आंबेडकरांचा महाआघाडीला २६ तारखेपर्यंतचा ‘अल्टिमेटम’!
– अभिनंदन बाबा! संभाजीराजे छत्रपतींची भावनिक पोस्ट; म्हणाले, तिकीटासाठी तुम्हाला दिल्ली, मुंबईला जायची गरज पडली नाही!
मुंबई (खास प्रतिनिधी) – ‘येत्या २६ तारखेपर्यंत आम्ही वाट पाहू. तोपर्यंत जर काही निर्णय झाला नाही तर त्यानंतर पुढील दिशा ठरवू. आमची जी काही भूमिका असेल ती सर्वांसमोर जाहीर करु’, असा अल्टिमेटम वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी पक्षाची भूमिका मांडली. त्याच बरोबर कोल्हापूर लोकसभेसाठी काँग्रेसने श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांना उमेदवारी दिली असून, त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा असल्याचे आंबेडकर म्हणाले. शाहू महाराजांबद्दल अपार आदर असून, त्यांच्या विजयासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू, असेही आंबेडकरांनी सांगितले.
26 तारखेला आम्ही निर्णय घेणार.
: @Prksh_Ambedkar pic.twitter.com/HYKN225NPp
— Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia) March 23, 2024
प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसला सात जागांवर पाठिंबा देण्याच भूमिका घेतली होती. आजच्या पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेसने त्या सात जागा सांगाव्यात असे आंबंडकर म्हणाले. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांना निवडून आणण्यासाठी जे जे प्रयत्न करावे लागतील, ते सर्व पक्षाच्यावतीने केले जातील. मागच्यावेळी जे घडले ते यावेळी घडू नये याची दक्षता घेऊ, असे त्यांनी स्पष्ट केले. वंचित बहुजन आघाडीच्या या निर्णयाचे महाराष्ट्रातून जोरदार स्वागत होत असून, ‘वंचित’च्या पाठिंब्यामुळे शाहू महाराजांचा विजय निश्चित झाल्याचे बोलले जात आहे. वंचित बहुजन आघाडी शाहू महाराज छत्रपती यांना पूर्ण पाठिंबा देणार आहे. वंचित बहुजन आघाडी फुले-शाहू-आंबेडकर विचारधारेवर विश्वास ठेवते आणि या विचारधारेचे प्रमुख समर्थन करते. कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराजांच्या वंशजांबद्दल आमच्या मनात अपार आदर आहे. त्यामुळे आम्ही हा जाहीर पाठिंबा त्यांना दिल्याचे आंबेडकर यांनी म्हटले आहे. वंचित बहुजन आघाडीने कोल्हापूर मतदारसंघात दिलेल्या पाठिंब्याचे शाहू महाराज यांनी आभार मानले आहेत. शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ऋणानुबंध जपले गेल्याची भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, आंबेडकर म्हणाले, की महाविकास आघाडीतील तिढा मिटणार नसले तर आमची इंट्री करून काय उपयोग. आम्ही २६ मार्चपर्यंत थांबणार आहोत. आम्ही काँग्रेसला सात जागा कळवल्या आहेत. काँग्रेसचे अध्यक्ष खारगे आणि नाना पटोले यांना पत्रदेखील दिले आहे. महाराष्ट्रात काँग्रेसचे सात जागांवर एकमत झाले हे एकाअर्थाने बरे झाले, असे ही आंबेडकर म्हणाले. दरम्यान, काँग्रेस नेते सतेज पाटील यांनीही आंबेडकर यांचे आभार व्यक्त केले आहेत. पत्रकार परिषदेत ते म्हणाले, की मी प्रकाश आंबेडकर यांचे मनापासून आभार मानतो. आदरणीय श्रीमंत शाहू महाराज यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिल्याबद्दल प्रकाश आंबेडकर यांचे धन्यवाद. समतेचा विचार आणि संविधान टिकवण्यासाठी आपला पाठिंबा आम्हांला निश्चितच बळ देईल. तसेच राज्यात महाविकास आघाडीतही आपण सहभागी व्हावे, ही अपेक्षा, असे सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
दरम्यान, शाहू महाराजांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर संभाजीराजे छत्रपती भारावले आहेत. त्यांनी ट्विटरवर याबाबत पोस्ट करत आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे. त्यांनी आपल्या वडिलांना उमेदवारी मिळाल्याबद्दल अभिनंदन केले आहे. तसेच निवडणुकीत जिंकून येण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. गेले तीन दिवस शाहू छत्रपती महाराजांच्या प्रचारार्थ मी राधानगरी तालुक्याच्या दौर्यावर होतो. सह्याद्रीच्या डोंगररांगांनी वेढलेल्या आणि निबीड अरण्यात वसलेल्या ‘वाकीघोल’ या अत्यंत दुर्गम भागात माझा दौरा होता. परवा रात्री मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर मोबाईलला थोडी रेंज आली आणि शाहू छत्रपती महाराजांना उमेदवारी जाहीर झाल्याची बातमी दिसली. मन आनंदून गेले. लागलीच कोल्हापूरला जाऊन महाराजांना भेटण्याची इच्छा झाली. पण लगेचच जबाबदारीचीही जाणीव झाली. हातातले काम, पुढे दिलेला शब्द, आणि पुढचा नियोजित दौरा पूर्ण करूनच कोल्हापूरला निघायचे ठरवले. आज दौरा संपवून घरी आल्यानंतर लगेचच महाराजांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले, असे संभाजीराजे आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले.
———-