तर मात्र शिंदे गटाला बुलढाण्याची जागा गमवावी लागण्याचा धोका निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनीदेखील उमेदवारी अर्ज दाखल केलेला असून, तेदेखील अर्ज मागे घेतात की नाही? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

बुलढाणा लोकसभा मतदारसंघ हा महायुतीतील एकनाथ शिंदे यांच्या गटाला सुटलेला असताना भाजपचे बुलढाणा लोकसभा प्रमुख तथा माजी आमदार विजयराज शिंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज आज (दि.1) दाखल केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उमेदवार भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना योग्य सन्मान देत नसल्याचा आरोप शिंदे यांनी केला आहे. “मी केवळ सर्वसामान्य भाजपच्या कार्यकर्त्यांचे प्रतिनिधित्व करत असून, हीच येथील मतदारांची भावना असल्याचा दावादेखील शिंदे यांनी केला आहे”. विशेष म्हणजे, शिंदे यांनी भाजपकडून अर्ज दाखल केला असून, या अर्जामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. महायुतीमध्ये बंडाचे चिन्ह निर्माण झाली आहेत. बुलढाणा लोकसभेसाठी महायुतीकडून शिंदे गटात असलेले मावळते खासदार प्रतापराव जाधव यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. जाधव यांच्याकडून भाजपच्या आमदार श्वेता महाले, आमदार आकाश फुंडकर आणि भाजप पक्षाचे लोकसभा निवडणूक प्रभारी विजयराज शिंदे यांना विश्वासात घेतले जात नाही, कार्यक्रमादरम्यान बॅनरवर त्यांचे कुठेही फोटो नाहीत, यामुळेच ही नाराजी असल्याचे विजयराज शिंदे यांनी बोलून दाखवले आहे.


महायुतीच्यावतीने प्रतापराव जाधव हे उद्या (दि.२) निवडणूक अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी रॅली आणि जाहीरसभेचे आयोजन करण्यात आले आहे. सभेसाठी शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील तसेच प्रवत्तäया ज्योती वाघमारे उपस्थित राहणार आहेत. ही सभा सकाळी १० वाजता बुलढाणा येथील जिल्हा परिषद मुलांची शाळा, जिल्हा परिषदच्या पाठीमागे मैदानावर घेण्यात येणार आहे. रॅली सकाळी १० वाजता शहरातील जयस्तंभ चौक परिसरातील गांधी भवन येथून काढण्यात येणार आहे. एकीकडे, महायुतीचे नेते प्रतापराव जाधव यांच्यासाठी संवाद मेळावे घेत असताना, दुसरीकडे भाजपच्याच एका वरिष्ठ नेत्याने बंडखोरी केल्याने महायुतीच्या संवाद मेळाव्यांवरदेखील प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. दरम्यान, शिंदे यांची समजूत काढली जाईल, ते आपला उमेदवारी अर्ज मागे घेतील, अशी माहिती भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने दिली आहे. विजयराज शिंदे हे लोकसभेच्या मैदानात नसतील, असेही या नेत्याने ठामपणे सांगितले आहे. त्यामुळे आज अर्ज भरला तरी शिंदे हे आपल्या भूमिकेवर ठाम राहतात की आपली तलवार म्यान करतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.


  • या आधीदेखील शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समजूत काढल्यानंतरदेखील अद्याप संजय गायकवाड यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलेला नाही. महायुतीची ही एक डोकेदुखी संपलेली नसतानाच भारतीय जनता पक्षातून विजयराज शिंदे यांनी बंडखोरी करत, आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे आता बुलढाणा लोकसभा मतदारसंघात महायुतीला या बंडखोरीला सामोरे जावे लागते का? हे पाहावे लागणार आहे.
  • विजयराज शिंदे हे तसे पूर्वीचे कट्टर शिवसैनिक. सन २०१९ मध्ये त्यांचे विधानसभेचे तिकीट खासदार प्रतापराव जाधव यांनी कापल्याचा त्यांचा गंभीर आरोप आहे. याचे शल्य त्यांच्या मनात खटकते असावे, असे यावरून स्पष्ट दिसून येते. त्यानंतर त्यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश करून बुलढाणा विधानसभेत गेल्यावेळी दुसर्‍या क्रमांकाची मते घेतली. कालांतराने त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजप व शिंदे गटाची युती झाल्याने येथे येऊन आपली गोची झाल्याचे त्यांना वाटू लागले. ज्यांनी आपले तिकीट कापले आता त्यांचाच प्रचार करण्याची वेळ आपल्यावर आली हे शल्य त्यांना बोचू लागले की काय, म्हणूनच त्यांनी आज १ एप्रिल रोजी आपला लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करून एक प्रकारे आपल्या भावना उजागर केल्या. दरम्यान, आता महायुतीत शिंदे गटातून आमदार संजय गायकवाड व भाजपतून विजयराज शिंदे यांनी उमेदवारी दाखल केल्याने खा. प्रतापराव जाधव यांचे टेन्शन वाढल्याचे सध्यातरी दिसत आहे.
    ————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!