Breaking newsHead linesMaharashtraPolitical NewsPoliticsWorld update

काँग्रेसकडून तीन विद्यमान आमदार लोकसभेच्या मैदानात; आंबेडकरांनी मांगितलेल्या जागांवर उमेदवार जाहीर करून चर्चा थांबवली?

– प्रणिती शिंदेंचे भवितव्य आंबेडकरांच्या भूमिकेवर अवलंबून!

मुंबई (खास प्रतिनिधी) – काँग्रेसने काल (दि.२१) लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या तिसर्‍या यादीत महाराष्ट्रातील सात जागासाठी उमेदवार जाहीर केले आहेत. यात तीन विद्यमान आमदारांना लोकसभेच्या मैदानात उतरवले गेले आहे. वंचित बहुजन आघाडीने अमरावती व सोलापूर हे दोन मतदारसंघ मागितले होते. या मतदारसंघातही काँग्रेसने उमेदवार जाहीर करून, आंबेडकरांसोबतची चर्चा बंद केल्याचे दिसून येते. तब्बल तीनवेळा आमदार राहिलेल्या कु. प्रणिती सुशीलकुमार शिंदे (वय ४३) या सोलापूर, रवींद्र धंगेकर पुणे, व दर्यापूरचे आमदार बलवंत वानखेडे यांना अमरावतीतून मैदानात उतरवले गेले आहे. या शिवाय, श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना कोल्हापुरातून उमेदवारी जाहीर झाली असून, छत्रपतींच्या उमेदवारीने कोल्हापुरातील उमेदवारीबाबत विरोधी पक्षांपुढे मोठाच पेच निर्माण झाला आहे. छत्रपती शाहू महाराजांच्या विरोधात उमेदवार दिला गेला तर त्याचा फटका राज्यभरात भाजपसह विरोधकांना बसणार आहे.

काल काँग्रेसने जाहीर केलेल्या यादीच नंदूरबार (अनुसूचित जमाती) गोवल पडवी, अमरावती (अनुसूचित जाती) बलवंत वानखेडे, नांदेड वसंत चव्हाण, पुणे रवींद्र धंगेकर, सोलापूर (अनुसूचित जाती) कु. प्रणिती शिंदे, तर कोल्हापुरातून श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे. वसंतराव चव्हाण हे माजी आमदार असून, त्यांची लढत माजी मुख्यमंत्री व अलिकडेच भाजपवासी झालेले अशोकराव चव्हाण यांच्यासोबत होणार आहे. तर काँग्रेस नेते असलेले केसी पडवी यांचे चिरंजीव असलेले गोवल पडवी यांचा मतदारसंघात दांडगा जनसंपर्क आहे. याच यादीसह काँग्रेसने महाराष्ट्रच्या प्रचार समितीचे प्रमुख म्हणून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची नियुक्ती केली आहे.
———

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!