मोबाईल टॉवरवरून उडी घेत गळफास घेतला, पण पोलिसांच्या सतर्कतेने वाचले प्राण
हिवरा आश्रम, ता. मेहकर (प्रतिनिधी) – येथील रमेश रामभाऊ सरकटे (वय 55) या व्यक्तीने आज (दि.३०) कौटुंबीक वादातून मोबाईल टॉवरवर चढत गळफास लावून घेतला. परंतु, साखरखेर्डा पोलिसांच्या सतर्कतेने व गावातील काही युवकांच्या धाडसाने त्याला वाचविण्यात आले असून, सद्या त्याची प्रकृती स्थीर असल्याचे मेहकर येथील डॉक्टरांनी सांगितले आहे. त्याच्यावर मेहकर येथे वैद्यकीय उपचार सुरू असून, तो व्हेंटिलेटरवर आहे.
https://youtu.be/mk2aToMeEts
आज सकाळी 9 वाजेच्या सुमारास रमेश सरकटे हे गावातील मोबाईल टॉवरवर चढले. तेथे जाऊन त्याने पोलिसांना बोलावण्याची मागणी केली व जीव देणार असल्याचे सांगितले. ही बाब काहींनी तातडीने पोलिसांना कळवली. घटनेचे गांभीर्य पाहाता, बीट जमादार प्रवीण गवई, निवृत्तीदादा पोफळे, नितीनराजे जाधव, तुकाराम इनामे हे पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. ठाणेदार स्वप्नील नाईक यांनाही कळविण्यात आल्यानंतर तेही तातडीने आले. पोलिसांनी बचावाची व्यूहरचना करत असतानाच, रमेश सरकटे यांनी एक चिठ्ठी खाली फेकली व या लोकांवर कारवाई करण्याची मागणी केली. पोलिसांनी तू खाली उतर आम्ही या लोकांवर कारवाई करतो, असे आश्वासन दिल्यानंतरही सरकटे हा खाली उतरण्यास तयार नव्हता. त्यामुळे त्याला बोलत ठेवून पोलिस व काही युवक हे टॉवरवर चढले. त्यामुळे आपले काम झाले आहे, असे सांगून रमेश सरकटे याने सोबत आणलेली दोरी गळ्यात अडकवून टॉवरवरून खाली उडी घेतली. काही क्षणातच तो बेशुद्ध पडला असताना, टॉवरवर चढलेल्या युवकांनी लगेचच त्याला खाली उतरवून पोलिसांच्या सहाय्याने मेहकर येथील एका खासगी रूग्णालयात दाखल केले. त्याच्यावर वेळीच उपचार झाल्याने या युवकाचे प्राण वाचले आहेत. या थरारक घटनेचे चित्रण सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे. रमेश सरकटे याने लिहिलेल्या चिठ्ठीत आठ लोकांची नावे असून, त्याने कौटुंबीक वादातून हा प्रकार केल्याचे समोर आले आहे. साखरखेर्डा पोलिसांनी या लोकांची चौकशी केली असून, गुन्हा दाखल करण्याबाबतची कार्यवाही सुरू होती.