राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)ची पहिली यादी जाहीर, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, नीलेश लंकेंना उमेदवारी
– बारामतीतून सुप्रिया सुळेच मैदानात, वर्ध्यातून अमर काळेंना संधी
मुंबई (खास प्रतिनिधी) – राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर झाली आहे. कालच पारनेरमधून आमदारकीचा राजीनामा देणारे नीलेश लंके यांना पक्षाने अहमदनगर (दक्षिण)मधून उमेदवारी दिली आहे. बारामतीतून सुप्रिया सुळेच लढणार असून, वर्ध्यांतून अमर काळे, दिंडोरीतून भास्कर भगरे, तर शिरूरमधून डॉ. अमोल कोल्हे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. पहिल्या यादीत पाचच नावे जाहीर करण्यात आली असून, उर्वरित यादी लवकरच जाहीर करू, असे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मित्रपक्ष आणि महाविकास आघाडीतील घटकपक्षांशी चर्चा केल्यानंतर उर्वरित जागा जाहीर करणार असल्याचे ते म्हटले. आता या यादीनुसार, शिरूरमध्ये अजित पवार गटाचे शिवाजीराव पाटील विरुद्ध अमोल कोल्हे, दिंडोरीत भाजपच्या भारती पवार विरुद्ध भास्कर भगरे, नगरमध्ये भाजपचे सुजय विखे पाटील विरुद्ध नीलेश लंके तर वर्ध्यांत भाजपचे रामदास तडसविरुद्ध अमर काळे अशा अगदी अतितटीच्या लढती रंगणार आहेत. नगरमध्ये लंकेंच्या एण्ट्रीने सुजय विखेंसमोर भलेमोठे आव्हान निर्माण झालेले आहे. कारण, नीलेश लंके हे जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय चेहरा आहेत.
मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी जयंत पाटील यांनी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यामध्ये एकूण ५ उमेदवारांचा समावेश करण्यात आला. काँग्रेस, शिवसेना आणि आमचे सर्व मित्रपक्ष यांच्याशी बरीच चर्चा झाली आहे. आघाडीने त्यातून काही निष्कर्ष काढले आहेत. पक्षाच्या संसदीय समितीची बैठक झाल्यानंतर हे उमेदवार अंतिम करण्यात आले आहेत, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली. दुसरी यादी लवकरच जाहीर करू, असेही ते म्हणालेत. भाजपाला पराभूत करण्यासाठी सगळ्यांनी एकीचे बळ दाखवण्याची गरज आहे. काहीजण वेगळे उभे राहण्याची भाषा करतील तर त्यामुळे मते फुटतील आणि भाजपाला मदत होतील. सगळे एकसंघ होण्याचा प्रयत्न झाला पाहिजे, असे सांगून पाटील यांनी महाविकास आघाडीची चर्चा संपली आहे, असेही स्पष्ट केले. वंचित बहुजन आघाडी आमच्याबरोबर यावी, असा आमचा प्रयत्न आहे. तसेच इतरही कोणी सोबत येत असेल तर त्यासाठी प्रयत्न सुरु आहेत, असे पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, पक्षाने भाजप आणि शिंदे गटाविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. ‘लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने स्टार प्रचारकांची यादी जाहीर झाली आहे. ज्यांची नाव जाहीर झाली त्यात त्यांची पदे नमूद करण्यात आली आहेत. नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या नावाच्या पुढे पंतप्रधान असे नमूद करण्याच आले आहे. ही निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेचा भंग आहे,’ असे जितेंद्र आव्हाड याप्रसंगी म्हणालेत. शिवसेनेच्या स्टार प्रचारकांच्या यादीत भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची नावे आहेत. हादेखील आचारसंहितेचा भंग आहे. याबाबत आम्ही तक्रार दिली असून, पुरावेदेखील सादर केले आहेत, असेही आव्हाड यांनी सांगितले.
– उमेदवारांची यादी खालीलप्रमाणे –
१. वर्धा – अमर काळे
२. दिंडोरी – भास्कर भगरे
३. बारामती – सुप्रिया सुळे
४. शिरुर – अमोल कोल्हे
५. अहमदनगर – नीलेश लंके
बारामतीत नणंद विरुद्ध भावजय लढत!
सुप्रिया सुळे यांच्या नावाची घोषणा झाल्याच्या काही मिनिटातच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून पहिल्या उमेदवाराची घोषणा करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनेत्रा अजित पवार यांच्या नावाची घोषणा केली. अजित पवार हे महायुतीत आल्यापासून लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातून उमेदवार देणार असल्याची चर्चा होती. गेल्या काही महिन्यांपासून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या लढणार हे स्पष्ट झाले होते. आज या लढतीवर शिक्कामोर्तब झाले आहे.