BuldanaBULDHANAHead linesVidharbha

शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी मुहुर्त ठरविला; २ एप्रिलरोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार!

– जोरदार शक्तिप्रदर्शन होण्याची शक्यता!

बुलढाणा (बाळू वानखेडे) – शेतकरी नेते रविकांत तुपकर हे जनतेच्या आग्रहास्तव बुलढाणा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून, २ एप्रिलरोजी ते आपला उमेदवारी अर्ज दखल करणार असल्याची घोषणा त्यांनी सातगाव (ता.जि.बुलढाणा) येथील निर्धार मेळाव्यात केली. त्याचबरोबर अर्ज दाखल करण्यासाठी शेतकरी, कष्टकरी, तरुण व शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहनदेखील त्यांनी केले आहे. त्यामुळे यानिमित्ताने त्यांचे जोरदार शक्तिप्रदर्शन होणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, महाविकास आघाडी किंवा महायुती यांच्याकडून अद्याप उमेदवार जाहीर झालेला नसताना तुपकरांनी आघाडी घेत, लोकसभा निवडणुकीची वात पेटवली आहे. जिल्ह्यातील अनेक नेते सद्या मुंबई व दिल्लीत तळ ठोकून असून, आपआपल्या पक्षाकडे फिल्डिंग लावून बसले आहेत. दरम्यान, आज रात्री किंवा उद्यापर्यंत महायुतीची यादी फायनल होण्याचे संकेत असून, त्यानंतर लगेचच महाआघाडीच्या उमेदवारांचीही घोषणा होईल, अशी माहिती राजकीय सूत्राने दिली आहे.

 दि. २२ मार्च रोजी बुलढाणा तालुक्यातील सातगाव येथे झालेल्या निर्धार परिवर्तन सभेनिमित्त रविकांत तुपकरांनी गावकर्‍यांशी संवाद साधला. या सभेला गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. येणार्‍या लोकसभा निवडणुकीत होणार्‍या परिवर्तनाच्या लढाई सोबत असल्याचा शब्द यावेळी गावकर्‍यांनी तुपकरांना दिला. यावेळी सातगाव येथील पुरुषोत्तम पालकर यांनी लोकसभा निवडणुक लढविण्यासाठी ११ हजार १११ रुपये निधी रविकांत तुपकरांना दिला. तुपकरांनी लोकाग्रहास्तव लोकसभा निवडणुक लढविण्याची घोषणा केल्यानंतर त्यांना जिल्हाभरात मोठा पाठिंबा मिळतांना दिसत आहे. लोक त्यांना निवडणूकीसाठी मोठ्या प्रमाणात लोकवर्गणीही देत आहे. तुपकरांनी संपूर्ण जिल्हा पिंजून काढला असून त्यांच्या सभांना लोकं तुफान गर्दी करीत आहेत. सद्या तुपकरांची एक लाट निर्माण झाल्याचे चित्र आहे. महायुतीचे उमेदवार व रविकांत तुपकरांमध्ये लढत होण्याची चिन्हे सध्या मतदारसंघात दिसत आहेत. बाकी पक्षाचे उमेदवार ठरण्याआधीच आता रविकांत तुपकरांनी २ एप्रिल रोजी अर्ज दाखल करण्याची घोषणा केली असून, अर्ज भरण्यासाठी व परिवर्तनाच्या लढाईत सहभागी होण्यासाठी शेतकरी, कष्टकरी, तरुण व सर्वसामान्य नागरिकांना हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहनदेखील त्यांनी सातगाव येथे बोलतांना केले आहे. यावेळी मंचावर गजानन लांडे-पाटील, तुळशीराम काळे, नंदूभाऊ शिंदे, भगवान देठे, शिवाजीभाऊ पालकर, उत्तमसिंग पालकर, पवन देशमुख, सदाशिव जाधव सर, आकाश माळोदे, दत्तात्रय जेऊघाले, दगडूभाऊ साखरे, गुलाब तायडे, अरुण पन्हाळकर, अरुण नेमाने, पवन बाकरे, अमोल देवकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. तर गावातील तरुणांनी या सभेचे उत्कृष्ट नियोजन केले होते.


महायुतीच्या संवाद यात्रातून छुपा’विसंवाद’ चव्हाट्यावर?; तर काँग्रेसने मतदारसंघ पुन्हा मिळविण्यासाठी लावला जोर!

  • दरम्यान, महायुतीच्या स्थानिक नेत्यांनी ‘संवाद मेळावा’ घेण्यास सुरूवात केली असून, नेत्यांमधील ‘विसंवाद’ मात्र यानिमित्ताने चव्हाट्यावर आला आहे. भाजपच्या महिला नेत्या व चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांना हेतुपुरस्सर या मेळाव्यांतून डावलले जात असल्याची चर्चा व तीव्र संतापदेखील कार्यकर्त्यांतून व्यक्त होत आहे. भाजपातील घाटाखालील व घाटावरील नेत्यांतील सुप्तगटबाजीही यानिमित्ताने उघडकीस येत आहे.
  • बुलढाणा लोकसभा मतदारसंघात भाजपसाठी अनुकूल वातावरण असल्याचे निवडणूकपूर्व सर्वेक्षण असतानाही भाजपच्याच एका नेत्याने हा मतदारसंघ शिंदे गटाला सोडण्यासाठी छुपा एजेंडा राबविल्याची राजकीय चर्चा होत आहे. कारण, चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांचे नाव अचानक लोकसभेसाठी चर्चेत आले होते. आतादेखील संवाद मेळाव्यात श्वेताताईंची अनेक ठिकाणी असलेली अनुपस्थिती भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्ते व पदाधिकारी यांना चांगलीच खटकत आहे.
  • दरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा दिल्ली गाठली असून, ते आपली यादी हायकमांडकडून फायनल करून घेणार आहेत, त्यात विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांचे नाव निश्चित झाले असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
  • दरम्यान, महाआघाडीकडून बुलढाण्याच्या जागेसाठी काँग्रेसदेखील चांगलीच आक्रमक झाली असून, काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस हर्षवर्धन सपकाळ यांना उमेदवारी द्यावी, यासाठी पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी राजीनामा सत्र सुरू केलेले आहे. रामटेक घ्या पण बुलढाणा द्या, अशी मागणी काँग्रेसने शिवसेना (ठाकरे) पक्षाकडे केली असल्याचे कळते आहे. त्यामुळे उमेदवारीसाठी हर्षवर्धन सपकाळ दिल्लीत तर जयश्री शेळके व श्याम उमाळकर हे नेते मुंबईत तळ ठोकून असल्याचे या पक्षाच्या सूत्राने सांगितले आहे.
    —————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!