BuldanaBULDHANAHead linesMaharashtraPolitical NewsPoliticsVidharbha

बाहेरून गळ्यात गळे घालत असले तरी सगळा खेळ ‘आतून’ चालणार?

– रविकांत तुपकर पडले की अनेकांची विधानसभेची गणिते बिघडवणार?

बुलढाणा (बाळू वानखेडे) – बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे राजकीय चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. महाआघाडीचे उमेदवार प्रा. नरेंद्र खेडेकर व महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्यात मुख्य लढत होण्याची शक्यता असताना, शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या आक्रमक भूमिकेमुळे या दोघांचीही खरी लढत तुपकरांशी होणार आहे. सद्या महायुतीच्या नेत्यांचे संवाद मेळावे सुरू आहेत. त्यानंतर स्टार प्रचारकांच्या जाहीर सभा आयोजित आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस अशा दिग्गजांच्या सभांचा धडाकादेखील उडणार असून, महाआघाडीकडून काँग्रेसचे नेते राहुल गांधी, ज्येष्ठ नेते शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्याही सभांचे नियोजन केले जात आहे. या सभांतून स्थानिक नेते गळ्यात गळे घालताना दिसणार असले तरी, खरा खेळ हा ‘आतून’ चालणार आहे. त्यामुळे तुपकर पडतील, ही आशा जाधव-खेडेकर यांनी बाळगली असली तरी ती त्यांची भाबडी आशा ठरू शकते, असा सूर राजकीय वर्तुळातून ऐकायला येत आहे. कारण, रविकांत तुपकर हे लोकसभेला पडले तर अनेकांच्या विधानसभा मतदारसंघात ते गोची करून ठेवणार आहेत. त्यामुळे गुपचूप का होईना, काहींना तुपकरांना चालवावेच लागणार असून, आपली राजकीय सोय पहावी लागणार असल्याचे जिल्ह्यातील जाणकारांनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी चर्चा करताना स्पष्ट केले आहे.

बुलढाण्यात खरी लढत ही तिरंगीच होत आहे. शेतकरी नेते रविकांत तुपकर हे ऐनवेळी निवडणुकीतून माघार घेतील, अशी जोरदार चर्चा असताना, तुपकरांनी निवडणूक लढविण्याचा आपला निर्धार कायम ठेवला आहे. २ एप्रिलला ते जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. “तुपकरांना ऐनवेळी निवडणुकीत बाद करण्याची खेळी खेळली जाऊ शकते”. परंतु, त्यादृष्टीनेही तुपकरांनी सर्व तयारी करून ठेवलेली असावी. जिल्ह्यातील विधानसभेच्या अनेक मतदारसंघात रविकांत तुपकर फॅक्टर यंदा महत्वपूर्ण ठरणार आहे. लोकसभेची निवडणूक संपली की लगेचच तीन-चार महिन्यांत विधानसभा निवडणुकीचा धुराळा उडणार आहे. तुपकरांना लोकसभेत पाठवले तर अनेकांसाठी आपले विधानसभेचे मतदारसंघ सुरक्षित होतात. तसेच, त्या निवडणुकीत तुपकर हे राजकीय उपकाराची परतफेडदेखील सव्याज करू शकतात. त्यामुळे लोकांसमोर गळ्यात गळे घाळणारे महायुती व महाआघाडीचे नेते जे काही खेळी करायची आहे ते खासगीत करून मोकळे होणार आहेत, असे सांगितले जात आहे. लोकसभेच्या उमेदवारीसाठी तुपकरांनी भाजप, शिवसेना (ठाकरे) व वंचित आघाडी यांच्या नेत्यांकडे निरोप दिले होते. परंतु, या नेत्यांनी “आम्ही शब्द दिला आहे”, असे सांगून तुपकरांना नाराज केले गेले. विशेष म्हणजे, तुपकर यांच्याकडे ‘इलेक्टिव्ह मेरिट’ आहे, हे सर्व नेत्यांनी मान्य केले होते. तरीदेखील उमेदवारी देण्याचे टाळले. आता उमेदवार निवडून आणण्याचे ‘शिव’धनुष्य या सर्वच नेत्यांना पेलावे लागणार आहे. सद्या काही नेत्यांकडून तुपकरांनी उमेदवारी मागे घ्यावी, यासाठी प्रयत्न केले जात आहेत, अशी माहिती मिळत असून, त्याला तुपकर भीक घालतील, असे दिसत नाहीत.
वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंतराव मगर यांच्या उमेदवारीमुळे माळी समाजाची मते विभाजीत होणार आहेत. खास करून ही मते आतापर्यंत प्रतापराव जाधव यांच्या पारड्यात पडत होती. जाधव यांना वंचित आघाडीच्या उमेदवाराचा सर्वाधिक फटका बसणार असून, त्यांच्या विरोधात असलेली कट्टर शिवसैनिकांची नाराजीदेखील त्यांना भोवण्याची शक्यता आहे. शिवाय, भाजप व अजित पवार गटाचे नेते कितपत प्रतापरावांचे काम इमानदारीपूर्वक करतात? याबाबतही साशंकताच आहे. दुसरीकडे, प्रा. नरेंद्र खेडेकर यांच्याकडे ‘इलेक्टिव्ह मेरिट’ नसल्याबाबत यापूर्वीच जनमाणसात चर्चा झडलेली आहे. बुलढाणा मतदारसंघ हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. यंदा हा मतदारसंघ पुन्हा परत मिळवण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांनी जोरदार प्रयत्न केलेत. परंतु, ठाकरे यांनी ऐकले नाही. त्यामुळे काँग्रेसच्या एका गटात तीव्र नाराजी आहे. ते प्रा. खेडेकर यांच्यासाठी खरोखर प्रयत्न करतील की नाही? याबाबतही साशंकता आहे. ठाकरेंच्या शिवसेनेतही प्रा. खेडेकरांना कितपत खरोखर साथ मिळेल? याबाबतही उलटसुलट चर्चा कानावर येत आहेत. वंचित आघाडीची काही मते ही हक्काची असतात, त्यात दलित समाजाची मते ही बाळासाहेब आंबेडकर यांनाच जातात. हा इतिहास पाहाता, वंचित आघाडीमुळे प्रा. खेडेकरांना काँग्रेस व शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमार्फत मिळू शकणारी दलित समाजाची मते मिळतील की नाही? याचीही काही खात्री नाही. त्यामुळे वंचित आघाडीच्या उमेदवाराचा यंदा पहिल्यांदाच महायुती व महाआघाडी या दोघांनाही फटका बसणे क्रमप्राप्त आहे, अशीही जिल्ह्यात सद्या राजकीय चर्चा रंगताना दिसत आहे.


या राजकीय धामधुमीत शेतकर्‍यांसाठी लढणारा नेता म्हणून शेतकरी, कष्टकरी, मजूर व युवावर्गाने रविकांत तुपकरांच्या झोळीत आपले मते टाकली तर ते किमान दीड ते दोन लाखांच्या फरकाने निवडून येऊ शकतात, असा राजकीय धुरिणांचा अंदाज आहे. त्यामुळेच रविकांत तुपकर हे आपल्या कार्यकर्ते व समर्थकांशी बोलताना दोन लाखांच्याच फरकाने निवडून येऊ, असे आत्मविश्वासाने सांगताना दिसत आहेत.
————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!