बुलढाणा (बाळू वानखेडे) – बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव व नजीकच असलेल्या अकोला जिल्ह्यातील बाळापूर परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का आज (दि.२६) सायंकाळी सव्वा सहा वाजेच्या सुमारास जाणवला. या घटनेने परिसरात एकच घबराट पसरली होती. रिश्टर स्केलवर या धक्क्याची २.९ इतक्या तीव्रतेची नोंद झाली आहे. काही दिवसांपूर्वीच नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्यानंतर आता शेजारील जिल्ह्यातही भूकंपाचे धक्के जाणवत असल्याचे चिंता व्यक्त केली जात आहे.
संत नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या शेगाव शहरातील अनेक भागात २६ मार्च रोजी संध्याकाळी सव्वा सहा वाजेदरम्यान भूकंपाचा अतिशय सौम्य असा धक्का नागरिकांना जाणवला. यामुळे काही वेळ अनेकांच्या मनात भीतीचे वातावरण ही निर्माण झाले होते. या धक्क्याची शेगावात २.९ रिश्टर स्केलवर झाली नोंद झाली असून, यास तहसीलदार डी. आर. बाजड यांनीही दुजोरा दिला आहे. नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नसल्याचे आवाहन तहसीलदार यांनी लगेच सोशल मीडियाच्या माध्यमातून केले. शेगावनजीक असलेल्या बाळापूरमध्येही सौम्य धक्का जाणवल्याची माहिती हाती आली आहे. हे धक्के गांभीर्याने घेण्याची बाब नसली तरी, मागील आठवड्यात नांदेड शहर आणि अर्धापूर, मुदखेड, नायगाव, देगलूर, बिलोली या तालुक्यातून तीन वेळा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले होते. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर अनुक्रमे ४.५, ३.६ आणि १.८ अशी तीव्रता नोंदवण्यात आलेली आहे. त्यामुळे नांदेड जिल्हा परिसरात असलेल्या या भागातही भूकंपाचे धक्के जाणवत असल्याचे काळजी व्यक्त केली जात आहे.
———-
पेड न्यूज प्रसारित न करण्याचा ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’चा निर्णय!