चिखली (महेंद्र हिवाळे) – चोरट्यांनी चक्क लहान मुलांच्या खेळण्याचे साहित्यदेखील चोरून नेण्याचा नतद्रष्टेपणा केला असून, या चोरट्यांचा अद्याप शोध लागलेला नाही. या घटनेने पालकवर्गात संताप निर्माण झालेला आहे. तालुक्यातील अंत्री कोळी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत हा प्रकार उघडकीस आला आहे.
रायपूर पोलिस ठाणेअंतर्गत असलेल्या अंत्री कोळी येथे जिल्हा परिषदेची माध्यमिक व उच्चमाध्यमिक शाळा आहे. या शाळेला सुट्टी असताना चोरट्यांनी रात्रीच्या अंधाराचा गैरफायदा घेऊन मुलांचे खेळण्याचे साहित्य शाळेचे कुलूप तोडून चोरून नेले. तसेच दरवाजाचा कोंडा वाकून तोडेले कुलूपदेखील लंपास केले आहे. शाळेमध्ये असलेले दोन सीसीटीव्ही कॅमेरे फोडून टाकले असून, एक कॅमेरासुद्धा चोरून नेला आहे. या चोरट्यांनी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे खेळण्याचे साहित्य चोरले असून, या घटनेने पालकवर्गात संताप निर्माण झालेला आहे. हे चोरटे परिसरातील व शाळेची परिचित असावेत, असा संशय आहे. मुख्याध्यापक प्रदीप आपार यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्षण अधिकारी पंचायत समिती चिखली यांना पत्राद्वारे माहिती देऊन कारवाई करण्यास पत्र लिहिले आहे. तसेच रायपूर पोलीस स्टेशनलाही पत्र दिले गेलेले आहे. अद्याप तरी पोलिसांना चोरट्यांचा काही सुगावा लागलेला नसून, तथापि लवकरच हे चोरटे पकडून त्यांच्याकडून साहित्याची वसुली करू, असा इशारा पोलिसांनी दिलेला आहे.
————