– वीजचोरी रोखण्यासाठी कुचराई होत असल्याने गावात उलटसुलट चर्चा!
सिंदखेडराजा (अनिल दराडे) – वीजेच्या तारांवर आकडे टाकून वीज चोरी होणे, तसेच अवैध कनेक्शन असणे, असे प्रकार होत असल्याने महावितरणने ‘एबी बॅच केबल’ टाकले आहे. असे असतानाही काही ठरावीक ठिकाणी अवैध कनेक्शन असल्याचे दिसून आले आहे. याबाबत महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्यांना कळवले गेले असता, त्या आल्यात आणि लगेच कोणतीही कारवाई न करता निघून गेल्या. नंतर तर त्यांनी पत्रकारांचे व सामाजिक कार्यकर्त्यांचे फोनही उचलले नाहीत. त्यामुळे या प्रकरणात काही तरी पाणी जिरत असल्याचा संशय बळावला असून, तशी चर्चा गावात सुरू आहे. महावितरण व त्यांच्या ठेकेदाराने गावात पोल बसविताना ग्रामपंचायतीची परवानगी घेतली नाही, ही बाबही उघडकीस आलेली आहे.
सविस्तर असे, की सिंदखेडराजा तालुक्यातील निमगाव वायाळ येथे महावितरणकडून वीजचोरी रोखण्यासाठी ‘एबी बॅच केबल’ टाकले गेले आहे. तरीदेखील कर्मचारी आर्थिक देवाणघेवाण करून निमगाव वायाळ येथील तीर्थक्षेत्राचा क दर्जा असलेले हनुमान मंदीर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, व ग्रामपंचायत कार्यालयाचे वॉटर फिल्टर आदी ठिकाणी वीज जोडणी करून देण्यात आली होती. मात्र संबंधित घटनेची माहिती किनगावराजा येथील कनिष्ठ अभियंता श्रीमती फुले यांना देण्यात आली असता, माहिती मिळताच त्यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेऊन चौकशी केली. परंतु, कोणतीही कारवाई न करता हे पथक आले तसे निघून गेले. याबाबत माहिती विचारण्यासाठी त्यांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता, त्यांनी फोन उचलला नाही. यातून समस्त गावकरी मंडळीत मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाणघेवाण झाल्याची चर्चा सुरू आहे.
विशेष बाब म्हणजे, निमगाव वायाळ येथे एबी केबल व नवीन पोल टाकण्यासाठी ठेकेदार व महावितरण कंपनीने ग्रामपंचायत कार्यालयाकडून कोणतीही परवानगी घेतली नसल्याची माहिती ग्रामसेवक भुतेकर यांनी दिली आहे. त्यामुळेच महावितरण काही कारवाई करत नसावेत, असा संशय बळावला आहे.
————-