वाळूतस्करांचे लाखोंचे साहित्य जेसीबीने तोडून खडकपूर्णा नदीपात्रात डुबविले!
सिंदखेडराजा (अनिल दराडे) – खडकपूर्णा नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करून वाळूतस्करी करणार्या वाळूतस्करांचे सिंदखेडराजाचे कर्तव्यदक्ष उपविभागीय अधिकारी (एसडीओ) प्रा. संजय खडसे व त्यांच्या टीमने चांगलेच कंबरडे मोडले आहे. नदीपात्रातून वाळू उपसा करणारे सेक्शन पाईप जेसीबीच्या सहाय्याने ओढून काढत जागीच नष्ट केले व नदीपात्रात बुडवले. त्यांच्या या कारवाईने वाळूतस्करांत चांगलीच घबराट पसरली आहे.
सविस्तर असे, की दि.२३ मार्च रोजी सिंदखेडराजा येथे नव्याने रुजू झालेले उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी खडकपूर्णा नदी पात्रातून अवैध रेती वाहतूक होत असलेल्या माहितीवरून देऊळगावराजा तालुक्यातील मौजे सुलतानपूर, चिंचखेड या ठिकाणी अचानक धाड घातली. त्याठिकाणी त्यांना खडकपूर्णा नदी पात्रालगत अवैध उपसा करण्यासाठी लागणारी सेशन पाईप, बॅरल व इतर साहित्य आढळून आले. त्यांनी ते पाईप जेसीबी बोलावून जेसीबीच्या साह्याने नष्ट करून खडकपूर्णा नदी पात्रात डुबवले. सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानासुद्धा अशा प्रकारची कारवाई उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी केली आहे. तसेच त्या ठिकाणी त्यांना वाहनांच्या वाहतुकीच्या खुणा आढळून आल्या. त्यांनी जेसीबीच्या सहाय्याने मोठाले खड्डे करून हा वाळूचोरीचा रस्ता तोडून टाकला आहे. त्यामुळे देऊळगावराजा तालुक्यातील अवैध रेती उपसा करणार्यांमध्ये चांगलीच दहशत निर्माण झाली आहे.
प्रा. खडसे यांनी नुकताच सिदखेडराजा उपविभागीय अधिकारीपदाचा पदभार घेतलेला आहे. त्यांच्यामागे सद्या निवडणुकीची कामे असून, ती रणधुमाळी सुरू असतानासुद्धा अशा प्रकारची कारवाई केल्यामुळे त्यांचे कौतुक होत आहे. कालच्या कारवाई पथकामध्ये उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार आस्मा मुजावर, तलाठी हांडे, तलाठी उदार, तलाठी नागरे, तलाठी बुरकुल, चालक उबाळे, चालक चव्हाण यांचा समावेश होता.